Skip to content

मी अबला म्हणून नाही, तर सबला म्हणून जगेन !!

सन्मान ‘ती’ चा


सौ. राजश्री भावार्थी


आज ८ मार्च जागतिक महिलादिन , संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी विविध क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या महिलांना पुरस्कार दिला जातो . पण हा महिला दिन का साजरा करावा लागतो . जसे पाठीचा कणा हा एक शरीराचा भक्कम आधार असतो तसेच स्त्री ही आपल्या घराचा , समाजाचा सुद्धा भक्कम कणाच आहे .

आज तिने सर्व क्षेत्रात प्रगती केली . पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती सर्वत्र वावरते …

तरीपण तिला या हक्कासाठी झगडावे लागते अजूनही !!

अगदी सुरुवातीला तर स्त्रियांना मतदानाचा हक्क ही नाकारलेला होता . कारण सर्वत्र पुरुषप्रधान संस्कृती ठासून भरलेली होती . एक स्त्री आपल्या बरोबरीने आपल्याला हक्क मागते हाच अहंकार त्यांना झोंबत होता .

युरोप , अमेरिकेत तर १८ व्या शतकात महिलांनी लढा देऊन मतदानाच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी निदर्शने केली .१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली .

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेत , न्यूयॉर्क मध्ये हजारो स्त्री कामगारांनी प्रचंड निदर्शने करून सरकारला झुकवून आपल्या लिंग , वर्ण , मालमत्ता , शिक्षण , मतदान हक्क या मागण्या मान्य करून घेतल्या .

या स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरी स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ठराव पास झाला .

स्त्री जर समाधानी असेल तर अख्खे घर हसत – खेळत असते . प्रत्येक गोष्टीत तिचा सहभाग असतो . ती घरची लक्ष्मी असते . तिला तिचे स्थान हवे असते . माणुसकीच्या नात्याने प्रेम , मायेचा दिलासा तिला हवा असतो .

पण जर का तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर ती चवताळून उठते . हक्कासाठी भांडली तर समाज तिच्यावर कजाग , उद्धट म्हणून बोल लावतो तिच्या मनावर हळुवार फुंकर घालावे , समजून घ्यावे हीच तिची अपेक्षा असते . स्त्री म्हणजे संसाराचे रथाचे चाक असते !!

एकदा लग्न झाले की विवाहित असण्याचे लायसन्स मात्र फक्त स्त्रीला घालून तसेच नवऱ्याच्या नावाने कुंकू लावून समाजात वावरावे लागते . पुरुष मात्र विवाहित का अविवाहित समजत नाही .

आपल्या समाजात पुरुषांना फक्त मिस्टर संबोधन पण स्त्रियांना मिस आणि मिसेस हा शब्दप्रयोग वापरतात . का पण हा प्रश्न अधांतरीच !! विधवेला मात्र अजूनही ग्रामीण भागात अलंकार उतरावे लागतात . खरंतर समानता दोघांच्या बाबतीत सारखीच असायला हवी ना !!

१९ व्या शतकात स्त्री उंबरठा ओलांडून बाहेर पडली आहे. याचे कारण तिच्यावर होणारा अन्याय

अत्याचार ! अपमान ! …

या विरुद्ध आवाज उठवावा म्हणून !! …..

आज स्त्री स्वातंत्र्यासाठी बाहेर पडली , पुरुषांच्या बरोबर सर्वच क्षेत्रात अगदी राजकारण पासून तिन्ही दले तिने काबीज केली . सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी ती बजावत आहे !! आपल्या देशात उपराष्ट्रपती , पंतप्रधान , संरक्षण मंत्री पर्यंत महिलांनी झेप घेतली आहे .

आजही कामावरून घरी परतल्यावर पुरुष दमतो पण बाई मात्र खंबीरपणे किचन चा ताबा घेऊन घरासाठी झटते . घर सुखासमाधानात कसे राहिलं ! याकडे तिचे लक्ष असते . स्त्री ला तुम्ही कमजोर समजू नका तर कणखर , खंबीर उपाधी लावा .

निसर्गाने निर्मिती केलेली ती सुंदर कलाकृती आहे . निसर्गाने बहाल केलेले सौन्दर्य तिच्याकडे आहे . ती शुभ्र फेसळता धबधबा आहे . पण तिच्या वाटेला आलेले अर्धे आभाळ अजून काळवंडलेले आहे आणि हे मळभ दूर करण्यासाठी तिचा निकराचा लढा चालूच आहे . अनेक क्षेत्रात ती अजूनही लढत आहे . तिच्या हक्काच्या मागण्यासाठी !!

तर आज महिला दिनाचे गोड संदेश , समारंभ वगैरे बघून हुरळून जाऊ नका . ज्यांना खरंच मदतीची , सहानभूतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा . लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवा !!

विशेष म्हणजे मुलगा मुलगी भेदभाव बिलकुल करू नका . प्रत्येक घरटी एक मुलगी असा संदेश सर्वत्र फिरवा !! प्रत्येक स्त्री च्या गाभाऱ्यात एक कला लपलेली असते . वेळीच तिला ओळखून एक रेखीव रूप द्या . शेवटी काय दिखाऊ , सुंदर स्त्री म्हणून जीवन न जगता एक परिपूर्ण म्हणून आणि एक कलाकार म्हणून मानाने जगा !! आपल्यातील कलेला प्राधान्य द्या…

शेवटी काय तर ….मी अबला नाही सबला म्हणूनच जगेन अशी खूणगाठ पक्की करा !! मला ही ” ती ” चा सन्मान हवा आहे …..!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!