Skip to content

” मनातले असंख्य अवास्तव आवाज थांबवल्यास सभोवतालचा आनंद मनसोक्त घेता येतो. “

” मनातले असंख्य अवास्तव आवाज थांबवल्यास सभोवतालचा आनंद मनसोक्त घेता येतो. “


मधुश्री देशपांडे गानू


“मन चंगा तो कठौती में गंगा”

संत रविदास यांचे हे वाक्य आजच्या विषयाचे सार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दैनंदिन घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी, मनावर चांगले-वाईट परिणाम करणाऱ्या घटना, सुख-दुःखाचे प्रसंग असे अनुभव येत असतात. लहानपणापासून होणारे संस्कार, परिस्थिती, व्यक्तिसापेक्ष अनुभव यातून माणूस घडत असतो. त्याची स्वतःची, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही एक वैचारिक बैठक तयार होते. जगाकडे आणि इतर व्यक्तींकडे बघण्याचा स्वतःचा चष्मा तो तयार करतो.

आणि स्वतःकडे, इतरांकडे जगाकडे या दृष्टिकोनातूनच पाहतो. प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा स्वतःला पटेल असाच अर्थ काढतो. कित्येक वेळा स्वतःपुरते काढलेले हे अर्थ फक्त गैरसमज असतात. स्वतःबद्दलची जी ठाम मतं असतात, त्यांना धक्का लागला की आपण लगेच इतरांबद्दल जजमेंटल होतो. एखादी सामान्य रूप असलेली स्त्री एखाद्या सौंदर्यवती च्या संपर्कात आली तर लगेच अनकम्फर्टेबल होते. कित्येकदा ती त्या स्त्रीचा मत्सर, हेवा करू लागते.

आणि यातूनच त्या स्त्रीला त्रास देण्याचे, तिची निंदानालस्ती करण्याचे मार्ग अवलंबते. हे अगदी सहज दिसून येतं. याचं कारण स्वतःबद्दल असलेली कमीपणाची भावना. आजच मी एक खूप सुंदर वाक्य वाचलं “एखाद्या व्यक्तीकडे जे काही आहे त्याबद्दल कधीही मत्सर करू नका. कारण परमेश्वराने स्वतःच्या खजिन्यातून ते त्याला दिलं आहे. तुमच्यापासून हिरावून नाही.” किती सुंदर वाक्य आहे हे. आणि आपण हेच विसरून फक्त दुसऱ्यांबरोबर आपली तुलना करत असतो. दुसऱ्याचा हेवा करतो. आणि स्वतःबद्दल कायम दुःखी राहतो. हे मनाचे अवास्तव आवाजच आहेत. यामुळे आपण स्वतःकडे काय आहे याचा मनसोक्त आनंद घेऊ शकत नाही.

मन खोल खोल डोह आहे. त्यात काय काय चाललेलं असतं कळतही नाही. एखादी छोटीशी घटना खोलवर परिणाम करते. आणि त्या भोवती सगळे विचार एकवटतात. आपण एका दृष्टिकोनातून विचार करत असतो. दृष्टिकोन बदलला तर एक वेगळी बाजू आपल्या लक्षात येते. वेगळे मार्ग दिसू लागतात. खुपदा आपण विचारांची सुरुवातच नकारात्मकतेने करतो मग त्या भोवती असंख्य अवास्तव विचार गोळा होऊ लागतात.

अगदी छोटं उदाहरण घ्या. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्याच्या ठरलेल्या वेळेपेक्षा यायला उशीर झाला तर मनात येणारा पहिला विचार नकारात्मकच असतो. मग “मन चिंती ते वैरी न चिंती” या म्हणीप्रमाणे नको नको त्या विचारांची अवास्तव मालिका सुरू होते.

अजून एक उदाहरण सांगते. एक व्यक्ती एकदा एका पार्टीला गेला. त्याच्या मनात आधीपासूनच स्वतःबद्दल असंख्य अवास्तव नकारात्मक विचार होते. स्वतःबद्दल कमीपणाची भावना, न्यूनगंड होता. “माझ्याशी लोक नीट वागत नाहीत” ही त्याची भावना होती. मग तो पार्टीत कोणाशीही न बोलता एका कोपऱ्यात जाऊन बसला. यजमानांनी त्याला काय हवं नको एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तर हा नाही म्हणाला. कोणाशीही बोलायला तयार नाही.

घरी परत आल्यावर मनात असंख्य अवास्तव आवाज, ” बघा माझं म्हणणं खरं आहे ना! लोक नाहीच बोलत माझ्याशी. मला एकटे पाडतात. मला कोणीही खूप आग्रह केला नाही. सगळे असेच वागतात माझ्याशी.” आता खरं म्हणजे पार्टीच्या यजमानांनी विचारल्यावर याने त्याचा स्वीकार करायला हवा होता. आपण होऊन सगळ्यांशी बोलायला हवं होतं. कोणताही समज मनात न ठेवता मोकळेपणाने संवाद साधायला हवा होता. पण सदोष दृष्टिकोनामुळे आणि अवास्तव चुकीच्या विचारांमुळे, समजुतीमुळे तो पार्टीला तर गेला पण पार्टीचा, तिथल्या छान वातावरणाचा, लोकांचा, स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद त्याला घेता झाला नाही.

एखादी छोटीशी गोष्ट घडते आणि आपण मुंग्यांच्या वारुळा प्रमाणे असंख्य अवास्तव विचारांचे वारूळ निर्माण करतो. ज्याला खरंच वास्तवात काही अर्थ नसतो. तुम्ही स्वतःच विचार करून पहा. ती /तो माझ्याकडे पाहून हसली/हसला नाही. ती /तो माझ्याशी बोलली/बोलला नाही. मी एवढा सुंदर ड्रेस घातला तरी कोणी माझं कौतुक केलं नाही. माझी कोणाला कदरच नाही. मी कोणाला आवडत नाही. मी सुंदर नाही. अशा असंख्य विचारांची मालिका आपल्या मनात फिरत असते.

खरं म्हणजे तुम्ही स्वतःला स्वतःसाठी खूप महत्त्वाचे आहात. तुमचं स्वतःवर अत्यंत प्रेम असायला हवे. स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात असे गुणही असतातच ना! मग अगदी स्वतःच्या आणि दुसर्याच्याही गुणांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःचे आणि इतरांचेही छोट्या छोट्या गोष्टीत मनमोकळेपणाने कौतुक करा. उगाचच अकारण नकारात्मक विचार आले तर एक क्षण थांबा. Pause  घ्या. आणि खरंच हे विचार गरजेचे आहेत का? असं स्वतःला विचारा.

विचारांचे सुनियोजन अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीला जे विचार येतील ते लिहून काढण्याचा सराव करा. त्यामुळे तुम्हाला तुमचे नेमके महत्त्वाचे, वास्तव , सकारात्मक विचार समजतील. त्याप्रमाणे कृती करता येईल‌. स्वतःच्या मनाचे धोरण लवचिक ठेवा. वेगळ्या दृष्टीकोनातून घटना, प्रसंग  बघण्याची मनाला सवय लावा. म्हणजे तुमच्या मनात अकारण चिंता, चिडचिड, मत्सर, असूया, अकारण भीती, असुरक्षित भावना असे भाव येणारच नाहीत.

परत एकदा मी नेहमी सांगते की “आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रतिक्रियेची गरज नाही.” हे एकदा तुमच्या  पक्कं ध्यानात बसलं की हे असंख्य अवास्तव विचारांचे आवाज तुमच्या मनात येणारच नाहीत. आणि आत्ता या क्षणी माझ्यासमोर जे घडतंय, माझे शुद्ध विचार, माझ्या आयुष्याला प्राधान्य देणारे विचार आणि कृती, माझी प्रेमाची माणसं यांच्या पुरतंच तुमचं मन विचार करेल. आणि अगदी साधा स्वयंपाक करायचा असेल तरीही तो पूर्ण आनंदाने, गोडीने, मनापासून कराल. नाहीतर अवास्तव विचार मनात आले तर “हाताला चटके” बसतीलच.

वर्तमानात जगायला शिका. भूतकाळाचं ओझं आणि भविष्यकाळाची चिंता दूर सारून फक्त आजच्या क्षणात आनंद शोधता यायला हवा. स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या, विचारातून आणि कृतीतून. काय नाही याचा विचार न करता काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. आणि या क्षणाचा आनंद मनसोक्त लुटा. माणसाचं मन हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सगळं काही मनाच्या अवस्थेवर, मानसिकतेवर अवलंबून आहे. हे माध्यम तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी वापरता की स्वतःला दुःखी करण्यासाठी हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे… नाही का??


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!