Skip to content

मानसिक आजारावर उपचार घ्यायला संकोच का वाटतो??

मानसिक आजारावर उपचार घ्यायला संकोच का वाटतो??


मयुरी महेंद्र महाजन


अगोदर आपण मानसिक आजार समजून घेऊ ,जसे की शारिरिकरित्या झालेली जखम ,इजा, वेदना हे लवकर बरे व्हावे आणि आपण त्यातून लवकर चांगले होऊन पहिल्यासारखे ठणठणीत असायला हवे, हे आपली सरळ साधी अपेक्षा परंतु मनाच्याही बाबतीत असे आजार असतात, त्याला उपचाराची गरज असते, हे मात्र तितकेसे सहज स्वीकारता येत नाही, आता त्यालाही बरीचशी कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती ‘वेडी’ आहे, व त्यावर कितीही उपचार केले, तरी त्या व्यक्तीला सामान्य माणसासारखी वागणूक दिली जात नाही, म्हणून आपल्याला वेड लागलंय हे जर कोणाला माहिती झाले, तर सायको नावाचं लेबल आपल्यावरती कायम साठी चिकटवले जाईलं, अशी कायम भीती असते ,

आता ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहे ,तीच व्यक्ती ते पूर्णपणे स्वीकारू शकत नाही, किंवा स्वीकारतच नाही, मला काय झालंय, मला काही झालेले नाही, अशा प्रकारे ती व्यक्ती बोलताना दिसते , किंवा मग बोलतच नाही ,एखाद्या भीतिच्या भावनेत अडकून एकांतात राहणे पसंद करते, ज्या व्यक्ती आपल्या समस्यांना लपवण्याचा प्रयत्न करतात, तितकेच त्यांच्यासाठी त्या समस्या वाढू लागतात, त्यासाठी संवाद होणे गरजेचे आहे, आजकाल संवादाची साधने तर वाढली, पण मनाचा मनाशी होणाऱ्या संवादाची पातळी मात्र घटलेली बघायला मिळते,

खरतर हे वास्तव आहे, की मानसिक आजारावरती उपचार घ्यायला संकोच वाटतो, पण का?? त्याची खूप मोठी यादी सांगता येईल ,खरंतर पण हा संकोच बाजूला वेळेस सावरला नाही, तर मात्र आपणच आपल्या खूप मोठ्या नुकसानाला जबाबदार ठरणार, हे मात्र नक्की आधी मानसिक आजाराबद्दल संकोच असल्याची कारणे बघूया, नंतर त्याबद्दलच्या गैरसमजुती,व एका समुपदेश काकडून त्या व्यक्तीने आपल्या होणाऱ्या नुकसानाची जागीच कळ बसवून आज समृद्धपणे जीवनाला अनुभवण्याचा एक अनुभवही बघूया…

मानसिक आजार होणे , म्हणजे खूप मोठे पाप आहे, हे होणे म्हणजे जीवनाचा अंत आहे ,असा समज असणे ,ज्या समाजात ज्या सोसायटीत आपण राहतो ,त्यात आपल्या नावाला किंवा आत्तापर्यंत आपण कमावलेल्या रेपुटेशनला पहिल्यासारखी कुणी ईज्जत, सन्मान देणार नाही, नातेवाईकांमध्ये आपल्याला खाली बघावे लागेल, आणि most important ज्याला आपण मानसिक आजार समजतोय, खरतर तो मानसिक आजार नाहीय, थोडं फार काही झालं असेल म्हणून कदाचित आपल्याला असं वाटतेयं,या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा मानसिक आजाराची लक्षणे सौम्य असतात, तेव्हा त्यातून बाहेर पडणे सोपे असते ,म्हणजेच आपण त्यावर उपचार घेतल्याने लवकर बाहेर पडता येते, परंतु आपल्या विचारांचे दुर्दैव म्हणावे की आपला समाज प्रणालीचे ते यासाठी की आपल्याकडे मानसिक आजारावर ती उपचार घ्यायला व्यक्ती तेव्हा तयार होते, जेव्हा लक्षणे अति प्रमाणात दिसू लागतात ,तेव्हा ते सहन करण्याच्या पलीकडे असते, तेव्हा त्यावर उपचार होण्याचा विचार होतो ,

काही ठिकाणी खास करून ग्रामीण भागात, जिथे आजही लोक अज्ञानात वावरतात, त्या ठिकाणी मानसिक आजारावर ती अघोरी पद्धतीने उपचार होतात, त्यात पेशंटला कितीतरी वेदना असह्य जखमांचा सामना करावा लागतो, आणि यालाच देवाचं, भूत पिशाच्च याचं नाव दिलं जातं, वेळप्रसंगी सहन न झालेल्या वेदनेमुळे काहींना जीवालाही मुकावे लागते, त्यासाठी देवाला हेच मान्य होते, असेही सांगितले जाते,

लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल्या गेलेल्या गोष्टी आपण उघडपणे पाहण्याचाही कधी विचार करत नाही, आणि विश्वासाने आपल्या समस्या कुणापुढे आणि का ??मांडाव्यात असाही प्रश्न पडतो, मानसिक आजारावर ती उपचार घ्यायला संकोच यासाठी पण वाटतो, की लोक काय म्हणतील, लोक आपली बदनामी करतील, नाव ठेवतील, नाही ते बोलतील, त्याला सामोरे जायची मनाची तयारी नसल्यामुळे किंवा आपल्या व आपल्या घरातील व्यक्तींच्या मानसिक आरोग्याला महत्त्व देण्यापेक्षा, आपल्याला लोकांच्या म्हणण्या, बोलण्याची जास्त काळजी असते,

एका प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर मॅडमांचा पाच वर्षांचा मुलगा त्या स्वतः डॉक्टर असल्या तरी त्यांनी घेतलेले शिक्षण हे वेगळ्या फिल्ड मध्ये होते ,जेव्हा त्यांचा मुलगा लहान होता ,म्हणजेच अगदी दोन वर्षाचा होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सुरळीत होता, परंतु दोन वर्षाच्या नंतर दोन ते चार वर्षात त्याच्याकडून भरपूर काही गोष्टी करून घेण्यात आल्या, लहान मुलांचे पुस्तक असतील, रंगरंगोटी असेल, एबीसीडी असेल, 1,2,3, असतील अशा बऱ्याच गोष्टी तो मुलगा अगदी वाढत्या वयापेक्षा हि वेगाने शिकला, परंतु याच वेळेला मध्यंतरी आई-वडिलांचा न मिळणारा वेळ, कमी मिळणारे प्रेम, कामाच्या धकाधकीच्या जीवनात त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष ,तो मुलगा एकटा राहू लागला, स्वतःच्या जगात वावरू लागला, एकंदरीत स्वमग्न झाला बोलणे नाही, खेळणे नाही, एकाच गोष्टीकडे एकटक पाहणे, न्याहाळत बसणे, चिडचिड करणे, झोपेतून दचकून उठणे, त्याच्या वागणुकीत झालेले बदल, त्यांनी शिकलेल्या सर्व गोष्टी तो विसरून गेला, आणि त्यांच्यातील हे बदल घरातील सर्वाना जाणवत होते, पण लहान आहे येईल समज असं न करता, त्या डॉक्टर मॅडमांनी वेळीच समुपदेशकांची मदत घेतली, व तो कुठल्याही गोष्टीला क्रियेला प्रतिक्रिया देत नसल्याचे सांगितले,

Engegment therpy आहे, ज्याचा अर्थ जुळवून घेणे, असा होतो ,या थेरपीचा वापर करून त्या मुलाला खेळण्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्याला इंटर पर्सनल रिलेशन, क्रियेला प्रतिक्रिया देण्याचे, त्याच्या इवल्याशा बालमनात तयार झालेले ब्लॉक, सुरळीतपणे करण्याचे काम त्या थेरपीने केले, पहिल्यापेक्षा आता तो खूप छान पणे प्रतिक्रिया करतो, अजूनही त्यासाठी उपचार सुरू आहेत,

परंतु सांगणे एकच आहे, मनात उद्भवणारा संकोच हा वेळिचं सावरला नाही, तर होणाऱ्या नुकसानाला आपणच जबाबदार असू, शारीरिक असो वा मानसिक सर्व गोष्टींपेक्षा आपल्यासाठी आपले आरोग्य प्रथमतः महत्वाचे असावे ,तुम्हाला काय वाटते….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!