मानसिक आरोग्याचं महत्व खरंच आपल्याला कळलंय का?
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये आपल्याला आपल्या मानसिक क्षमतांविषयी पूर्ण जाणीव असते, आणि आयुष्यातल्या सामान्य ताणतणावांचा आपल्याला सामना करता येतो.
पण आज किती लोकांना खरंच याच महत्व पटलेलं आहे? आपल्याकडे आज ही डोकं दुखत असल्यास अगदी सहजपणे गोळी घेतली जाते, त्याविषयी आपण सांगतो देखील बिन्धासपणे की, माझं बाबा डोकं दुखतंय. शारीरिक दुखणी आपण सहजपणे share करतो. त्यांचा बाऊ केला जात नाही. पण मानसिक आरोग्याविषयी बोलणं मात्र आपण टाळताना दिसतो. का बरं आपण असं करतो?
मानसिक आजार झालेली माणसं देखील बरी होत असतात. पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच माणसांचा वेगक असतो. आणि मुळातच मानसिक रित्या काही त्रास होत असेल तर आपल्याला मानसिक आजार असेलच असा अर्थ नसतो. मुळात मानसिक आजार म्हणजे वेड्याची लक्षण ही व्याख्याच खूप चुकीची आहे. मानसिक आजार खूप प्रकारचे असतात.
आपल्याला आधीच त्यांच्याबद्दल माहिती कमी असते त्यात आपल्याला ताणतणाव जाणवला आणि तो जास्त दिवस राहिला तरी आपण तेवढ्या सहजतेने थेरपिस्ट कडे जात नाही जेवढ्या सहजतेने सर्दी,ताप असल्यावर आपण डॉक्टर कडे जातो. मानसिक रित्या निरोगी राहणं देखील तेवढंच गरजेचं असत जेवढं शारीरिकरीत्या निरोगी राहणं असत.
आपल्यामध्ये मानसिक रित्या होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामध्ये होणारे नकारात्मक बदल जास्त दिवस राहिल्यास त्याचा परिणाम खूप भयानक देखील होऊ शकतो. त्यामुळे वेळीच खबरदारी घेतली तर आपल्यासाठी ते योग्य असेल. मानसिक आरोग्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसत असतो.
वाईट दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, पण त्याचा अर्थ आपलं आयुष्य वाईट आहे असा होत नसतो. पण तो वाईट दिवस आपण कसा हाताळतो, आणि त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ देतो, हे आपल्या मानसिक आरोग्याविषयी बरंच काही सांगून जातं. मानसिक आरोग्य हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच महत्वाचं असत.
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं दिसून येत. त्यासाठी कुठेतरी आपण सगळेच जबाबदार आहोत. मानसिक आजार, मानसिक आरोग्य यावर चर्चा सुद्धा निषिद्ध असलेली दिसून येते. म्हणजे ज्याविषयी आपण मोकळेपणाने उघड-उघड बोलू शकत नाही, त्याविषयावर उपचार घेणे तर लांबच राहील. म्हणजे इतकी भीती आपल्याला का वाटावी की आपण हे विषय उघडपणे बोलू देखील शकत नाही?
आपण प्रत्येक जण आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या स्टेज ला डिप्रेशन मधून गेलेलो असतो. बऱ्याच लोकांना ही नैराश्यता लक्षात सुद्धा येत नाही. आणि काहींना आली तरी ते उघडपणे सांगतीलच असं नाही. काही वेळा आपण त्यातून सावरून पूर्ण बरे देखील होतो. पण जे अभागी लोकं डिप्रेशन मधेच राहतात आणि त्याचा शेवट हा आत्महत्येने होतो तेव्हा ते डिप्रेशन किती विध्वंसक आहे याची प्रचिती येते. पण खरंच याची गरज का पडावी? आपण सगळे एकमेकांसाठी इथे असून ही एखाद्याला का इतकं एकटं वाटावं? का असं वाटावं की आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच त्यांना दिसत नाही.
बऱ्याच वेळा मानसिक रित्या त्रासात असलेल्या माणसाला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायचं सोडून त्याला मांत्रिक, तांत्रिकाकडे जायचा सल्ले देणारी माणसे सुद्धा आपण बघतो. ज्याचं मन आजारी आहे त्याला तांत्रिक किंवा मांत्रिक कसं बरं करू शकतील? तरी सुद्धा या लोकांकडे जायचा मार्ग जास्त सोप्पा वाटतो एखाद्या मानसोपचार तज्ञापेक्षा. आणि एवढं करून देखील तो माणूस बरा होत नाही, तरीदेखील तेव्हा लोकांना कळत नाही.
हे सगळं आपण बदलू शकतो. जेव्हा आपण आपल्या स्वतःपासून उघडपणाने या विषयांवर बोलणे चालू करू, तेव्हा या विषयाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. कोणत्या गोष्टी कोणत्या आजाराची लक्षणे आहेत, आणि वेळीच लक्ष दिलं तर आपण कसे यातून सही-सलामत निरोगी होऊन बाहेर पडू शकतो हे सर्वांच्या लक्षात येईल. आणि जे आजार असे आहेत ज्यातून पूर्ण बरं होणं शक्य होत नाही,
त्यांचही प्रमाण कमी करून आपलं आयुष्य जमेल तितकं सुलभ करता येऊ शकत हे ही सगळ्यांना कळेल.आणि सगळ्यात महत्वाचं हे की कोणताही आजार होण्या आधीच जर आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर आपल्यावर अशी वेळ येण्याची शक्यताच खूप होऊन जाईल. पण त्यासाठी असे विषय सहजतेने बोलता येतील असं वातावरण आपण निर्माण करणं गरजेचं आहे. समाज तेव्हाच बदलतो जेव्हा प्रत्येक जण स्वतःपासून सुरुवात करतो. त्यामुळे आपण स्वतःपासून सुरुवात करून आपली जबाबदारी पार पाडूयात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


