“मानसिक समतोल ढासळला की शारीरिक व्याधी जडण्यास सुरुवात होते.”
मधुश्री देशपांडे गानू
प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, ” मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” शरीराचा मनावर आणि मनाचा शरीरावर थेट परिणाम होत असतो. या दोन वेगळ्या गोष्टी नाहीतच. हे वैद्यकीय दृष्ट्या ही सप्रमाण सिद्ध झालं आहे. WHO ही संस्था सांगते ” There is no health without mental health.” मानसिक आरोग्याशिवाय आरोग्य असूच शकत नाही.
आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की शारीरिक आरोग्य किती महत्वाचं आहे. लहान मुलांनी मैदानी खेळ खेळायला हवेत. तरुण वयात व्यायामाने शरीर कमवायला हवं. शाळेत अगदी पहिलीपासूनच शारीरिक शिक्षणाचे, कसरतीचे धडे दिले जातात. प्रत्येक आई आपल्या मुलाने, मुलीने सकस, पौष्टिक अन्न खायला हवं, याबाबत जागरूक असते.
आपले शारीरिक आरोग्य जरा जरी बिघडलं तरी आपण तात्काळ डॉक्टर कडे जातो. लगेच औषधोपचार करतो. एकूणच शारीरिक वाढ, आरोग्य, सौंदर्य याबाबत आपण खूपच जागरूक असतो. पण आपण मानवी मनाच्या आरोग्याबाबत किती विचार करतो?? शाळेत मानसिक आरोग्याबद्दल काय शिकवलं जातं?? घरी आपला मुलगा, मुलगी सतत पहिला यायला हवा, सगळीकडे त्यांनी सहभागी व्हावं म्हणून आग्रही असणारे पालक स्वतःच्याच मुलांच्या मानसिक भावविश्वाबद्दल, आरोग्याबद्दल किती जागरूक असतात??
फक्त शारीरिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे सातत्याने यशस्वी होणारे किती लोक सहज आत्महत्या करतात?? आकडा मोठा आहे. सुदृढ, सुंदर, आरोग्यपूर्ण शरीर तुमचा आत्मविश्वास वाढवतं. तुमचं स्वतःवरील प्रेम वृद्धिंगत करतं. तुम्हीं कौतुकाचे धनी होता. समाजात उठून दिसता. त्याच प्रमाणे आरोग्यपूर्ण, सुंदर, नितळ मन तुम्हांला शारीरिक स्वास्थ्य मिळवून देतं.
सहज आजूबाजूला पाहिलं तरी अनेक अनेक उदाहरणं दिसतील.
१) न आवडणारा अभ्यासक्रम आणि बौद्धिक दृष्ट्या ही न झेपणारा. केवळ आई-वडिलांच्या आणि प्रतिष्ठेच्या आग्रहाखातर घेणारा विद्यार्थी. खूप मेहनतीने तो आई-वडिलांच्या अपेक्षा नुसार पण स्वतःच्या मनाविरुद्ध वागतो. पण वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी त्याला मधुमेह ग्रासतो.
अगदी अशीच वयाच्या १८, १९ व्या वर्षी कायमस्वरूपी रक्तदाब सुरू झालेली मुलेही पाहण्यात आहेत. हे मानसिक असमतोलाचेच तर उदाहरण आहे.
२) हुशार, मेहनती अशी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने यशाच्या पायऱ्या चढते. फक्त काम आणि काम त्याला वाहून घेते. खूप मोठ्या हुद्द्यावर पोहोचते. पण चाळिशीच्या आतच रक्तदाब आणि मधुमेह जडतो.
३) एका मध्यमवयीन स्त्रीला स्वतःची आई गेल्याचे इतकं दुःख होतं की ती बराच काळ त्यातून बाहेर पडू शकत नाही. आणि मधुमेह आणि अनेक व्याधींनी त्रस्त होते.
ही सगळी मानसिक असमतोलाची लक्षणं आहेत. मानसिक समतोल ढळणे म्हणजे फक्त नैराश्य नव्हे. तर मानसिक समतोल ढळल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी कायमच्या मागे लागतात. एकाच व्यक्तीमध्ये अगदी अनेक प्रकारचे मोठे आजार ठाण मांडून बसतात. हे सगळं मानसिक चिंता, अतिविचार, निद्रानाश, अपेक्षाभंग याचेच गंभीर परिणाम आहेत.
अगदी नीट निरीक्षण केलं तर तुम्हांला आढळून येईल, तुमच्याशी बोलणाऱ्या बहुतेक व्यक्ती या त्यांच्या त्रासाबद्दलच बोलत असतात. अकारण पाठदुखी, मानदुखी, पायात गोळे येणे, सतत डोकेदुखी, निद्रानाश, अपचन, बिघडलेली पचनसंस्था, पित्त या सगळ्या शारीरिक तक्रारी कुठेतरी मानसिक स्वास्थ्य, शांतता हरवल्या मुळेच उद्भवतात. “मानसिक असमतोल तुमच्या योग्य निर्णय क्षमतेवरही परिणाम करतो.” याचा तुमच्या आयुष्यावर दुरगामी वाईट परिणाम होऊ शकतो.
तरीही आजही समाजात मानसिक स्वास्थ्याचा सखोल आणि गंभीरपणे विचार केला जात नाही. सतत कोणाशी तरी स्पर्धा, कोणाचातरी मत्सर, कोणाचा तरी राग, कसलीतरी भीती अशा अनेक कारणांनी, अवास्तव विचारांनी आपण वेढलेले असतो. “आज आत्ता माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आणि मुळात मीच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.” हा मूलभूत विचारच आपण करत नाही. आणि नाही नाही त्या विचारांनी मनाला त्रस्त आणि ग्रस्त करून टाकतो. मग हळूहळू त्याचे शरीरावर परिणाम दिसू लागतात.
मी जेव्हा ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम शिकत होते. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, ” आपलं शरीर हे परमेश्वराचा वास असलेलं एकमेव, गुंतागुंतीचं तरीही अचूक आणि सुंदर असे मंदिर आहे. आपण म्हणतो की प्रत्येक सजीव समान पेशीने बनला आहे. प्रत्येकात परमेश्वराचा वास आहे. मग जर आपलं शरीर म्हणजेच परमेश्वराचे मंदिर सुंदर ठेवायचं असेल तर मनाचं आरोग्य आधी स्वस्थ, निरोगी हवं ना! जसा शारीरिक व्यायाम, कसरत आरोग्याची गुरुकिल्ली आहे, त्याच प्रमाणे मनाचा समतोल, मनाचे आरोग्य ही पण गुरुकिल्ली आहे.
मानसिक समतोल राखण्यासाठी मुळात विचारांचे सुनियोजन हवं. वास्तव, सकारात्मक विचारांची प्रयत्नपूर्वक सवय लावून घ्यायला हवी. नकारात्मक विचारही मनात येणारच पण त्याला किती वेळ थारा द्यायचा हे आपल्याला कळायला हवं. योग्य नियमित व्यायाम, योग्य सकस आहार, शांत झोप ही त्रिसूत्री तर हवीच. त्याच बरोबर कुटुंबाबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर मनमोकळा संवाद, सहल, एकत्र खरेदी, एकत्र नाटक सिनेमा पाहणे अशा गोष्टींनीही मन प्रसन्न होतं.
परत एकदा सांगते मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी “ध्यान” यासारखा उपाय नाही. स्वतःसाठी, ध्यानासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे द्याच. त्याचा फायदा तुमच्याच लक्षात येईल. स्वतःच्या आणि प्रेमाचा माणसांसाठी तुम्ही मानसिक आणि शारीरिक सुदृढ, सक्षम, समर्थ असणं महत्वाचं आहे ना! तरच आयुष्य भरभरून जगता येईल आणि पूर्ण आनंद घेता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

