” मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यास त्यासाठी काय करावे??”
मधुश्री देशपांडे गानू
” मन चिंती ते वैरी न चिंती ”
खरंच आहे ना! मनाचे मनोगत किती गूढ असतं. काय काय मनात साचलेलं, साठवलेलं असतं. वरून शांत दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या मनात प्रचंड खळबळ, प्रचंड भीती असू शकते कशाचीही. मुळात कोणतीही भावना ही अस्तित्व आणि भूक यांच्या वरच आधारित असते. नीट विचार केला तर कळेल. अगदी आदिम काळात मानवाला जीवाची आणि भुकेची भीती होती. आता प्रगत मानवाला तर शेकडो समस्या आणि भीतीने ग्रासलं आहे.
भीती कोणत्याही स्वरूपाची असू शकते. स्वतःच्या जीवाची, अस्तित्वाची भीती. आवडत्या गोष्टी, प्रेमाचं माणूस गमावण्याची भीती. “लोक काय म्हणतील?” हा तर भीतीचा प्रचंड मोठा बागुलबुवाच आहे. बहुसंख्य समाज याच भीतीखाली वावरत असतो. स्वतःचे आयुष्य, महत्त्वाचे निर्णय याच भीतीपोटी घेतले जातात.
विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती कारण फक्त पाठांतरावर भवितव्य अवलंबून. विषय किती समजला आहे? माहित नाही. प्रचंड जीवघेणी स्पर्धा त्यामुळे बहुतेक विद्यार्थी भीतीच्या छायेत. नोकरी-व्यवसायात टिकून राहण्याची, सातत्याने पुढे जाण्याची स्पर्धा म्हणून अकारण भीती. सामाजिक-आर्थिक अपेक्षांचे ओझे बाळगावे लागत असल्यामुळे अनेक अनामिक गोष्टींची भीतीच.
काहींना चार लोकांमध्ये मिसळण्याची भीती वाटते. तर काहींना बोलण्याची भीती वाटते. काहींना उंचीची भीती, काहींना प्राण्यांची भीती. अकारण अगम्य कशाचीही भीती वाटू शकते. समाजाचे अलिखित नियम इतके विचित्र असतात. एखादी स्त्री गोरी, बारीक असेल तर ती सुंदर..मग इतर मुलींना सतत स्वतःला अव्हेरले जाण्याची भीती. आत्मविश्वास येणार कुठून? प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या अब्रूची भीती तर कायमचीच मागे लागलेली असते.
एक उदाहरण आहे, एका व्यक्तीला एका जागेची प्रचंड भीती वाटायची. म्हणजे लोकलमधून प्रवास करताना त्या नावाचे स्टेशन आले तरी त्याला प्रचंड भीती वाटायची. हृदयाची धडधड वाढणे, हातापायाला कंप सुटणे, घाम येणे या शारीरिक प्रतिक्रिया व्हायच्या. म्हणजे कशाचीही अवास्तव अकारण भीती वाटून घेतली तर तुमचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य कायमचे धोक्यात येऊ शकते.
एखादी गोष्ट मनासारखी घडायला जर वेळ लागला तर लगेच आपल्या मनात नकारात्मक विचारच आधी येतात. कोणाला घरी यायला उशीर झाला तर काय झाले असेल असे वाटून भीती वाटते. एखादी रक्कम मिळायला उशीर झाला तर फसवणुकीची भीती वाटते. करोना काळात तर भलीभली माणसं या रोगाच्या भीतीने प्रचंड नैराश्यग्रस्त झालेली पाहत आहोत. अचानक अकस्मात आलेल्या मोठ्या संकटांमध्ये वाटणारी भीती वेगळी. ती खरंच गंभीर स्वरूपाची असते. यातूनही माणसं सावरतात, उभी राहतात. कारण काळ हेच सर्वांवर एकमेव औषध आहे.
तर अशा या भीतीचे वातावरण आपल्या मनात निर्माण झाले त्यासाठी काय करावे हे पाहू…
१) सर्वात प्रथम नेमकी कशाची भीती वाटते ते शोधून काढा. खूपदा आपण साप समजून दोरीला बडवत असतो. विचारांचे नेमकेपण खूप गरजेचे आहे.
२) भीतीला सामोरे जाणे, स्वतःला सक्षम बनवणे हा भीती घालवण्याचा एकमेव उपाय आहे. उदाहरणार्थ, एका मुलाला चाचरत बोलायची सवय होती. त्यामुळे हुशार असूनही वर्गात तो उत्तर देत नसे. चार लोकांमध्ये मिसळायची, बोलायची भीती वाटत असे. पण एके दिवशी त्याच्या लक्षात आले ही छोटीशी भीतीही त्याच्या सर्वांगीण विकासाला बाधा ठरत आहे. मग त्याने सातत्याने आरशासमोर बोलण्याचा सराव केला. आणि त्याचे चाचरणं कायमचे थांबले. तो आत्मविश्वासाने समाजात वावरू लागला.
३) नेमकी कशाची भीती वाटते हे मोकळेपणाने तुमच्या कुटुंबियांना, विश्वासातील व्यक्तींना सांगा. गप्प बसू नका.
४) नेमकं काय वाटतंय ते लिहून काढा. याने मनावरचा ताण हलका होतो.
५) आवर्जून आवडीच्या छंदात मन गुंतवा. व्यायाम, फिरणे हे नियमित करा.
६) आहार, झोप आरोग्याला साजरं असू द्या.
७) गंभीर स्वरूपाची भीती “फोबिया” मध्ये बदलते. तत्पूर्वीच समुपदेशक, मानसोपचार तज्ञ यांची त्वरित मदत घ्या.
८) तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्हीं शारीरिक-मानसिक जेवढे व्यस्त राहाल तेवढी तुमच्यापासून भीती लांब राहील.
९) अगदी कोणत्याही स्वरूपाची भीती असली तरीही आता या क्षणाला वास्तवात तुम्ही काय करू शकता ते सर्व करा. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्यावर विचार करून, त्याची भीती वाटून काहीही उपयोग नाही.
१०) “ध्यान” सर्वोत्तम उपाय. मन स्थिर, शांत व्हायला मदत होते. विचारांचे नियोजन सुधारते. योग्य कृती करण्यासाठी शक्ती मिळते.
११) स्वतः मधली मानसिक ताकद, सामर्थ्य ओळखा. तुमची मदत फक्त तुम्हीच करू शकता हे लक्षात ठेवा.
अनेकदा ही भीती काल्पनिक असते. करोना सारख्या रोगामुळे प्रचंड घाबरून जाण्यापेक्षा स्वतःची आणि कुटुंबीयांची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणे, सावध असणे जास्त गरजेचं आणि सकारात्मक आहे ना! आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला भीती ही वाटतेच. फक्त त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, तुमची विचार प्रक्रिया यावर सगळे अवलंबून आहे. तुम्हीं किती लवकर या भीतीला तोंड देऊन त्यातून बाहेर पडता हे महत्त्वाचं आहे.
“एका भीतीपोटी तुम्हीं आयुष्य पणाला लावू शकत नाही.” तर त्यावर सकारात्मकतेने, समर्थपणे मात करून पुन्हा आयुष्याला सामोरे जाणे आणि नव्या अनुभवांसाठी सज्ज होणे हे खरे माणूसपण… हो ना!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


