“माझा आनंद तुझा आनंद झाला तर चालेल पण माझं दुःख तुझं दुःख होऊ नये.”
मधुश्री देशपांडे गानू
“आनंद सांगावा जनांत आणि दुःख ठेवावं मनात”
असं म्हणतात ना! आपले सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे म्हणतात.. नेमके शब्द आता आठवत नाहीत पण मतितार्थ असा की, ” माणसं आधीच परिस्थितीने गांजलेली, त्रस्त असतात. मग आपलं लिखाण हे त्यांना हसवणारे आनंद देणारं असावं. ” मला हे फार आवडलं. मीही प्रयत्न करते शक्यतो आनंददायी, सकारात्मक लेखन करण्याचा.
सुख आणि दुःख, आनंद आणि निराशा अत्यंत मूलभूत प्रखर भावना आहेत. मनाला, शरीराला सौख्य, आनंद देणाऱ्या गोष्टींनी, माणसांनी आनंद होतो. आणि मनाविरुद्ध वागणारी माणसे, घटना-प्रसंग दुःखी, निराश करून जातात. खरं म्हणजे या भावना व्यक्तिसापेक्ष आहेत. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, जडण-घडण, संस्कार, परिस्थिती, विचार प्रक्रिया यावर त्याच्या सुखदुःखाच्या कल्पना अवलंबून असतात.
प्रत्येकाच्या या भावना आपापल्यापरीने वेगळ्या असतात. आपल्या लहानपणापासूनच आपण ऐकत आलेलो असतो, अनुभवत असतो. एखादी आनंदाची घटना घडली तर जरूर सर्वांना आवर्जून सांगावी. पण दुःख मात्र सांगू नये. आपल्या दुःखाने कोणाला दुःखी करू नये.
पण अगदी आपले कुटुंबीय, प्रेमाची माणसं यांना आपण जसा आपला आनंद सांगतो, त्याचप्रमाणे दुःखी करणार्या गोष्टीही सांगतोच. नव्हे सांगायलाच हव्यात. कारण त्याने तुमचं नैराश्य, दुःखाची तीव्रता कमी होते. त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हांला मिळू शकतो. त्यामुळे सगळ्या भावभावना वाटून घेणे, सांगणे हे गरजेचं असतं. समाजाचा विचार करता आनंद लपून राहत नाहीच ना! तो सर्वांना कळतोच. आपण भारतीय तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही आनंदोत्सव करतो. आणि करावाच.
आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या यशस्वी, आनंददायी घटना आपण शेअर केल्या तर आपला आनंद द्विगुणीत होतो. आता काही व्यक्ती असतात ज्यांना तुमचा आनंद बघवत नाही. तुमचे यश त्यांच्या डोळ्यांत खुपते. अशांचा विचारही करायची गरज नाही. आपण आपला आनंद लोकांसाठी मिळवत नाही. तर आपल्या सुखासाठी, आनंदासाठी, मानसिक समाधानासाठी मिळवतो, हे कायम लक्षात ठेवा. स्वतःला प्राधान्य द्या.
तुमचा आनंद, यश हे सांगताना, साजरं करताना कोणालाही कमीपणाची भावना येऊ देऊ नका. कोणाला कमी दाखवण्यासाठी हे करू नका. कोणाबरोबर स्पर्धा म्हणून तर करूच नका. तुमचा निर्भेळ, निर्मळ आनंद सहजतेने शेअर करा. तुमच्या सारखाच आनंद सगळ्यांना मिळू दे अशी आशा बाळगा. दुसऱ्यांच्या आयुष्यातला आनंदही तुम्ही मोकळ्या मनाने स्वीकारा. त्याचं मोकळेपणाने कौतुक करा. बघा तुम्ही किती सहज आनंदी होता!
स्वतःचे दुःख मात्र स्वतःजवळ ठेवा. ते सहज कोणाला कळू देऊ नका. याचा अर्थ असा की तुम्हांला जर एखाद्या आकस्मिक घटनेला सामोरे जावे लागले, एखाद्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले, तुमचं प्रेमाचं माणूस कायमचं गमवावं लागलं तर त्याने होणारं अतोनात दुःख तुम्ही अनुभवलेलं असतं.
आणि “परदुःख शीतल असतं”. त्याची तीव्रता जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत समोरच्याला कळत नाही. तर हेच दुःख भोगताना, अनुभवताना असं दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशा प्रसंगाचा सामना कोणाला करावा लागू नये यासाठी आपण प्रार्थना करायची. खूप लोकांना अशी सवय असते, सतत स्वतःचे दुःख लोकांना सांगायचं.
स्वतःच्या दुःखाचा, कमनशिबी असण्याचा बाजार मांडायचा. असे अनुभव खूप येतात. कोणी नातलग, एखादा मित्र, एखादी मैत्रीण अशी असतेच फक्त स्वतःच्या आयुष्यातली दुःख, तक्रारी तुम्हांला सांगत असते. सतत नकारात्मक बोलते. अशावेळी तिचं नैराश्य तुम्हांलाही येऊ शकतं.. खरंतर हे सर्वांनीच टाळायला हवं. आपल्या आनंदाबद्दल सहज बोलण्याची आपण सवय करून घ्यायला हवी.
प्रत्येक मानवाला आपल्या आयुष्यात सगळ्याच चढउतारांना तोंड द्यावं लागतं. राव आणि रंक सगळेच समान इथे. पण आपल्यापुरतं आपण आपला आनंद होता होईल तो सर्वांना वाटावा, अत्यंत सकारात्मकतेने, निर्मळ मनाने. आणि “दुःख हे एकाकी असतं.” ते ज्याचं त्यानेच भोगून संपवायचं असतं. त्यामुळे हे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये अशी आशा करायची.
खरंतर सगळे मनाचे खेळ आहेत. आनंद , दुःख , समाधान , सुख हे सगळे शेवटी मानण्यावरच आहे ना! कोणी छोट्याश्या घटनेने आनंदी होतो तर कोणी सर्व सुखं हजर असूनही कायम दुःखी, निराश असतो. “व्यक्ती तितक्या प्रकृती” खरंतर आनंद हा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला अगदी बाजारात सगळ्या रंगांच्या ताज्या भाज्या बघूनही आनंद होतो. निसर्गाची मुक्त उधळण, पक्ष्यांचा किलबिलाट यांनीही मन किती प्रसन्न, आनंदी होतं. “आत्ताचा हा क्षण संपूर्ण आनंदाने जगणं म्हणजे जीवन.” तुमची प्रेमाची, कुटुंबातील माणसं या आनंदात तुमच्या बरोबर सहभागी असतील तर सोने पे सुहागा. दुःखही या प्रेमाच्या माणसांमुळेच लवकर मावळतं. उरतच नाही.
म्हणूनच माझा आनंद सर्वांचा व्हावा, सर्वांना मिळावा. पण माझं दुःख मात्र कोणालाही मिळू नये ही परमेश्वरचरणी प्रार्थना….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


