मनाला न आवडणाऱ्या घटना घडत असतील तर काय करावे ?
गीतांजली जगदाळे
जीवन जगताना अनेक घटना घडत असतात. त्यातल्या काही आनंद देऊन जातात तर काही दुःख, काही आपल्या मुळे घडतात तर कधी त्या नैसर्गिक असतात. नैसर्गिक घटनांबाबत करण्यासारखं आपल्या हातात फार काही नसत. माणूस आयुष्य जगताना खूप गोष्टी नियंत्रित करू पाहत असतो.
स्वतःच आयुष्य, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य ही काही अंशी त्याला आपल्या कंट्रोल मध्ये हवं असत. आपली नाती जपताना देखील तो त्यांना कुठेतरी नियंत्रित करायला बघत असतो. पण कितीही प्रयत्न केले तरी मात्र आपल्याला सगळं कंट्रोल करणं शक्य होतच नाही. ज्या गोष्टी खरंच नियंत्रणाबाहेर असतात त्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणेच मुळी व्यर्थ असते. पण हे माहित असून आपण त्यासाठी त्रास करून घेत असतो. ते नियंत्रित होत नसताना ही ते नियंत्रित करण्याचा हट्ट करत बसतो.
मनाला आवडणाऱ्याच घटना घडत राहिल्या, तर आयुष्य कसं असेल बरं? खरंच आपल्याला आयुष्य जगताना खूप मजा येईल का? आणि सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडण शक्यं तरी होईल? आपण सगळे रोबोट किंवा एखादी मशीन असतो तर ते कदाचित शक्यं ही झालं असत कारण मशीनच programming same असू शकत.
पण आपण माणसे ही एकमेकांपेक्षा वेगळी असतो आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी खूप भिन्न असतात. त्यामुळे आयुष्यात होणाऱ्या घटनांबाबत देखील आपली आवड निवड वेगळी असते. आणि त्याचमुळे सर्व घटना मनासारख्या घडण शक्यं नाही. प्रत्येक माणसाच्या मनाप्रमाणे घडण तर नक्कीच अशक्य आहे, जेव्हा एखाद्या माणसाच्या मनाप्रमाणे घटना घडतात तेव्हा कोणीतरी असं नक्कीच असत ज्याला ती same घटना आपल्या मनाविरुद्ध किंवा मनाला न आवडणारी वाटत असते.
कोणीतरी म्हटलंय की आयुष्यात जे होत ते आपल्या चांगल्यासाठीच असत! आता याबाबत देखील प्रत्येकाची मते वेगळी असणार, ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार! आयुष्यात होणाऱ्या वाईट घटनांबाबत खूप लोक असेच म्हणतील की याने काय चांगलं झालंय माझ्या आयुष्यात? वाईट घटना आपल्याला खूप काही शिकवून जात, या ना त्या पद्धतीने आपले डोळे उघडतात. पण प्रत्येक वाईट घटनेबाबत हे नक्कीच लागू पडत नाही. प्रत्येक वाईट घटना काहीतरी शिकवून जाते हे जरी खरं असल तरी काही घटनांची गरज असतेच असं नसत.
पण जेव्हा कोणत्याही स्वरूपाच्या मनाला न आवडणाऱ्या घटना घडत असतील तर काय बरं करायचं? नियंत्रणात असतील आणि ते बदलणं योग्य असेल तर त्या आपण नक्कीच बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बदलण्यापलीकडे असतील तरी अशा वेळी एक आशा मनात ठेवणं खूप महत्वाचं असत. कारण प्रत्येक रात्री नंतर दिवस हा येतच असतो.
तसेच आपण जर त्या न आवडणाऱ्या घटनांमध्ये नीट survive करू शकत असू तर चांगला काळ किंवा मनाला आवडणाऱ्या गोष्टी ही कधी तरी होणारच आहेत हे विसरून चालणार नाही. चांगल्या-वाईट आणि आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या घटना घडत राहण्याचं सत्र तर आयुष्यभर चालतच राहणार आहे.
त्यामुळे आशा जर मनात कायम ठेवली तर आपण मनाला पटत नसणाऱ्या गोष्टी एकतर सकारात्मकतेने बदलायचा तरी प्रयत्न करू किंवा खचून न जाता त्या वेळेशी, त्या घटनेशी ही चांगला सामना करू. काळ वाईट असो किंवा चांगला सगळ्यात महत्वाचं एकच असू शकत जे म्हणजे आपलं कर्म, आपण खचलेलो आहोत म्हणून चुकतंय किंवा अगदी मनासारख्या गोष्टी होतायेत म्हणून त्या माजात चुकतंय असं होता काम नये.
मनाला न आवडणाऱ्या घटना नेहमी वाईट असतील असही नसत. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून ती चुकीचीच आहे असं नसत. त्यामुळे त्या मनाविरुद्ध असणाऱ्या घटने बद्दल थोडा विचार ही केला गेला पाहिजे. खरंच ही घटना आपल्यासाठी वाईट आहे , त्रासदायक आहे की फक्त आपल्याला ते आवडत नाही म्हणून आपल्याला त्रास होतोय?
बाकी महत्वाचं एकच सांगेन, चांगल्या घटनांचा मनमुराद आनंद लुटा, पण पाय नेहमी जमिनीवरच राहुद्यात. आणि मनाविरुद्ध घटना आहे की खरंच वाईट घटना आहे यातला फरक लक्षात घेऊन तिला बदलायचं, स्वीकारायचं की तिच्याशी लढायचं हे ही लक्षात घ्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


लेख आवडला