“मनाला लागलेली मरगळ कशी झटकावी?”
मधुश्री देशपांडे गानू
“काही केल्या करमनां
कसा जीवच लागेना..
आज उदास उदास दूर…
पांगल्या सावल्या..
एकांताच्या पारावर..
हिरमुसल्या डहाळ्या…..”
सुप्रसिद्ध कवी नां. धो. महानोर यांची उत्कृष्ट कविता. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरजींनी खूप सुंदर गायली आहे. आम्ही लेखक मंडळी सातत्याने आमच्या लेखनातून सकारात्मकतेचे धडे देत असतो. सतत सकारात्मक, तर्कसंगत विचार करा, असं सांगत असतो. आयुष्य जगताना हे सतत नाही जमत. आपले कुटुंबीय, प्रेमाची माणसं, सहकारी, मित्र मैत्रिणी यांच्याशी आपले भावबंध जोडलेले असतात, त्या नात्यांमध्ये नेहमी तर्कसंगत विचार नाही करता येत.
मनाची आंदोलनं, भावभावनांचे खेळ अनाकलनीय असतात. कधी अतोनात प्रेम, कधी वेडी माया, कधी चिडचिड, कधी असूया कोणतीही भावना मनात येऊ शकते. सामान्य माणसाची स्वप्नं, इच्छा ही त्याच्या आवाक्यातीलच असतात. आपले असे मोजके नातेसंबंध जपताना तो कधी आनंदी होतो तर कधी दुखावला जातो. मनाला कधी आणि कशाने मरगळ येईल हे सांगता येत नाही. एका क्षणात उत्साही आनंदी असलेलं मन दुसऱ्याच क्षणाला उदासवाणं होतं. कोणतंही क्षुल्लक कारण पुरेसं असतं याला.
आज प्रत्येक व्यक्तीला रोजच्या जगण्यातही अनेक दृश्य-अदृश्य ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. वास्तवाला सामोरे जाताना नेहमीच शांत, सकारात्मक नाही राहू शकत कोणीही. एखाद्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगीही मनात भावनांचा कल्लोळ उठणारच. ते कसे थांबवणार?? या सगळ्या भावना त्याच्या उत्कटतेसह प्रकट होणारच ना! व्हायला हव्यात. योग्य वेळी, योग्य भावना, योग्य पद्धतीने व्यक्त व्हायला हव्यातच. नाहीतर मनात साचून राहिलेल्या भावनांचा कधीतरी नको त्या वेळी चुकीच्या पद्धतीने उद्रेक, स्फोट होतो. आणि मग परिस्थिती आणखीनच बिघडत जाते.
आपल्या मनासारखं घडलं नाही किंवा आपलं प्रेमाचं माणूस आपल्या अपेक्षेप्रमाणे वागलं नाही तर मनाला लगेच उदास वाटतं. प्रियकर-प्रेयसी, नवरा बायको ही नाती पहा. या नात्यांत तुम्हीं अपेक्षेपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतता. अगदी जीवापाड प्रेम करता. चोवीस तास फक्त त्याच व्यक्तीचा विचार करता. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला भेटलात, फोनवर बोललात तरी तुम्हांला अगदी आनंदी आनंदी वाटू लागतं. मन पिसासारखं हलकं होतं की नाही!! कारण तुमच्या प्रेमाच्या माणसाचा आवाज ऐकून, त्याला भेटून तुमची आनंदाची, समाधानाची उर्मी उचंबळून येते. तुमची आनंददायी संप्रेरके स्रवतात आणि शरीराला मिळालेला आनंद मनालाही लाभतो.
नोकरी व्यवसायातील कामाचा ताण, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्तर याचा ताण, नातेसंबंध स्थिर निकोप ठेवण्याची धडपड, स्पर्धेत टिकून राहण्याचा ताण, यशस्वी होण्याची धडपड, अपयशाची भीती, प्रेमात असलेल्या वास्तव अवास्तव अपेक्षा या आणि अशा अनेक कारणांनी माणूस त्रस्त होत असतो. कोणत्याही वयोगटातील अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींना हे ताण जाणवत असतात. अशावेळी अति विचारांनी मनाला उदास वाटतं. मरगळ येते. काही उदाहरणे पाहू..
१) प्रेमात पडलेल्या तरुण-तरुणींना आपलं माणूस मनासारखं वागलं नाही तर मरगळ येते.
२) घरातील गृहिणीला सतत घर काम करूनही कोणी मला किंमत देत नाही या विचारांनी मरगळ येते.
३) बहुतेक वयोवृद्ध व्यक्तींना जोडीदार सोडून गेल्यामुळे आता एकाकी जीवन काढावे लागणार म्हणून आणि स्वतःचाही पैलतीर दिसत असतो म्हणून मरगळ येते.
४) लहान मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मरगळ येते.
५) पौगंडावस्थेतील मुलांना स्वतःमधील शारीरिक, मानसिक बदल संभ्रमित करतात म्हणून मरगळ येऊ शकते.
६) नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणार्या स्त्रियांना दोन्हीकडचे ताण उदासवाणं करू शकतात.
७) पुरुषांना सतत कर्तव्याची ओझी वाहून आणि स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त न केल्याने मरगळ येते.
दिवस उत्साहाने सुरू होत असला तरीही संध्याकाळ ही अशी एक वेळ असते ज्या वेळी अगदी हमखास आपल्याला उदासवाणं, कंटाळवाणं, दुःखी वाटतं. अगदी लहान बालकं सुद्धा यावेळी किरकिर करतात, रडारड करतात. दिवसभरातले आनंदी, दुःखी क्षण आपण अनुभवलेले असतात पण या संध्याछाया प्रकाशात मात्र मनाला उदास करणारे क्षणच आठवतात का??
आता कशानेही तुम्हांला मरगळ आली असेल.. अगदी दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वयात आणि कोणत्याही कारणाने, तरीही ही मनाला आलेली मरगळ दूर कशी झटकायची? या अशा उदासवाण्या अवस्थेत राहायला खरं तर कुणालाच आवडणार नाही. आजही तिन्हीसांजेला देवघरात दिवा, उदबत्ती लावायची आपली परंपरा आहे. ती यासाठीच.
मनाला आलेली ही मरगळ दूर कशी करायची ते पाहू.
१) रोज नेमाने संध्याकाळी जी तुमची श्रद्धास्थानं असतील, तुमच्या आवडीचे श्लोक, प्रार्थना असतील ती नेमाने म्हणावी.
२) रोज नियमित आवडीचं संगीत ऐकण्याची सवय ठेवा.
३) तुमच्या आवडीचा छंद नक्की जोपासा. याने तुम्हांला निर्भेळ आनंद मिळतो.
४) रोज किमान दहा मिनिटे ध्यानावस्थेत बसा. मनात विचार येणारच. पण हळूहळू तुम्हांला या विचारांकडे त्रयस्थपणे पाहण्याची सवय होते. आणि लहानसहान विचारांनी येणारा ताण नाहीसा होतो. ५) श्वसनाचे व्यायाम प्रकार, योगसाधना, नियमित चालणं अशा चांगल्या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्या.
६) रोजची दैनंदिन कामं नियमित करा. ७) प्राण्यांची आवड असेल तर आवर्जून त्यांच्याबरोबर वेळ घालवा. ते तुम्हांला ताणमुक्त करतात.
८) Break The Pattern. उदाहरणार्थ. आज मराठी मालिकांचा दर्जा अत्यंत टुकार, दर्जाहीन झाला आहे. सातत्याने नकारात्मक दृश्यं भरलेल्या या मालिका पाहून मनाला मरगळ येतेच. या मालिका पाहायची सवय प्रयत्नपूर्वक मोडा. तोच वेळ, तीच ऊर्जा तुमच्या आवडत्या छंदाला द्या.
९) मोकळ्या हवेत, निसर्गाचा आनंद लुटा. मनसोक्त फिरा.
१०) घरातील कामांमध्ये कुटुंबियांना मदत करा. याने तुम्हीं ताणमुक्त तर होताच पण नात्यांमध्ये ही सौख्य वाढते.
११) मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीचे कौतुक करायला शिका. ही एक आनंद देणारी सहज सोपी गोष्ट आहे.
१२) स्वतःच्या हातून घडलेलं छोटसंही चांगलं काम लिहून काढा. स्वतःला शाबासकी द्या. स्वसंवाद साधा.
१३) सर्वात महत्वाचं दिवसातून एकदा तरी खळखळून हसा. मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारा.
१४) ज्या गोष्टी , जी तुमची प्रेमाची माणसं आहेत त्यांचं मूल्य जाणा. त्यांना दुखवू नका.
१६) ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत , त्यांची अकारण चिंता करू नका.
अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही मनाला आलेली मरगळ झटकू शकता. तुम्ही स्वतःही आणखी छान छान उपाय शोधू शकता. मग पटलं ना! चला आतापासूनच करा सुरुवात आणि “मन करा रे प्रसन्न!”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


