Skip to content

मानसिकता चांगली असते तेव्हा आजारातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागत नाही..

मानसिकता चांगली असते तेव्हा आजारातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागत नाही..


सौ. मिनल वरपे


दवाखाना.. डॉक्टर… गोळ्या… औषध.. पथ्य.. हे खाऊ नका ते खा.. हे करू नका ते करा.. जगतोय पण जगण्यापेक्षा जास्त तळमळतोय.. सतत हा आजार तो आजार.. एकातून बाहेर पडावं तर दुसरा आजार आपली जणू वाटच पाहत असतो.. शारीरिक व्याधींनी आपल्याला इतका त्रास होतोय की कशातच मन लागत नाही…

मुळात आपण सहज म्हणतो की मला हा शारीरिक आजार आहे… पण हे सर्व शारीरिक आजार, आपले दुखणे याच कारण काय असेल तर आपल बिघडलेलं मानसिक संतुलन…

शारीरिक स्थिती बिघडली हे बोलणं आपल्याला अजिबात अवघड वाटत नाही.. अगदी सहज आपण शारीरिक आजार असल्याचं कोणालाही सांगतो..पण मानसिक संतुलन बिघडले हे बोलायला आपल्याला त्रास होतो खर तर आपलं स्वतःचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे आपणच आधी स्वीकारत नाही..

शारीरिक स्वास्थ्य जर उत्तम ठेवायचे असेल तर आधी मानसिकता बदलण्याची, उत्तम ठेवण्याची जास्तीत जास्त गरज आहे.. अगदी साधच बघितल तर कितीही महागड्या दवाखान्यात गेलो. तिथे उपचार सुरू केले, कितीही गोळ्या औषध घेतले तरीही त्या सर्वाचा परिणाम होण्यासाठी आपल्याला आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्याची गरज असते..

नाहीतर गोळ्या घेताना आपण सहज म्हणतो की कायमाहीत या गोळ्यांनी तरी बरं वाटेल की नाही..?? ज्यावेळी आपल्याच मनात असे नकारार्थी विचार असतात त्यावेळी कितीही महाग गोळ्या असोत किंवा स्वस्त…परिणामकारक जरी असल्या तरी आपल्या चुकीच्या मानसिकतेमुळे त्यांचा काहीच परिणाम आपल्याला जाणवणार नाही..

कोणत्याही गोष्टीचा किती विचार करावा याला काही मर्यादा असतात.. मुळात काय घडलं किंवा काय घडतेय याचाच सतत विचार केल्याने अतिविचार या मानसिक त्रासाला आपल्याला सामोरे जावे लागते आणि त्यामुळे डोकेदुखी, ताप, डिप्रेशन यासारखे शारीरिक आजार आपल्याला सतावतात..

मग यावर आपण कितीही गोळ्या घेतल्या , मोठमोठे डॉक्टर केले तरी बाहेर पडणं अवघड जाते यातून बाहेर पडायचं असेल तर आधी आपली मानसिकता बदलण्याची गरज असते.. काय घडतेय.. काय घडणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय करता येईल.. त्यावरील उपाय, वेगवेगळे मार्ग आपण जर शोधले तर कोणत्याच मानसिक आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या शारीरिक आजारांना आपल्याला बळी पडावं लागणार नाही…

काहीजणांना अगदी छोटासा आजार झालेला असतो.. पण यातून मी बरा होणार की नाही.. मला यातून बाहेर पडता येईल का.. या आजारामुळे मला पुढे भयंकर असा कोणता आजार तर होणार नाहीना .. मी जगेन की नाही अशा मानसिकतेमुळे अगदी छोट्या आजारातून बाहेर पडणं सुद्धा आपल्याला अवघड जाते आणि काहीवेळेस त्या छोट्या आजारच कधी मोठ्या व्याधीत रूपांतर होईल हे सुद्धा कळत नाही.. पण या सर्वाला जबाबदार असते ती आपली मानसिकता..

असेही व्यक्ती आपल्याला भेटतात ज्यांना भयंकर आजार असतो.. असे आजार ज्यातून बाहेर पडणं म्हणजे नविन आयुष्य मिळवणे.. पण इतका मोठा आजार असताना सुद्धा मनात सकारात्मकता ठेवण, या आजारातून मला बाहेर पडायचचं आहे अशी मानसिकता त्यांना या आजारातून सुद्धा सहज बाहेर काढते..

मनातील भीती.. नकारात्मक विचार.. नको त्या गोष्टींचा म्हणजेच जे घडणार नाही अगदी त्याचापण विचार करण्याची चुकीची सवय… आजाराविषयी पूर्ण माहिती न घेता उगाच त्या आजाराला घाबरून मनःस्थिती बिघडवणे… या सगळ्यामुळे आपली मानसिक संतुलन बिघडते.. आणि आपल्याला शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते..

बहुतेकदा आजार झालेला सुद्धा नसतो.. पण त्या आजाराबद्दल सतत ऐकणे.. त्यामुळे त्याची भीती वाढते .. सतत त्याचा विचार करून लक्षण ऐकून काहीवेळेस आपल्याला कधी तो आजार जाणवतो हे आपल्याला कळत नाही.. कारण आपण स्वतःच स्वतःची मानसिकता बिघडवलेली असते..

म्हणजेच कोणत्याही शारीरिक आजाराच कारण हे मानसिक आरोग्यावर अवलंबून असते.. जेव्हा आपल्याला आपल मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण जमेल त्यावेळेस कोणत्याही शारीरिक आजाराची भीती न बाळगता आपल्याला त्यातून सहजरित्या बाहेर पडता येईल.. आणि मानसिकता जेव्हा चांगली असते तेव्हा आजारातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागणार नाही.. म्हणून जास्तीत जास्त सकारात्मक राहील तर आपली मानसिक स्थिती उत्तम राखेल आणि आपल्याला कायम सदृढ आणि सक्षम करेन..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!