Skip to content

मानसिक वेदना आपला मूळ स्वभाव बदलतात…….

मानसिक वेदना आपला मूळ स्वभाव बदलतात…….


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


स्वभावाला औषध नसते हे आपल्याला माहीतच आहे.कुणाचाही स्वभाव आपण सहजासहजी मुळीच बदलु शकत नाही.हे जरी खरं असलं तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपला मुळ स्वभाव बदलू शकतात……

काही गोष्टी आयुष्याचा जणू एक भागच आहे.त्यापैकी आपला स्वभाव आणि वेदना…. त्या शारीरिक आणि मानसिक दोन्हीही असतात.पण आपण म्हणतो माणसाचा स्वभाव बदलण काही शक्य नाही. तर असं नाही…. माणसाचा मुळ स्वभाव हा बदलु शकतो..तेही त्याला होणाऱ्या मानसिक वेदनांमुळे….!!

वेदना कुणालाच हव्याहव्याशा वाटत नाही. सतत वेदनांनी भरलेल आयुष्य जगायला कुणाला आवडेल..?नाहीच आवडणार असं वेदनांनी भरलेल आयुष्य जगायला. या वेदना केव्हा संपतील काही सांगता येत नाही.पण या वेदनांनी आपला मूळ स्वभाव बदलु शकतो हे नक्की..!!

किती किती प्रकारच्या वेदना आपण आयुष्यात सहन करत असतो.त्यापैकीच मानसिक वेदनांना आपण जास्तीत जास्त अनुभवत असतो.सतत आपल्या भोवती त्या वेटोळा घालून उभ्याच असतात.आयुष्य जगणं असह्य होतं त्याने. मी अशीच आहे, माझा स्वभाव असाच आहे… अस आपण बऱ्याचदा म्हणतो.

पण अशा काही घटना आपल्या आयुष्यात घडतात त्याने आपलं आयुष्य तर बदलतं…त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर , स्वभावावर अगदी सहज होतो.आणि झालेल्या वेदनांमुळे आपला स्वभाव हळुहळू बदलायला लागतो.म्हणजे मानसिक वेदनांचा होणारा परिणाम हा किती भयंकर असु शकतो हे आपल्याला नक्कीच समजतं…

शारिरीक ईजा झाल्यावर आपल्याला वेदना होतात, त्या शारीरिक वेदना दीर्घकाळ राहत नाही. पण ह्याच वेदना जर मानसिक असतील तर त्या दीर्घकाळ राहतात. त्यातून बाहेर पडणे जरा अवघड असते. यातून बाहेर यायला व्यक्तीला थोडा वेळ लागतो. दुःख,राग ,नैराश्य यांची तीव्रता आपल्या आयुष्यात किती असते ते सांगायला नको.

आयुष्यात ईतके कठीण प्रसंग येतात आणि त्यातूनच मानसिक वेदना वाढत जातात. हात- पाय दुखणे , दात दुखणे , यांसारख्या गोष्टी रोजच्या झाल्यात. या शारिरीक वेदनांच आपल्याला फार काही वाटत नाही.पण एखाद्या व्यक्तीशी कडाक्याच भांडण झालं..स्वाभिमान दुःखावला गेला, कुणी अहंकाराने वागवलं तर याचा मात्र आपल्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतो. मन अस्वस्थ होतं.होणाऱ्या वेदना नकोशा वाटतात.

एखाद्या व्यक्तीला आपण ईतका जीव लावतो आणि तीच व्यक्ती आपल्याशी चुकीच वागते , किंवा आपल्याला सोडून जाते.तेव्हा मन खूप खिन्न होतं.”मी आता पुन्हा कुणाला जीव लावणार नाही , कुणाच्या इतक जवळ जाणार नाही” हे आपण स्वतःच आपल्या मनाला अगदी निक्षून सांगतो.

ब्रेकप, घटस्फोट, नोकरी गमावणे , यांसारखी बरीच कारणं मानसिक वेदनांना कारणीभूत ठरतात. यांची तीव्रता ईतकी असते की त्या थेट आपल्या मूळ स्वभावावर परिणाम करतात. आपला मूळ स्वभाव नकळतपणे बदलतो.नोकरीच्या ठिकाणी होणारी छळवणूक खूप खोलवर घाव करत असते पण पैशासाठी, पोटासाठी आपण गप्प बसतो.नंतर नंतर मात्र ते असह्य होत जातं.

नैराश्याच्या खाईत आपण कसे ढकलले जातो तेही समजत नाही. उपाशी मरेन पण त्या नोकरीच पुन्हा मला तोंडही पाहायच नाही. अशा गोष्टी मनात घर करून बसतात. इतका ताण येतो,इतक्या वेदना होतात की मूळ स्वभावात पटकन बदल होतो.असही होतं की एखादी व्यक्ती एखाद्याला इतकं समजून घेते ईतक समजून घेते की त्याला काही मर्यादाच राहिलेली नसते.

समजून घेणाऱ्या व्यक्तीला क्षणोक्षणी गृहीत धरलं जातं.पण पुढे जाऊन त्याच व्यक्तीला कितीतरी मानसिक वेदना सहन कराव्या लागतात याची आपण कल्पनाही करु शकत नाही.आणि हीच व्यक्ती पुन्हा कुणालाच समजून घेत नाही.हा त्या वेदनांमुळे होणारा बदल कशा स्वरूपाचा असतो हे आपल्याला समजु शकतं.

काही गोष्टी सकारात्मक सुद्धा असतात.एखादी व्यक्ती मुळातच शांत आणि सहन करणारी असते…पण कधी मानसिक वेदनांमुळे ती व्यक्ती चंचल होऊन पेटून उठते….ती नंतर सहन करण्याऐवजी प्रत्युत्तर द्यायला शिकते.लढायला शिकते.ही चांगली गोष्ट आहे.

पण यावरून एक नक्की, की “मानसिक वेदना” या आपल्या जीवनावर ,वागण्यावर खोलवर जाऊन परिणाम करतात. यांच्यामुळे कधीही न बदलणारा आपला मूळ स्वभाव सहज बदलतो…..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मानसिक वेदना आपला मूळ स्वभाव बदलतात…….”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!