“माणसं झटपट मरत आहेत, त्याचा आपल्याला होणारा मानसिक त्रास कसा सावरावा….”
मधुश्री देशपांडे गानू
“जन्म आणि मृत्यू जीवनाची दोन सत्य,
हेच आदिम, अंतिम आणि रहस्य”
माझा “मृत्यू” या कवितेतील सुरुवातीच्या ओळी. त्रिकालाबाधित सत्य दोनच जन्म आणि मृत्यू. जन्माला येणारी कोणतीही व्यक्ती ही कुटुंबासाठी आनंद घेऊन येते. नवीन जन्माला आलेल्या जीवाचे किती स्वागत, कोडकौतुक, सोहळे होतात. अनेक नाती जोडतो हा इवलासा जीव. पण मृत्यू मात्र अगदी दुःखदायक, वेदनादायक असतो.
आपलं प्रेमाचं माणूस कायमस्वरूपी आपल्यातून निघून जाणं अत्यंत क्लेशकारक असतं. पुन्हा ते माणूस काही केल्या दिसणार नसतं. अनंत चांगल्या-वाईट आठवणी ठेवून माणूस निघून जातो. मागे राहिलेल्या जिवलगांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतात. कायम विरहाच दुःख सहन करण्यापलीकडे असतं. आपलं माणूस आता आपल्यात नाही, त्याचा वावर कुठेही नाही, त्याच्याशी संवाद आता होणार नाही, हक्काने रागवता येणार नाही, स्पर्शाचं सुख नाही हे सगळं खरंच इथे शब्दात मांडणं अशक्य आहे.
कितीतरी दिवस नुसते भास होत राहतात त्या व्यक्तीचे. विश्वास तर बसतच नाही. मन मानायला तयार होत नाही. आपणही जगू नये असं वाटतं. अनेक माणसांना अशा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने जबरदस्त धक्का बसतो. यातून ती बाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्या रोजच्या जगण्यावर विपरीत परिणाम होतो. शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडते. या धक्क्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. नातलग, मित्र-मैत्रिणी जर बरोबर असतील तर लवकर सावरता येते. काही माणसे मुळातच मानसिक दृष्ट्या सकारात्मक, सक्षम असतात जरी कायमस्वरूपी हे दुःख त्यांच्याबरोबर राहणार असेल तरीही त्यांना यातून लवकर सावरता येतं.
सध्या दीड दोन वर्ष कोविड काळात आपण मृत्यूचं अक्षरश तांडव पाहतो आहोत. अगदी चांगली धडधाकट, कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुष, नातेवाईक, ओळखीपाळखीचे आजूबाजूला दिसणारी माणसं हां हां म्हणता मृत्युमुखी पडलेली आपण पाहिली आहेत. काही घरात तर एकाच वेळी अनेक मृत्यू झाले आहेत. हे सगळे अक्षरशः मानसिक दृष्ट्या हादरवणारं आहे. काल दिसणारं माणूस आज दिसेल की नाही याचा भरवसा उरलेला नाही.
ज्यांच्या घरात असे अकस्मात मृत्यू झालेत अशांची तर अवस्था अगदी शोकात्मक आहे. काय आणि कसं सांत्वन करायचं? कोणी कोणाचं करायचं? ज्या सतत ओळखीच्या आणि अनोळखी मृत्यूच्या बातम्या रोज ऐकतो आहोत त्याने प्रचंड भीती संपूर्ण समाजमनावर पसरली आहे. आपल्या घरात सुदैवाने असं काही घडलं नसलं तरीही रोजच्या बातम्या ऐकून सगळीकडे प्रचंड नैराश्य पसरले आहे. सगळेच भीतीच्या दडपणाखाली वावरत आहेत. आज समुपदेशनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे.
अशा अतिशय निराश काळातून आपण जात आहोत. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सगळ्या स्तरावर याचा प्रचंड नकारात्मक परिणाम झाला आहे. मग अशा या कठीण काळात टिकून कसं राहायचं? आपलं प्रेमाचं माणूस अचानक आपल्याला सोडून गेलं आहे हे वास्तव कसं स्वीकारायचं? आपलं आयुष्य अतिशय दुःखद प्रसंगी ही नीट मार्गी कसं लावायचं? यातून बाहेर पडून पुन्हा सुरळीत कसं जगायचं??असे अनेक प्रश्न आज बहुसंख्य जनतेसमोर उभे आहेत.
मला माहित आहे हे लिहिणे आणि त्या प्रसंगातून जाणं, ते दुःख अनुभवणं या खूपच वेगळ्या गोष्टी आहेत. मी स्वतः चार वर्षापूर्वी या प्रसंगातून गेले आहे. अशा परिस्थितीत आपण कसे टिकून राहू शकतो ते पाहू.
सर्वप्रथम कितीही अकस्मात, अचानक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ही घटना काही केल्या आपण बदलू शकत नाही. तुम्ही कितीही दुःख केलंत, घरात बसून राहिलात, रडत राहिलात तरीही गेलेली व्यक्ती परत येणार नाही, हे दुःखद वास्तव आपण जितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर आपण यातून बाहेर पडू. प्रेमाच्या व्यक्तीशिवाय जीवन जगणे अशक्य आहे असं वाटतंच. पण इतरही प्रेमाची माणसे आपली असतात ना! त्यांच्यासाठी आपण जगायचं. आणि स्वतःसाठीही. प्रत्येकाचे श्वास ठरलेले असतात.
यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. आपलं माणूस तर गेलं. ही हानी कधीच कोणीही भरून काढू शकत नाही. या पोकळी सकटच आपल्याला आता जीवनाला सामोरं जायचं आहे हे स्वीकारायला हवं. तुम्ही सतत दुःखी राहिलात तर तुमच्या गेलेल्या प्रेमाच्या माणसाला ते आवडेल का? याचा विचार करा. “आत्मा अमर आहे.” अशी आपली श्रद्धा आहे. आत्म्याचा पुढचा प्रवास सुरळीत होण्यासाठी आपण सतत त्याच्या आठवणीनी दुःख करणे योग्य नाही.
त्याच्या छान सुंदर आठवणी मनात जपून ठेवा. एकत्र घालवलेले सुंदर क्षण कायम स्मरणात ठेवा. त्याला जे आवडत होतं ते करा. त्याचं अर्धवट राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा. सकारात्मक ऊर्जेच्या स्वरूपात ती व्यक्ती तुमच्या बरोबर आहे हे कायम लक्षात ठेवा.
मृत्यूचे स्वरूप कळल्यानंतर माणसाला जीवनाचा खरा अर्थ लक्षात येतो. कालच्या भूतकाळाच्या आठवणींनी दु:खी होऊ नका, आणि भविष्यकाळाचा फार विचार करू नका. “आत्ताचा क्षण माझा आहे आणि मी तो भरभरून आनंदाने जगणार.” कारण आयुष्याचा काय भरवसा???
हे प्रत्येकाने आज लक्षात ठेवायची गरज आहे की वेळ कधीच एकसारखी नसते. आज काळ वाईट आहे पण वेळ, परिस्थिती बदलतेच. म्हणजे हेही तात्पुरते आहे. चांगले दिवस येणारच. अगदी जवळची व्यक्ती, आजूबाजूची रोजच्या दिसण्यातली माणसे अशी निघून गेलेली पाहून दुःख तर होणारच. पण इथेच अडकून पडायचं नाही. त्यांची सोबत इथपर्यंतच होती असं म्हणून आपला प्रवास चालू ठेवायचा.
“जीवन प्रवाही आहे.” नैराश्याच्या गर्तेत अडकायचे नाही. सकारात्मक विचारांनी मनातील आशा, स्वप्नं जिवंत ठेवायची. त्यासाठी प्रयत्नशील राहायचं. मन आणि शरीर सतत कोणत्या तरी चांगल्या कामात, समाज कार्यात, तुमच्या आवडीच्या छंदात रमवायचं. “रिकामं मन/ डोकं सैतानाचं घर असतं.” असं म्हणतात. मग त्याला रिकामं राहायला वेळ द्यायचा नाही.
नातलगांच्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहा. भेटू शकत नसलात तरी आवर्जून फोन करा. मनमोकळा संवाद साधा. आहेत ती नाती मनापासून, प्रेमाने जपा. हे ही दिवस नक्की जातील ही आशा बाळगा. सकारात्मकतेने आपल्या माणसांसोबत एक नवीन सुरुवात करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


