मन मंदिर
बी.के. निता
(ब्रम्हकुमारी, बोरिवली)
आजच्या ह्या कोरोंना काळामध्ये सर्वच आपापल्या घरी lock झाले आहेत. मंदिरातले देव ही दरवाजे बंद करून बसले आहेत. एक वेळ होती की सुख-दुःख, मनातल्या भावना शेअर करण्यासाठी लोकं मंदिर, मस्जीद, गुरुद्वारे, चर्च मध्ये जात असत, आज तेही बंद झाले आहे.
मनामध्ये विचार येत होता की घरामध्ये देव्हारा असून ही देऊळात जायची ओढ सर्वांना का असते? घरात ही पूजा अर्चना रोज करतो पण मंदिराचे ते रम्य वातावरण घरात जाणवत नाही. ती ऊर्जा, शांती-सुखाचे प्रकंपन आपल्याला आपल्या घरात मिळत नाहीत. सध्याची परिस्थिती बघता ते वातावरण घरात निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते आपण करू शकतो.
मंदिराचे वातावरण बनवणारे आपणच आहोत. देऊळामद्धे शुद्ध मन, मंत्र उच्चारण आणि सेवाभाव असतो. प्रत्येक जण तिथे गेल्यावर कोणा बद्दल ही वाईट चिंतू नये ह्यावर लक्ष्य ठेवतात. तसेच प्रत्येकाच्या मुखी नामस्मरण अर्थात अधिक ऊर्जा निर्माण करणारे सकारात्मक शब्द असतात व त्याच बरोबर कोणतेही कर्म सेवाभावनेने केले जाते.
सकाळी काकड आरतीच्या आधी मंदिराची साफ सफाई करण्याची, परिसरातला केर काढण्याची सेवा मिळावी म्हणून खास वाट बघत उभे राहणारे भक्त ही बघितले असतील. छोटेसे कर्म पण त्यातही सेवाभाव असतो.
बाह्य स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता ह्यावर ही लक्ष दिले जाते म्हणून त्या वातावरणात आलेला प्रत्येक व्यक्ति सकारात्मक उर्जेचा अनुभव घेऊन जीवनात काही करण्याची नवी चेतना मिळवतो. हे सर्व निर्माण करणारे आपणच आहोत हे मात्र विसरू नका.
‘शोधीसी मानवा राउळी, मांदिरी,
नांदतो देव हा आपुल्या अंतरी,’
मंदिराचे दरवाजे बंद असले तरी मनाला मंदिर बनवण्याची शक्ति आपल्या मध्ये आहे. जसे मंत्र उच्चारणाने एक वेगळीच शक्ति निर्माण होते ह्याचा अनुभव आपण सर्वांनी केलाच असेल.
मंत्र म्हणजेच मनाचे तंत्र. मनाला काही नियमांमध्ये चालवण्याची शक्ति ज्यांनी आत्मसात केली त्यांच्या उच्चारणात ती शक्ति येते. जर आपण ही सतत मनाला सकारात्मक, शुद्ध, श्रेष्ठ विचारांनी भरपुर करण्याची सवय लावली असेल तर नेहमीच प्रसन्न मनाने छोटी मोठी कार्ये करू शकतो.
म्हटले आहे ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’. प्रसन्न मनाने केलेले कार्य पुण्य कर्म होते व चांगल्या कर्मांचे फळ सुख आपल्याला मिळू लागते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्या शुद्ध व शक्तिशाली उर्जेचा अनुभव होऊ लागतो. खरतर मन प्रसन्न राहणे हीच तर खरी पुण्याई आहे.
आज मनुष्याकडे सर्व काही असून सुख, शांती, समाधान नाही त्याचे कारण आहे व्यर्थ विचार. स्वतःच विणलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या कोळ्या सारखी गत झाली आहे. म्हणून जसे मंदिरामध्ये जाताना शुद्धीचे महत्व ठेवले जाते.
तसेच मनाला मंदिर समजून त्याच्या शुद्धीकडे ही लक्ष द्यावे. जे ह्या मनामध्ये संकल्प निर्माण करू त्याला वास्तविकते मध्ये उतरवण्याची क्षमता आपल्यात आहे. म्हणून विचारांचा काळजीपूर्वक वापर करा.
मनामध्ये सतत शुद्ध विचारांची वासधुप लावा, जीवनातले सर्व कलह क्लेश समाप्त होतील आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

