Skip to content

मॅच्युरिटी म्हणजे आपल्या असण्याचा कोणालाही त्रास होता कामा नये.

मॅच्युरिटी म्हणजे आपल्या असण्याचा कोणालाही त्रास होता कामा नये.


मेराज बागवान


मॅच्युरिटी’ हा शब्द हल्ली खूप सर्रास वापरला जातो.अगदी बोलता बोलता आपण बोलून जातो, ‘मॅच्युरिटी किती आहे बघ तिच्यात’, ‘तिला ना मॅच्युरिटी ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाही वाटते’ इत्यादी. असा हा मॅच्युरिटी शब्द सकारात्मक-नकारात्मक रित्या वापरला जातो.तर मग ही मॅच्युरिटी  म्हणजे तरी काय?  तसे बघितले तर हा शब्द खूप साधा सोपा, पण तितकाच खोल आहे. पण मॅच्युरिटी म्हणजे आपल्या असण्याचा कोणालाही त्रास होता कामा नये.

म्हणजेच काय, माझ्यामुळे कोणाला कसलाही त्रास होता कामा नये.प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची अशी काही मते असतात. विचार असतात. भाव-भावना असतात. पण माझ्या मतांमुळे , माझ्या विचारांमुळे कोणी दुखावले जाऊ नये.माझी मते, भावना मी कोणावरही लादता कामा नये , असे वाटणे म्हणजेच मॅच्युरिटी.माझी मते वेगळी आहेत आणि समोरच्या व्यक्तीची मते माझ्यापेक्षा खूप विभिन्न आहेत,म्हणून मीच बरोबर असेन असे काहीच नाही.याची जाणीव असणे म्हणजेच मॅच्युरिटी.दुसऱ्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार करणे.त्याच्या स्वभावाला मान देणे आणि मत भिन्नता असूनही एकमेकांचा आदर करणे म्हणजेच मॅच्युरिटी.

प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळे असते.कधी कधी ह्याच वेगळेपणामुळे एकमेकांचा राग येतो.पण वेळीच राग नियंत्रित करून समोरच्याची बाजू शांतपणे ऐकून मगच त्यावर प्रतिक्रिया देणे म्हणजे मॅच्युरिटी.यामुळे काय होते, आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही.आणि हे सर्व जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने मॅच्युरिटी आली असे म्हणता येईल.

मॅच्युरिटी म्हणजे फार फार मोठमोठ्या गोष्टी नव्हेत.तर मॅच्युरिटी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सहजपणे समजणे.जसे की कोणीतरी असवस्थ आहे याची जाणीव असणे किंवा कोणीतरी खूप नाराज आहे , किंवा कोणत्यातरी समस्येमुळे खूप शांत आहे हे पाहता येणे आणि ते पाहून , निरीक्षण करून  त्या व्यक्तीच्या नकळत तिला ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी मदत करणे.म्हणजेच तिच्याशी प्रत्येक्ष न बोलून देखील किंवा त्या व्यक्तीला विचलित न करता म्हणजेच आपल्या असण्याचा त्रास होऊ न देता तिच्यासाठी फुल-ना-फुलाची पाकळी करण्याचा विचार असणे म्हणजेच मॅच्युरिटी.

ही मॅच्युरिटी खास करून तेव्हाच उपयोगाला येते जेव्हा आपण किंवा दुसरी कोणीतरी व्यक्ती एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीतुन जात असते.अशा वेळी संयम ठेवणे, दुसऱ्या व्यक्तीला आपल्या असण्याचा किंवा आपल्या समस्येमुळे कोणतीच अडचण निर्माण होऊ नये असे वाटणे म्हणजेच मॅच्युरिटी.

प्रत्येक व्यक्तीला समस्या ह्या असतातच.पण किती जरी समस्या असल्या तरी देखील, मी कोणालाही दुखावणार नाही, माझ्या अडचणींमुळे कोणावरही मी चिडणार नाही, कोणाचाही राग-राग करणार नाही, कोणाचाही विनाकारण अपमान करणार नाही , असे वाटणे म्हणजेच मॅच्युरिटी.

एकंदरीत मॅच्युरिटी म्हणजे काय? तर , मी किती जरी अवघड वादळातून जात असलो तरी पण हे वादळ फक्त माझ्यापुरतेच मर्यादित असणार आहे.कोणीच ह्या वादळात माझ्यामुळे लोटले जाणार नाही याची काळजी घेणे.माझ्यामुळे कोणाला कधीच त्रास होणार नाही.माझ्यामुळे दुसऱ्या कोणाचे तरी आयुष्य विस्कळीत होऊ नये याची जाणीव असणे. मी दुःखात आहे म्हणून माझ्या आसपासच्या सर्व लोकांनी दुःखी होण्याचे काही कारण नाही, हे लक्षात घेऊन आपले दुःख उघड उघड कोणाला न सांगता फक्त चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून ,स्वतःच्या दुःखात देखील इतरांना आधार देणे त्यांना गरजेच्या वेळी उपयोगी पडणे म्हणजेच मॅच्युरिटी.

मॅच्युरिटी म्हणजे काही फार मोठा त्याग करणे वगैरे नाही. खरे तर मॅच्युरिटी म्हणजे वेळेनुसार स्वतःमध्ये गरजेचे असे बदल करणे जे कालांतराने का होईना सर्वांच्याच हिताचे ठरतील.आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून आयुष्याची वाट थोडी बदलणे आणि वास्तवाचा स्वीकार करणे म्हणजेच मॅच्युरिटी.

अशी गंमत आहे ह्या मॅच्युरिटीची.खूप साधी , सोपी पण तितकीच खोल.अगदी छोटी पण तितकीच महत्वपूर्ण.निःशब्द असूनही जीवनाचे सार शिकवणारी ही मॅच्युरिटी. जितके लवकर तिला आपलेसे कराल तितके जीवन सोपे, साधे आणि समाधानी होऊन जाईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “मॅच्युरिटी म्हणजे आपल्या असण्याचा कोणालाही त्रास होता कामा नये.”

  1. खरंच खूप गोष्टीतून बाहेर पडायला आणि समजायला मिळते

  2. खूपच छान आहे. अगदी छान वाटत आहे वाचल्यानंतर

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!