मला समजून घे!
विशाल विमल
मला समजून घे ! यात नक्की काय अपेक्षित असतं ? आपल्याला त्या व्यक्तीच्या क्षमतेसह मर्यादाही माहीत आहेत. खऱ्यासह बुरेही माहीत आहे आणि तरी देखील त्या व्यक्तीला आपल्याशी बोलताना, वागताना संकोच वाटत नाही, हा इतका मोकळेपणा समजून घेण्यात अभिप्रेत हवा आहे.
पण इतका मोकळेपणा एकमेकांमध्ये असतो का ? नाही, म्हणून तर मग एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येतात आणि मग एकमेकांचे छान बॉंडिंग होण्यातही गडबड रहाते.
त्या व्यक्तीच्या चांगल्यासह वाईट गोष्टीही आपल्याला माहीत असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या वाईट गोष्टी, कमतरता, मर्यादांना आपण पाठीशी घालतो, त्याला पाठींबा देतो, असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. जज्ज म्हणून त्यावर आपल्याला नंतर भूमिका बजवायची आहे.
पण आपली फस्ट प्रायोरिटी ही आहे की त्या व्यक्तीला आपल्याशी बरोबर की चूक सारे काही व्यक्त होऊ वाटले पाहिजे. पण त्या व्यक्तीला तसे वाटत नाही. कारण त्या व्यक्तीच्या मर्यादा, चुका, वाईट गोष्टी या कितीही छोट्या असल्या तरी आपण त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार नाहीत, असा त्या व्यक्तीला आपल्याबद्दल विश्वास नसतो.
हा विश्वास का नसतो ? तर आपले आजवरचे बोलणे, वागणे आणि आपली प्रत्यक्ष वागण्यातील भूमिका त्या व्यक्तीला माहीत असते, त्यामुळे आपण त्या व्यक्तीला ओरडणार असे ती व्यक्ती गृहीत धरून आपल्याकडे काही गोष्टी बोलत नाही, हा झाला समजून घेण्याच्या अडथळ्यांचा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा असा आहे की, भलेबुरे त्या व्यक्तीने आपल्याला सांगितले तर ते आपण दोघांमध्येच ठेवायचे असते, ती त्या दोघांच्या नात्यातील ठेव असते. ती बाहेर कुणाला वाटायची नसते. पण आपण या ठेवीबद्दलचे नियम विसरतो आणि त्या व्यक्तीचे बुरे, वाईट उधळत बसतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आपल्या बद्दलच्या विश्वासाला तडा जातो. समजून घेण्यात गडबड होतीये हे त्या व्यक्तीच्या लक्षात येते.
स्वतःमधील बुऱ्या गोष्टी त्या व्यक्तीलाही माहीत असतात. पण त्यासह आपण त्या व्यक्तीचा स्वीकार करावा ही त्या व्यक्तीची अपेक्षा असते. त्या व्यक्तीला मन खुले करायला जागा हवी असते. पण आपण काय करतो की, त्या व्यक्तीच्या बुऱ्या गोष्टी डोक्यात ठेऊन त्या व्यक्तीशी हातचे ठेवून वागू लागतो.
त्या व्यक्तीला आपल्या वागण्यातील हा फरक जाणवतो आणि ती व्यक्ती आपल्यापासून मनाने दुरावते. हा झाला तिसरा मुद्दा. न्यूट्रल राहून ऐकून घेण्याची, जाणून घेण्याची, माहीत करून घेण्याची खूप मोठी ताकद आपल्याकडे पाहिजे, तरच आपण पुढच्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो.
बुऱ्या गोष्टी माहीत झाल्यावर कलाकलाने आपण त्या व्यक्तीला बोलते करून बुऱ्या गोष्टी सुधारण्याचा मार्ग सुचवू शकतो, त्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे अगोदरपासूनच हातात छडी घेऊन बसण्याची अजिबात गरज नसते.
त्या व्यक्तीच्या जुन्यापुराण्या, सततच्या मर्यादा, चूका माहीत असूनही आपले त्या व्यक्तीबद्दलचे दररोजचे वागणे न्यूट्रलच असले पाहिजे. ही अवघड गोष्ट जरी असली तरी समंजस्यपणाच्या पायावर उभ्या असणाऱ्या दोन व्यक्तीमधील समृद्ध नात्यासाठी ती आवश्यक गोष्ट आहे.
चौथा मुद्दा थोडा वेगळा आणि महत्वाचा आहे. चुका, मर्यादा, बुऱ्या गोष्टींबद्दल जसे आपल्याला न्यूट्रल रहावे लागते तसेच चांगल्या, बऱ्या गोष्टींबद्दलही आपल्याला प्रतिसाद देण्याची भूमिका घ्यावी लागते. त्या व्यक्तीच्या उत्साहाची खबर आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीच्या उत्साहाचे काही महत्व नाही म्हणून आपण गप्प बसून रहाणे योग्य नाही.
त्या उत्साहातील महत्व जाणून घेऊन आपल्याला त्या व्यक्तीला प्रतिसाद देता आला पाहिजे. इथेही त्या व्यक्तीचे व्यक्त होणे आणि ते समजून घेणे गरजेचे असते.
बोलू की नको बोलू, सांगू की नको सांगू, हे प्रश्न खरे तर पडलेच नाही पाहिजेत. जेव्हा असे प्रश्न पडतात तेव्हा समजून घेण्याच्या प्रक्रियेत काही तरी गडबड आहे हे नक्की समजावे, हा पाचवा मुद्दा समजून घेण्याच्या प्रक्रियेतील गाभा आहे.
आपण चार वाक्य बोललो आणि गप्पा झालो. आपण तेव्हा पुढच्या व्यक्तीचा प्रतिसाद पाहत असतो. तो केवळ प्रतिसाद नसतो तर त्यात आपलेपणा, आस्था असते. पण जर पुढची व्यक्ती स्वतःहून आपलेपणाने, आस्थेने संवादाला सुरुवात करत नसेल तर समजून घेण्यात खूप मोठी मर्यादा आहे, हा सहावा मुद्दा लक्षात ठेवा.
अत्यंत महत्वाचा सातवा मुद्दा असा आहे की, समजून घेणे ही एकतर्फी, एका व्यक्तीकडून होणारी गोष्ट नाही. एका व्यक्तीने समजून घ्यायचे आणि दुसऱ्या व्यक्तीने काहीच करायचे नाही, हे असे समजून घेण्याच्या प्रक्रियेत घडत नाही. समजून घेण्याच्या प्रक्रियेत दोघांनाही समान पातळीवर खोलात उतरावे लागते, तरच एकमेकांना समजून घेता येते.


