Skip to content

मी छान आहे हे नेहमी इतरांनी म्हणावं अशी अपेक्षा का ठेवायची?

मी छान आहे हे नेहमी इतरांनी म्हणावं अशी अपेक्षा का ठेवायची?


मयुरी महेंद्र महाजन


आपण परिधान केलेले कपडे बघून ,जर कुणी आपल्याला छान दिसतेस/ दिसतोय असं म्हटलं तर साहजिकच आपल्याला प्रत्येकाला एक छान फीलींगचा अनुभव होतो, कुणीतरी आपल्याला छान म्हणतं, यातच आपण किती सुखावलेलो असतो, हे आपल्या प्रत्येकालाच आलेली फिलिंग असते ,परंतु या विषयाला सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण बघू की, नटून थटून तयार होऊन सर्वांकडून आपण छान दिसतोय अशा आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जर कुणीतरी एकजण म्हणतो, अरे मेकअप थोडा जास्त वाटतोय, म्हणजे बघा कोणी नऊ लोकांनी दिलेल्या चांगल्या कमेंट्स विसरून ,अरे खरच ती व्यक्ती जर असं म्हणतेय, तर तसं असेल, असे आपण गृहित धरून चालतो,आणि चांगला असलेला मूळ ज्यामुळे आपण खरंच सुंदर दिसत होतो, ते आपले चेहऱ्यावरचे गोड हसू, नाहीसे होते ,

मी माझंच उदाहरण सांगते, मी नवीन एक वस्तू घेतली, आणि ती बघून मला कोणीतरी विचारलं नवीन घेतलं का?? मी हो सांगितले ,आणि त्यावर प्रतिक्रिया अशी होती, की बर आहे, पण मला नाही आवडले , मी सहज हसून म्हटले तुम्हाला आवडावे, यासाठी मी ते घेतलेलेचं नाही, मला आवडले विषय संपला, हा विषय माझ्या नवीन चष्मा घेतल्याचा होता, तेव्हा त्या व्यक्तीने त्याला नकारार्थी न घेता माझ्या बोलण्याला सकारात्मकतेने घेऊन माझ्या बोलण्याचा एकंदरीत प्रत्येक गोष्टीविषयीच्या ह्या दृष्टीकोनाचं त्यांना नवल वाटलं ,आणि आपणही असंच अंगीकृत करायला हवं, हे त्यांच्या विचारांना भारून गेलं, त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या मताला ही प्राधान्य द्यायला हवं, हे पटलं, जसे की आपण बरेचदा समोरच्या व्यक्तीच्या मतांना खूप प्राधान्य देताना दिसतो, तीच भूमिका जर आपल्या स्वतःच्या विचारासाठी ठेवली, तर आपणच आपल्या आनंदाचे शिल्पकार ठरणारं….

आमचे सर नेहमी नेहमी आम्हाला म्हणायचे ,आधी स्वतः वरती प्रेम करायला शिका, आपणच आपल्या स्वतःमध्ये खूप काही कमतरता शोधत असतो, त्या ऐवजी आपण जसे आहोत, तसेच आपण स्वतःला स्वीकारायला हवे, इतरांनी आपल्याला छान म्हटलं, तर आपण छान व इतरांनी म्हटलं कुरूप तर ते कुरूप,असं करून आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हाती का म्हणून द्यावा,

मी छान आहे, हे इतरांनी म्हणावं अशी अपेक्षा का ठेवायची??? स्वतःला स्वतःच्या दृष्टिकोनाने बघायला हवे, इतरांच्या दृष्टिकोनाने बघत राहिलो, तर स्वतःचा स्वतः विषयीचा दृष्टीकोन हा कधीच तयार होणार नाही, त्यासाठी आपल्याला स्वतःला छान म्हणता यायला पाहिजे, कधी तरी आपल्या हातून चांगलं काम घडलं असेल, तर स्वतःच्या हातून स्वतःची पाठ थोपटून म्हटलं पाहिजे , व्वा…. असंच जगलं पाहिजे ,

आपण जसे आहोत, तसेच इतरांना आवडो, न आवडो परंतु आपण आपल्या स्वतःला तरी नक्कीच आवडलो पाहिजे, आपण जसे आहोत ,तसेच आपल्यासारखे जगात एकच पीस आहे ,दुसरे नाही इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षांचे ओझे हे जास्त दिवस घेऊन चालता येत नाही, त्यासाठी इतरांकडून नेहमी आपण मी छान आहे अशी अपेक्षा का ठेवायची, इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा माणसाला कमजोर बनवत जातात, आपण नेहमीच इतरांच्या प्रतिक्रियांची वाट बघत असणारं, तर निराशेच्या सुरातचं जगणारं, कारण मानवी स्वभावानुसार आपण चांगलं बोलण्याकडे लक्ष कमी, आणि अपेक्षांचा भंग केलात, तर तेच धरून बसतो,

इतरांवर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये ,आपण जर ही अपेक्षा इतरांकडून करू शकतो, तर हीच अपेक्षा, आपण स्वतःकडून का करू नये, अडचण काय आहे, की आपण इतरांच्या प्रतिक्रियेला प्राधान्य दिलेले असते, आपण स्वतःला कधीही हे विचारतच नाही ,की कुणी आपली स्तुती करून आपल्याला चांगले म्हटले, तरी हरवून जाऊ नये, आणि कोणी चेष्टा केली तरी स्वतःला कधीही कमी लेखू नये,

आणि आपण हे लक्षात घ्यायला हवे, की इतरांची मते आपल्या विषयी चांगली असली, तरी ती बदलू शकतात ,त्याला आपण काहीही करू शकत नाही, कारण दृष्टीचा उपचार होतो, दृष्टीकोनाचा मात्र ऊपचार करता येत नाही, आपले आपल्या स्वतः विषयीचे मत स्पष्ट असले, तरं इतर आपल्याला काय म्हणतात ,त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही,

कारण आपण आणि आपली अंतरात्मा या दोघांना माहिती असते, आपण किती चांगले आणि किती वाईट, त्यामुळे इतरांचा लोड घ्यायचा नाही, कारण ते क्षणात गोड बोलतात, आणि कोणी काही डोक्यात भरवले ,तर तोंड पाडून बसतात ,जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची ,कधीच काही कमी पडत नाही, आणि फरक तर अजिबात पडत नाही….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!