Skip to content

मोजून पहा…वेळेला वेळ देणारी माणसच आपल्याकडे अधिक असतात.

मोजून पहा…वेळेला वेळ देणारी माणसच आपल्याकडे अधिक असतात.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


जाणीव मला सुगंधाची
मी हिशोब ठेवितो
पाकळ्यांचा……..!!

आपल्याला सुगंधाची जाणीव असते म्हणून आपण पाकळ्यांचा हिशोब ठेवणही गरजेच वाटत.अगदी तसच….आपल्या आयुष्यात आपल्या जन्माआधीपासून ते जन्माला आल्यानंतर अगदी आयुष्याची एक एक पायरी चढेपर्यंत काही माणसं असतात. आपल्या आयुष्यात माणसांची इतकी वर्दळ असते की कधी आपण ही माणसं मोजतच नाही. त्या माणसांचा कधी हिशोबच ठेवत नाही.

खरतर आयुष्यात चांगली-वाईट अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात.त्यातील वाईट लोकांचा आपण अगदी काटेकोरपणे हिशोब ठेवतो पण चांगल्या माणसांचा कधी असा हिशोब ठेवत नाही. कदाचित ते जमतही नसेल कारण ती ” माणसं ” म्हणजे आपल्यासाठी जणू देवच असतात. आणि देवाला एखाद्या तराजूत तोलणं आपल्याला कधी जमलय का…?

तर नाही.. नाही जमल आपल्याला कधीच असं चांगल्या माणसांना तराजूत तोलणं…!

पण मी काय म्हणते….हिशोब नका ठेऊ अशा माणसांचा पण एकदा मोजून तर पहा अशी वेळेला वेळ देणारी चांगली माणसं आपल्याकडे किती आहेत नी किती नाही…? उगाचच कमी झाल्यावर हुरहूर नको नं मनाला…!

नाहीतर आपलं कसं होतं नं…माणसं भरपूर असतात पण कधी कधी गोंधळात अशाच माणसंना आपण क्षणभर का होईना विसरून जातो.विसरायचा हेतू नसतोच पण अनावधानाने ते होऊन जातं. म्हणून म्हणते एकदा अशा माणसांना मोजून पहाच…

कधीही कोणतही संकट येऊदे किंवा कोणतही कारण असूदे ही काही माणसं आपल्याला वेळात वेळ काढून वेळ देतात.पर्वा नाही करत ते त्यांच्या उरलेल्या वेळेचीही…स्वतःसाठी तो वेळ राखून न ठेवता तो असलेला वेळ ते आपल्याला देतात.आपल्या सुखात आणि दुःखातही अशी माणसं आवर्जून वेळ काढून येतात.

तुझ्यासाठी येईन मी वेळ काढून… हो….थांबेन नं एक तास – दोन तास….असं म्हणून काही माणसं खरच तितका वेळ थांबतातही. मनात कुठलाही स्वार्थ न बाळगता तितकाच वेळ मनापासून देतात.

मोजून पाहीलं तर या माणसांची नक्कीच एक ‘लम्बी लिस्ट’ असेल. काही मित्र-मैत्रिणी असतील , तुमचे सिनीअर्स ,जुनिअर्स , शिक्षक , घरातील एखादी व्यक्ती अगदी कोणतीही व्यक्ती या लम्बी लिस्ट मध्ये असु शकते.

पण लिस्ट काढल्याशिवाय ते समजणार तरी कसं…?त्यामुळे आता लिस्ट काढायला सुरुवात करा.नव्याने पुन्हा एकदा जुनी मैफिल सुद्धा सजेल यात शंकाच नाही.

मोबाईल , फोनच्या आधी पत्राचा जमाना होता.हल्ली तसं काही कुणी पत्र वगैरे पाठवत नाही. पण तरीही आधी पत्र पाठवणारी माणसं हक्काने त्या पत्राद्वारे विचारपूस करायची. पाच मिनिटं का होईना वेळ काढून ती माणसं मनापासून पत्र लिहायची.पायपीट करून ती पोस्टातही टाकायची. म्हणजे पहा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माणसं आपल्यासाठी वेळ द्यायची.

अजूनही ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला वेळ देतात , वेळ द्यायचा प्रयत्न करतात.मदतीसाठी त्यांचे दोन हात कायम तत्पर असतात. स्वतःची कामं सोडून आपल्याला वेळ देणारी माणसं अजूनही या जगात आहेत.आपणच त्यांची मोजणी करायला विसरतो.आला – आला तसा निघून गेला यापलिकडे आपण हल्ली फारसं काही लक्षातच ठेवत नाही.

एकाने त्रास दिला , एक वाईट वागला म्हणून इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आपण सहजासहजी बदलून टाकतो.कुठलाही विचार न करता त्यांची मोजणी ‘indirectly’ आपण त्या त्रास देणाऱ्या माणसांमध्ये करून टाकतो.आणि आपल्या वेळेला वेळ देणारी माणसही आपल्याकडे असतात हे मात्र आपण विसरून जातो.त्यांनाही कारण नसताना वाईट म्हणून गृहीत धरतो.रागाच्या किंवा एखाद्या विचारात आपण किती चुकीचा विचार करतो कधी कधी हे आपल्या लक्षातच नाही.

म्हणून म्हणते एकदा तरी आपल्याला , आपल्या वेळेला वेळ देणारी माणसं शांतपणे मोजून पहा.त्यांची मोजणी त्रास देणाऱ्या लोकांमध्ये करण्याची चूक अजिबात करू नका.

एक कोपरा त्यांच्यासाठी ठेवा जे कशाची पर्वा न करता आपल्या वेळेला वेळ देतात.आपल्याला समजून घेऊन आयुष्यात पुन्हा हसायला शिकवतात. सारख सारख रडून काही होत नसतं कधीतरी हसायचही असतं हे सांगणारी काही माणसं कधीच विसरू नका.त्यांच्यासाठी आपण असतो आणि आपल्यासाठी ते असतात.एखाद्या किमयागाराप्रमाणे…..!!

काय मग या किमयागार माणसांना मोजायला सुरुवात करताय नं…..?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!