या गोष्टींना खरंच इतकं महत्व द्यायला पाहिजे का ?
टीम आपलं मानसशास्त्र
काही गोष्टींना आपण अवास्तव महत्त्व देतो पण खरच ते इतकं महत्त्वाचं असते का?? जे आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण आनंदी राहील पाहिजे आणि जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत पण… जे आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक नसेल त्यासाठी जे आपण नको ती धडपड करत असू तर ते कितपर्यंत योग्य आहे??
♦ इंग्रजी भाषा
भाषा ही नक्कीच खूप महत्त्वाची आहे. आपल्याला प्रत्येक भाषा शिकण्याची आवड असावी पण आजकाल सगळं वेगळच चाललंय. इंग्रजी भाषा येईल तोच शिक्षित समजला जातो. परिस्थिती नसताना सुद्धा मुलांना इंग्लिश शाळांमध्ये भरती केले जाते.
मुळात शिक्षण कोणत्याही भाषेत असेल तरी चालते पण ज्ञान महत्त्वाचे आणि हल्ली स्पर्धा म्हणून तसेच या युगात जगायचं असेल तर इंग्लिश आलंच पाहिजे …हा अट्टाहास किती महत्त्वाचा आहे??
♦ लग्न समारंभ
लग्न हे प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार केलं तर उत्तमच. पण हल्ली सुरू झालेल्या नवनविन लग्नाच्या पद्धती.. मोठमोठे महागडे हॉल, लॉन उगाच दिखावा म्हणून गरज नसताना ठेवलेले जेवणाचे पदार्थ या सगळ्यांमुळे पैसा, अन्न या गोष्टी तर वाया जातातच पण एखाद्याने दिखावा म्हणून केलेला मोठा लग्न समारंभ दुसऱ्यांना आशा आणि अपेक्षा वाढवणारा ठरतो.
♦ गोरेपणा
आपला जो रंग आहे तो नैसर्गिक आहे. वेगवेगळ्या आधुनिक क्रीम वापरून आपला मूळ रंग कधीच बदलत नसतो, पण जाहिराती बघून आपण त्या क्रीम वापरत बसतो आणि कंपन्या मात्र प्रसिद्धी आणि पैसा मिळवतात. आपण मुळातच जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं तर दुसरे आपल्याला काय बोलतात याचा आपण विचार सुद्धा करणार नाहीत.
♦ परदेशी ब्रँड
परदेशात ज्या वस्तूंना काहीच किंमत नाही अशा वस्तू आपण इकडे महाग असले तरी विकत घेतो ते कशासाठी तर स्वतःच status दाखवण्यासाठी.. दिखावा म्हणून केलेली कोणतीच गोष्ट ही आपल्याला मानसिक समाधान देत नाही.
कारण आपण बिनकामाच्या गरजा वाढवल्या की आपला खर्च वाढतो आणि त्यासाठी आपण नको तेवढी मेहनत घेऊन शारीरिक दुखणे वाढवतो.
♦ सोनं
खरंच सोन इतकं महत्त्वाच आहे का?? सोन्याचे दागिने पाहिजेत म्हणून हट्ट करणे आणि बहुतेक वेळा त्यावरून नवरा बायको मध्ये वाद सुद्धा होतात. पण ते सोनं घेऊन आपण काय करतो. आणि सोनं जर असेल तर ते किती जपावं लागते.
शेजारची, नातेवाईक, मैत्रीण, जॉब च्या ठिकाणी असलेल्या सहकारी यांच्याशी तुलना करून सोन्यासाठी वाद करण्याची गरज आहे का?? आणि बहुतेक बायका तर सोन असून सुद्धा नकली दागिने अगदी आवडीने घालतात तर मग आपण का त्यामधे अडकायच??
♦ शिक्षण
आपल्याला स्पर्धा खूपच महत्त्वाची वाटते. मुलांची आवड त्यांचा कल लक्षात न घेता मित्राचा, सहकाऱ्यांचा मुलगा काय करतोय हे पाहून आपण सुद्धा आपल्या मुलाला तेच करण्यासाठी भाग पाडतो.
आणि बहुतेक मुलं सुद्धा मित्र जे करतात त्याच क्षेत्रात जाण्याचा हट्ट करतात. पण आर्थिक नसताना आणि उगाच एक करतोय म्हणून त्याच्याशी तुलना करून आपण सुद्धा तेच करणे किती योग्य आहे??
♦ लोक काय म्हणतील
मी हे केलं तर लोक काय म्हणतील, मी असे कपडे घातले तर लोक काय म्हणतील, मी हे खाल्ल तर लोक काय म्हणतील, मी हे शिक्षण घेतलं तर लोक काय म्हणतील हे व यासारख्या अनेक भीतीने आपण वागत असतो.आणि बहुतेक लोक अशा विचारांमुळे स्वतःला तसेच इतरांना दुखावतात.
स्वतःच त्रास करून घेतात.आत्महत्या करणारे बहुतेक लोक हाच विचार करतात.पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात इतका व्यस्त असतो की दुसऱ्याचं काय चाललय हे बघायला सुद्धा त्याला वेळ नसतो…मग आपण लोक काय म्हणतील या विचाराने स्वतःच वर्तमान आणि भविष्य बिघडवणे योग्य आहे का??


