Skip to content

या पिढीच्या महिलांना नेमकी कशाची गरज आहे ??

आजची मी…. जागतिक महिला दिन विशेष???


सौ अश्विनी कुलकर्णी

(सांगली)


बाहेरून दिसणारी मेन्टेन्ड फिगरची , सुंदर, तर कधी अप्सरेसारखी स्वर्गीय, कधी काळी सावळीच पण रेखीव,कधी जाड तर कधी बारीक, कधी रागीट तर कधी शांत …ह्या अशा अनेक नैसर्गिक बाह्यरूपाच , स्वभावाच लेण घेऊन जन्मलेली ती!

बाहेरून दिसणारी प्रत्येक ‘ती’ आतून कशी आहे??तिचे अंतरंग, ती म्हणून फक्त तिला मिळालेल्या दैवी देणग्या, तिचे संघर्ष, सहनशीलता , तीच मन, तीच चातुर्य,ती करत असलेले समायोजन…. कळत बाहेरून??

नऊ महिने गर्भारपण आणि त्यावेळचे अनेक सुखद अनुभव तर काही वेळेस गंभीर परिस्थिती,प्रसंग तीच हाताळू शकते. स्त्री गर्भार राहिली हे कळताच आनंदाला पारावर राहत नाही.

नऊ महिने गर्भ पोटात वाढवताना सुखद वाटत जरी असल तरी प्रत्येक महिन्यातील पोटातील हालचाली, गर्भाची वाढ, स्त्रीची मानसिकता आणि हार्मोनल बॅलन्स यात फरक होत असतो ,ह्या सर्वांशी जुळवून घेणं…स्वीकारणं…सहन करण आणि ह्याच बरोबर समोरच्याशी संभाळून घेणं सोपं आहे का? हे अवघड काम फक्त स्त्रीच सोपं करून दाखवते.

तिच्या शरीरातील प्रत्येक नसही हादरते! तिचा पुनर्जन्म होताना! बाळंतपण होताना!

अशा वेदनेची आवर्तने काही वेळेस दोन दोन दिवसही सहन करावी लागतात…..त्या गोंडस जीवासाठी….आणि मग गोंडस बाळ प्रकट होत! आपल्या बाळाला छातीशी लावून त्याला आपल्या मातृत्वाच्या पान्ह्याने तृप्त करुन आई म्हणून एक ऊबदार संरक्षण कवच तीच देऊ शकते…हो,ती! तीच ती… एक स्त्री…महिला!

कशा काय करू शकते ती ह्या सर्व गोष्टी? ती करू शकते ह्या अनन्यसाधारण गोष्टी कारण तिला नैसर्गिक देणगी असते, तिच्याकडे सहनशीलता असते, इच्छाशक्ती असते… ती तर एक शक्तीपीठंच आहे!
हे सर्व करत असताना अनेक आघाड्या ती सर करत असते.

होत नसेल का तिला त्रास? दर महिन्याच्या मासिक पाळीत सुद्धा वेदना सहन करून सर्वांसाठी झटायच.. पळायचं…तीच सहन करू शकते.नोकरी करत असेल तर..घर आणि ऑफिस मध्ये कसरत करायची. आणि तरीही मुद्रा प्रसन्न ठेऊन.

गृहिणीची तर खूपच कसरत असते…घरातील प्रत्येकाच्या आवडी निवडी सांभाळायच्या, सगळं वेळेत आणि शिस्तीत, आल्या गेलेल्यांचं बघायचं!सणवार करायचे.

परफेक्ट टाइम मॅनेजमेंट करून चौफेर लक्ष देऊन कामाची विभागणी करायची. आणि कामाचा फडशा कसा पाडायचा हे एक स्त्रीच कौशल्याने करू शकते. कामात वाघीण होते ती!

जीवनात मुलगी,आई,पत्नी,सून,सासू, नणंद, भावजय अशा अनेक नात्यातून तिला जावे लागते. नात्यातील या समायोजनात तिच्या व्यक्तिमत्वाला तर आपोआपच अनेक पैलू पडतात.. अनेक अनुभव मिळतात.

२१ व्या शतकात,आजच्या स्त्रीला स्वतःची अशी स्पेस हवी असते. समाजात तिला स्वतःचे एक स्थान निर्माण करायचे असते.तीच व्यक्तिमत्व ,स्वतःची ओळख हवी असते .त्यामुळे गृहिणी, वकील,इंजिनिअर,डॉक्टर,पायलट, आयपीएस अधिकारी , शिक्षिका, खेळाडू, समुपदेशक अशा अनेक विविध क्षेत्रातील स्त्रिया अगदी मोलकरणी, मोलमजुरी करणाऱ्या,गवंडी काम करणाऱ्या महिला, शेतकरी स्त्रीयासुद्धा असे अनेक प्रांत आणि त्यातील आपली कामगिरी त्या लीलया यशस्वीपणे हाताळतात.

आपले शारीरिक ,मानसिक त्रास, आपल्या घरातील समस्या सर्वाना तोंड देत स्वतः आर्थिक दृष्टीनं सक्षम होऊ पाहत आहेत. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातही महिला आघाडी घेत आहेत. उच्च शिक्षणाने त्यांच्या विचारात परिपक्वता व दृष्टीकोनात सकारात्मक बदल होत आहेत.

प्रत्येक ठिकाणी महिलांनी स्वतःच स्थान निर्माण केलं आहे, ठराविक आरक्षण मिळवलंय ,आणि ते तिला मिळतही आहे. महिलांना वर आणण्यासाठी पुरुषांचाही मोलाचा वाटा आहे.

खर तर महिला दिन हा ठराविक एक दिवस नसून रोजचाच झालाय अस म्हणाव लागेल. महिलांना मिळत असलेल आरक्षण, ती तिच्या हुशारीने मिळवत असलेलं समाजातील स्वतःच स्थान, तीचे पुरुषांप्रमाणे सर्व आघाड्या सर करणं, तिची कर्तबगारी ह्यातून हे सहजच दिसून येत.

पण, जसे इतर दिवस आपण साजरे करतो तसाच हाही दिवस साजरा करावाच! स्त्री हक्कांबाबतच्या झालेल्या चळवळीचा हा मोठा परिणाम आहे. आज स्त्री व्यक्त होऊ शकते स्वतःची मतं मांडू शकते आणि आठ मार्चला महिला दिन म्हणून साजरा करू शकते हे त्याचेच फलित आहे.

आज आठ मार्चच्या दिवशी अनेक कर्तबगार स्त्रियांना त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मान करण्यात येतो, त्यांचा गौरव होतो. स्त्रीला हक्काचं व्यासपीठ मिळू लागलंय. ह्या व्यासपीठावर स्त्री हक्काने व्यक्त होऊ लागलीय. ह्या दिवशी अनेक शाळा, संस्था कार्यक्रम आयोजित करतात आणि अनेक महिलांचा सत्कारही करतात.

महिलांनी महिलांना खऱ्या अर्थाने ओळखले, आदर दिला, सहकार्य केलं , माणुसकीने वागवलं तर त्या आणखी उंच भरारी घेतील.
आर्थिक बाजूने सक्षम होताना महिलांनी स्वतःची शारीरिक सुदृढता वाढवली पाहिजे.

आजही निर्भया आणि प्रियांकावर झालेले अत्याचार आठवतात… आणि लक्षात येत की अशा अनेक पीडित निर्भया दुर्बल अवस्थेत अनेक ठिकाणी आहेत. ही शारीरिक व मानसिक दुर्बलावस्था ,अत्याचार सहन करणे हे प्रत्येक स्त्रीने प्रतिकारातून …वेळीच चण्डिका,दुर्गा होऊन दाखवून द्यावे.

आजच्या दिवशी मला माझ्या सख्याना हेच सांगायचं आहे की तू शक्तीपीठ आहेसच!पण,तुझ्यातील ऊर्जा ओळखून तू सर्वार्थाने सज्ज हो! स्वतःच्या नव्या भरारीसाठी!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!