मानसिक रित्या आजारी असलेली व्यक्ती उपचारासाठी येत नसेल तर काय करावे?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
या जगात असा एकही माणूस नसेल अशी एकही व्यक्ती नसेल जी कधी आजारी पडली नाही किंवा तिला कोणताही आजार झाला नाही. आता हा आजार शारीरिक की मानसिक हा विषय पुढचा. पण लहानपणापासून मोठ्यांपर्यंत वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी आजारी पडतेच. प्रश्न असा निर्माण होतो जर आजार हा दोन्ही प्रकारचा असू शकतो तर मग त्यावर उपचार घेण्याच्या बाबतीत त्या बाबत असलेली समस्या सोडवण्याचा बाबतीत त्या बद्दल बोलण्याच्या, मदत घेण्याच्या बाबतीत भिन्नता किंवा तफावत का?
आता असा कोणताही कोपरा नाही जिथे हॉस्पिटल, डॉक्टर नाहीत. अगदी खेडेगावातही एखादे सरकारी किंवा छोटी खाजगी क्लिनिक असतेच. का? तर व्यक्तीला काही त्रास विशिष्ट शारीरिक तर ती व्यक्ती लगेच उपचार घेऊ शकेल तिचा त्रास कमी होऊ शकेल. हे झालं मदत किंवा उपचार देण्याबाबत.
आता जी व्यक्ती शारीरिकरित्या त्रस्त असते तीही या बाबतीत उपचार घेण्याबाबत खूप जागरूक दिसून येते. बरेचदा आपण लोकांकडून ऐकतो की मला आता बीपी चालू आहे. डॉ. ने चेकअप बोलवलं आहे. खूप दिवसापासून माझा डोकं दुखत आहे मी एकदा डॉक्टरला भेटायला जाणार. मला शुगरचा त्रास आहे अमुक एखादा पदार्थ मी खाणार नाही किंवा माझं वजन खूप वाढल आहे त्यामुळे यावर मी लवकरात लवकर उपचार घेतले पाहिजेत
डाएट प्लॅनिंग केलं पाहिजे. परंतु या सर्व गोष्टी ही जागरूकता, हा गंभीरपणा हे सर्व शारीरिक आजार, समस्यांबाबत झालं. शारीरिक आजार आलेल्या व्यक्तीला आजूबाजूच्या लोकाकडूनही खूप support मिळतो. त्याला उपचारासाठी मदत देखील केली जाते. पाठवलं जात.
परंतु जेव्हा गोष्ट मानसिक आजारावर समस्येबाबत येते तेव्हा मात्र ती व्यक्ती ही त्याची नाते किंबहुना समाजदेखील का उदासीन का दिसतो? त्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टीने का पाहिले जाते? का बरं ती व्यक्ती उपचारासाठी तयार होत नाही का खूप काळ असा त्रास सर्वांपासून लपवून ठेवला जातो त्याचे नंतरचे परिणाम खूप गंभीर होतात. तर याची कारण ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्येच आहेत.
एखाद्याला शारीरिक आजार झाला तर त्याला व्यक्ती abnormal म्हणत नाही. तर त्यामागे काहीतरी वेगळी कारणे आहेत त्याने आजार होऊ शकतो हे मान्य केले जाते. एकंदरीत शारीरिक आजार होऊ शकतात हे मानले जाते त्या व्यक्तीला कोणत्याही लेबल लावले जात नाही. अगदी कॅन्सर झालेल्या व्यक्तीला देखील तुम्ही बरे होऊ शकता असा विश्वास दिला जातो. पण हे चित्र मानसिक आजाराच्या बाबतीत उलट होतं.
म्हणजे एखाद्याला नैराश्य येत असेल अतिचिंता येत असेल किंवा दुसरा कोणता आजार झाला असेल तर बरेचदा अशा गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाची व दुःखदायक गोष्ट अशी आहे की समाजामध्ये मानसिकरित्या आजारी व्यक्ती म्हणजे सर्वांपासून वेगळी अशी मानले जाते. Abonormal असल्याचा शिक्का तिच्यावर कुठेतरी बसतो.
बरेच प्रसार माध्यमांमधून वेगवेगळे टीव्ही,मूव्हीज मधूनही असे चित्र पाहायला मिळतं की मानसिकरित्या आजारी असलेली व्यक्ती इतरांपासून खूप जास्त वेगळी, तिच्यावर करण्यात येणारी उपचार पण खूप जास्त वेगळे असतात. त्याच्या मध्ये शॉक ट्रीटमेंट असेल आणि अजून कोणत्या गोष्टी असतील. त्यामुळे सहाजिकच ज्या व्यक्तीला हा त्रास जाणवतो, ती उपचाराला घाबरण्याची शक्यता जास्त असते. नातेवाइकांमध्ये अगदी घराच्या व्यक्तीमध्ये हे पाहायला मिळत.
आपल्या घरातील एक व्यक्ती जर एखाद्या मानसिक समस्येने त्रस्त असेल आणि तिला एखाद्या कौन्सिलर, थेरपिस्ट किंवा psychiatrist कडे नेण्याची वेळ आली तर त्यांच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे लोक काय म्हणतील काय विचार करतील? सहाजिकच हे सर्व ऐकतच समस्याग्रस्त व्यक्ती मोठी झालेली असते त्यामुळे या सर्व गोष्टींचा तिच्यावरील परिणाम होतो आणि त्यामुळे उपचार घेण्याची मानसिकता ही बदलून जाते.
म्हणून जर मानसिक रित्या समस्याग्रस्त असलेली व्यक्ती उपचारासाठी यायचे असेल तिला त्यासाठी तयार करायचं असेल तर सर्वात आधी तिच्या घरातल्या व्यक्तींनी आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे त्या बाबतची गंभीरता, जागरूकता लक्षात घेतली पाहिजे.
मानसिकता बदलायची म्हणजे काय करायचं?
१. शरीराप्रमाणे मनही आजारी पडतं:आपलं शरीर जसं विविध कारणांमुळे जसे की चुकीचा आहार, राहणीमान, बाहेरचे घटक यामुळे आजारी पडतं त्याचप्रमाणे मनही आजारी पडू शकतो ही गोष्ट त्या व्यक्तीने तसच त्या व्यक्तीच्या घरातल्या व्यक्तींनी आधी समजून घेतली पाहिजे. हा acceptance सर्वांमध्ये आला पाहिजे.
घरातल्या व्यक्तीने समजून घेण्याची गरज यासाठी आहे कारण कोणत्याही समुपदेशकापेक्षा समस्याग्रस्त व्यक्ती स्वतःच्या जवळच्या व्यक्तींवर जास्त विश्वासून असते. त्यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मोकळेपणाने त्याला होणार्या त्रासाबद्दल, तो जर एखादी अशी गोष्ट सांगत असेल तर गांभीर्याने विचार करून, ऐकून घेऊन हे सांगितलं पाहिजे की तू बरी होऊ शकते. जसं शरीर आजारी पडत तसेच मनही आजारी पडू शकत.
ज्या पद्धतीने आपल्या काही खाण्याच्या सवयी चुकल्या की आपल्या शरीरात काही बिघाड होतो त्यासाठी आपण डॉक्टर ची मदत घेतो तसेच आपल्या विचारांची दिशा कुठेतरी चुकली असेल ज्याला अनेक कारण असू शकतात त्यामध्ये त्या व्यक्तीची चूक नाही. म्हणून आपल्याला त्रास होत आहे ज्याच्यासाठी काही तज्ञ लोकांची गरज घेणे गरजेचे आहे ही जाणीव जर घरातल्या व्यक्तीने त्याला करून दिली तर ती उपचाराला येण्याची शक्यता वाढते.
२. तुझ्यामध्ये बरे होण्याची क्षमता आहेत: जेव्हा व्यक्ती मानसिक रीत्या आजारी पडते तेव्हा तिचा सगळी कडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक होतो ते स्वतःला कधीही पूर्णपणे बरा करू शकते हा विश्वास तिच्यामध्ये तसा राहत नाही आणि आजूबाजूच्या वातावरणाचा त्याच्यावर बराच प्रभाव पडतो निगेटिव्हिटी येते. परंतु प्रत्येकामध्ये काही ना काही करण्याची स्वतःला नीट ठेवण्याची क्षमता असते.
आपल्या हाताला काही इजा झाली तर आपण तू हात पूर्णपणे कामातून गेला असे म्हणतो का? किंवा हाताने कधीही काम केले नाही अस आपण म्हणतो का? नाही. त्याला बरं कसं करता येईल यावर आपण विचार करतो.मानसिकरित्या त्रस्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये ही बरे होण्याची क्षमता असतात परंतु त्यावेळी त्यांना त्याचा विसर पडलेला असतो.
जी परिस्थिती त्यांना आता हाताळता येत नसते ती कधी काळी त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली देखील असू शकते. या सर्वाची जाणीव करून देणं तू बरा होऊ शकतोस हे घरातल्या व्यक्तींनी सांगितली पाहिजे. आता ही ताकत परत मिळवण्यासाठी ही क्षमता पूर्ववत आणण्यासाठी mentally fit होण्यासाठी काही तज्ञ लोकांची मदत घेणे गरजेच असतं त्यासाठी काही उपचार महत्त्वाचे असतात पण हे उपचार घेण्यासाठी व्यक्ती तेव्हा तयार होईल तेव्हा ती बरी होऊ शकते त्याच्यामध्ये त्या क्षमता आहेत हा विश्वास तिला दाखवला जाईल.
३. प्रत्येकवेळी आपण स्वतःचे डॉक्टर होऊ शकत नाही: जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, ताप वगैरे येतो तेव्हा आपण सुरुवातीला घरगुती उपाय करतो आणि त्यातूनही आपल्याला काही साध्य होत नाही तेव्हा आपण डॉक्टर कडे जाण्याचा निर्णय घेतो. मानसिक आजाराबाबतही असं पाहायला मिळतं.
सुरुवातीला तेवढ्या गांभीर्याने न घेणे. नंतर नंतर इकडून तिकडून मिळणाऱ्या अपुर्या माहितीच्या आधारे स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत असते. बरेचदा इतर लोक काय म्हणतील ही चिंता देखील यात असतेच. परंतु व्यक्तीने हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक वेळी आपण स्वतःला पूर्णपणे बरा करू शकत नाही काही वेळ अशी येते जेव्हा आपल्याला दुसऱ्या कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो त्या पद्धतीने आपल्याला उपचार घ्यावे लागतात.
म्हणूनच मानसिक आजार असलेल्या व्यक्तीने पूर्णपणे स्वतःवर अवलंबून न राहता किंवा इतरांवर अवलंबून न राहता एखाद्या तज्ञ माणसाची मदत घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण दर वेळी स्वतःचे डॉक्टर होऊ शकत नाही दर वेळी आपल्याला बरं करणार फक्त आपल्याच हातात आहे ही गोष्ट डोक्यातून काढून टाकली. जर हा विचार बाजूला केला, त्या व्यक्तीला हे समजावलं तर ती उपचाराला येऊ शकते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


