Skip to content

माणूस एकाकीपण कधीच सहन करू शकत नाही !

एकाकी


गणेश न.चरपे


विलासरावांच्या डोळ्यांतून अक्षरशः अश्रू सांडत होते. आता कंटाळले होते ते, या एकाकीपणाला आणि गुडघ्याच्या दुखण्याला. हे सर्व त्यांना आता असह्य होत होतं….

आपण केव्हा मरून पडू कुणाला माहिती ही होणार नाही. आपले शरीर जागेवरच सड़ते की काय ? अशी भिती त्यांना नेहमीच वाटायची. वयाची ७५ वी गाठली होती त्यांनी. त्यांना जवळचे असे कुणीच राहिले नव्हते. दोन वर्षांपूर्वीच अल्पशा आजाराने पत्नी वारली तेव्हापासून खूपच एकटे पडले होते विलासराव.

एक मुलगा होता परंतु तो ही कार ऍक्सीडेन्ट मध्ये मरण पावला पाच वर्षापूर्वीच. मुलगी विदेशात राहते… तिला खूप काळजी वाटते बाबांची पण ती ही काही करू शकत नाही लांब असल्यामुळे. पंधरा दिवस झालेत नोकर काम सोडून गेला. खूप गयावया केल्या विलासरावांनी त्याच्या… पगार वाढवून देतो म्हणाले. परंतु घरकामा व्यतिरिक्त काहीच करणार नाही म्हणाला.

विलासरावांना गुडघे दुखीचा त्रास असल्याने संडास बाथरूमला नेणे आणणे, आयुर्वेदिक तेलाने मालिश करणे इत्यादी कामांसाठी आगाऊ पैसे देण्याचे ही कबूल केले, तरी तो नाही म्हणाला आणि काम सोडून निघून गेला. कुणीच यायला तयार होत नाहीत कामावर.

सकाळ संध्याकाळ फक्त जेवणाचा डबा घेऊन तो मुलगा येतो, बेल वाजवतो आणि डबा ठेऊन निघून जातो. त्या व्यतिरिक्त घरात कुणीच येत नाही. पंधरा पंधरा दिवस तर त्यांना माणसांचे दर्शन घडत नाही. गुडघेदुखी मुळे चालणे फिरणे, घराबाहेर पडणे बंद झाले.

मोठ्या त्रासाने वाकरच्या मदतीने संडास बाथरुम पर्यंत पोचतात. होणाऱ्या त्रासामुळे अक्षरशः रडतात ते, पण काय करणार, आजार आणि हा एकाकीपणा आता त्यांना असह्य होत चालला होता. प्रचंड संपत्तीचे मालक होते ते. परंतु पैसे देऊनही त्यांची सेवा करायला यायला कुणीच तयार होत नव्हते.

नोकरीत असताना वेगळीच ऐट होती, दरारा होता त्यांचा ऑफिसमध्ये. सगळे कर्मचारी लांबूनच राहत. कामाव्यतिरिक्त सहसा कुणी त्यांच्यासोबत जास्त बोलत नसे. शासकीय कार्यालयात क्लास वन ऑफिसर पदावरून निवृत्त झाले ते. छान सेंड ऑफचा कार्यक्रम झाला पण तदनंतर ऑफिस मधून कुणी त्यांना भेटायला किंवा तब्बेत विचारायला आले नाही.

नातेसंबंधात आधीपासूनच त्यांना फारसे स्वारस्य नव्हते. त्यामुळे नातेवाईक फारसे कुणी त्यांच्याकडे भटकत नसत. गावाकडे लहान भाऊ आणि त्याचा परिवार आहे. परंतु संपत्तीच्या वादावरून कोर्टात केस सुरू असल्याने त्यांनी ही संबंध तोडले. एक लहान बहीण येत होती दरवर्षी भाऊबीज, रक्षाबंधनला परंतु दहा वर्षांपासून ती सुद्धा आली नाही.

स्वभावामुळे मित्रही फारसे जुळले नाही. वयानुसार रक्तातील रग उतरत गेली विलासरावांची पण आता खूप वेळ झाली होती. पैसा बक्कळ होता त्यांच्याकडे पण आता म्हातारपणात हवी हवीशी वाटणारी प्रेमाची माणसे उरलीच नव्हती त्यांच्याजवळ, त्यांच्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे.

आता हा एकाकीपणा त्यांना असह्य वाटत होता… कुणीतरी म्हटले आहे, ‘एकांतवास ही खूप मोठी शिक्षा आहे माणसाकरिता… माणूस सर्व सहन करू शकतो परंतु खूप काळ एकांत सहन करू शकत नाही…’

म्हणूनच प्रेमाची माणसे जपा… तीच तुम्हाला तुमच्या कठीण वेळेत सहाय्य करतील…

सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन….



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!