मनातली सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी या गोष्टींचेही भान असू द्या !
सौ. मिनल वरपे
अपयश ही यशाची पायरी आहे.. ध्येय उंच असले की झेप सुद्धा उंचच घ्यावी लागते.. उद्याच काम आज करा आणि आजच काम आताच करा.. अशा अनेक प्रकारचे प्रेरणादायी विचार आपण नेहमीच ऐकतो आणि त्यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो.. ज्या स्थितीत आहोत त्यामधून बाहेर पडण्यासाठी हेच प्रेरणादायी विचार आपल्याला मार्ग दाखवतात…
खरं तर असे विचार.. असे वाक्य आपल्यामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी असतात म्हणजेच अशा वाक्यातून आपल्यातील आत्मविश्वास वाढवायचा असतो..नकारार्थी विचार बाजूला सारण्यासाठी यांची मदत होते पण काहीवेळेस अशाच विचारांचा आपण तोच अर्थ घेऊन पुढे न जाता एकाच जागी थांबून राहतो..
यातीलच एक वाक्य ..एक विचार म्हणजे first impression is last impression आता या वाक्यातून आपल्याला नक्कीच आत्मविश्वास मिळतो.. आणि याच विचारातून प्रेरित होऊन आपण स्वतःला प्रोत्साहित करतो उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या ठिकाणी मुलाखतीस जाताना आपण अशाच प्रकारे तयारी करतो जेणेकरून आपली तिथे पहिल्याच भेटीत चांगली प्रतिमा दिसेल ..
कधी कोणाला पहिल्यांदाच भेटायचं असेल तर आपण आपलं वागणं बोलणं इतकं पद्धतशीर ठेवतो जेणेकरून आपली त्या व्यक्तीवर चांगलीच छाप पडेल.. आणि खरचं या वाक्याचा आपल्याला आपल्या जिवनात चांगलाच अनुभव येतो..
पण बहुतेक वेळा याच वाक्याचा नकोतो अर्थ मनात घेऊन आपण काहीवेळेस खचून जातो.. माघार घेतो किंवा आपण एखाद्याला चुकीचं सुद्धा समजतो..
आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटलो पण तिथे आपल्याला जे बोलायचं होत जस बोलायचं होत तस बोलायला जमलं नाही की आपल्याला अस वाटते की आता ती व्यक्ती आपल्या बद्दल काय विचार करत असेल .. पुन्हा ती व्यक्ती आपल्याला भेटणार की नाही.. आता कितीही प्रयत्न केले तरी माझ्याबद्दल झालेला गैरसमज दूर होणारच नाही … जे चांगल नात नव्याने झालं असत ते होणार की नाही.. जी ओळख अजून वाढली असती ती ओळख पुढे सरकणार की नाही … आणि याच विचारांमुळे आपण पुढे प्रयत्न करायचेच सोडून देतो..
कधी एखादी व्यक्ती आपल्याला भेटते.. पहिल्यांदाच भेटल्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो, पहिल्याच भेटीत त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून आपण चांगले वाईट निष्कर्ष लावून मोकळे होतो आणि त्या व्यक्तीला कायम गृहीत धरतो .. आपण त्या व्यक्तीला त्यानंतर अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही …
काहीवेळेस ती व्यक्ती पहिल्याच भेटीत नसून सुद्धा चांगल वागण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला ती व्यक्ती खूप चांगली वाटते आणि कधी ती व्यक्ती कितीही चांगली असली तरी अस काही बोलून जाते की आपल्याला ती व्यक्ती चुकीची वाटते…
नविन जॉब मिळाल्यावर काही सहकारी, अधिकारी आपल्याला सुरवातीलाच खूप रागीट आणि कठोर वाटतात आणि आपण डायरेक्ट जॉब सोडून मोकळं होतो किंवा तसे विचार करतो… पण काहीजण आधीच सौम्य वागले तर त्याचा परिणाम चुकीचा होईल म्हणून त्यांना कठोर वागावं लागत मुळात काम करताना ते खूप चांगलं सहकार्य करत असतात… तर काहीवेळेस हे सहकारी खूप चांगले वाटतात म्हणून आपण त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा मूळ स्वभाव वेगळा असल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला नंतर जाणवतो..
एखादी व्यक्ती चांगली की वाईट हे पहिल्याच भेटीत ठरवता येत नाही… तिच्याशी ओळख वाढली.. स्वभाव कळला.. तीच वागणं बोलणं लक्षात आलं की तेव्हाच त्या व्यक्तीबद्दल जो काही निष्कर्ष लावायचा तो आपण लावू शकतो.. मग इतर कोणासाठी ती व्यक्ती आपणसुद्धा असू शकतो..
सांगायचं काय तर काही वाक्य आपल्याला सकारात्मकता वाढावी म्हणून सांगितलेले असतात..लिहिलेले असतात.. पण जर आपण त्या वाक्याचा.. त्या विचारांचा आधार घेऊन नकारात्मकता वाढवतो आणि चुकीचे ग्रह करतो.. काहीवेळेस स्वतःच खचतो तर काहीवेळेस दुसऱ्यांबद्दल नकोते गैरसमज करून घेतो..
म्हणून कोणत्याही विचारांची सकारात्मक बाजू लक्षात घेऊन तसे विचार केले..तस वागल तर आपल्याला कधीच त्याचा चुकीचा परिणाम जाणवणार नाही…आणि आपण चुकीचे निष्कर्ष सुद्धा लावणार नाहीत..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला