मनातला संताप शांत कसा करावा ???
अपर्णा अशोक कुलकर्णी
आपल्या आयुष्यातील एखादा पूर्ण दिवस असा गेलाय का ज्यामधे आपण कोणावरही रागावलो नाहीत ???
मला नाही वाटत की असं झालं असेल. हो ना ???
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खूप संघर्ष आणि स्पर्धा आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत झगडत असतो आपण.सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावतो तरीही उशीर झालाच तर आपण स्वतःवरच चिडतो, ऑफिस मध्ये वेळेत पोहचण्यासाठी घरातून निघतो पण बस वेळेत नाही आली तर चिडतो, ऑफिस मध्ये लेट मार्क मिळाला तर चिडतो,घरात मुलांनी आपलं ऐकलं नाही तर चिडतो,बॉस ने अपमान केला तर कर्मचाऱ्यांवर चिडतो,कधी कधी ऑफिस च राग घरी सगळ्यांवर काढतो एकंदरीत काय कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण सतत चिडत राहतो.
राग येणं आणि चिडचिड करणं हा जगण्यातला भागच होऊन गेलं आहे.थोड काही मनाविरुद्ध झालं की आपली चिडचिड सुरूच.याला कोणीही अपवाद नाही. घरी असणाऱ्या महिला,नोकरी करणाऱ्या महिला,वयस्कर मंडळी,पुरुष आणि लहान मुले सुद्धा. मुले सुधा त्यांच्या मनाप्रमाणे आई बाबा नाही वागले तर त्यांचा राग राडण्यातू न,काहीतरी वस्तू फेकून व्यक्त करतात.
म्हणजे आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत आहोत आणि ही प्रतिक्रिया रागाने व्यक्त केली जात आहे.
राग येणं हे अगदी स्वाभाविक आहे.प्रत्येक माणूस हा विकारांनी भरलेला असतो आणि राग हा एक विकार आहे.पण ज्या कारणासाठी आपण चिडतो किंवा रागावतो ते कारण तेवढं मोठं आहे का ?? याचाही विचार करायला हवा.
काही लोक हे जन्मतःच खूप रागीट स्वभावाचे असतात तर काही लोक शांत स्वभावाचे असतात.व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे,प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी.पण या रागीट स्वभावामुळे लोकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते.जे लोक रागीट स्वभावाचे असतात त्यांना फारसा मित्र परिवार नसतो,अशा लोकांचे खूप कमी लोकांशी पटते,या स्वभावामुळे घरातील लोक सुद्धा अंतराने वागतात तसेच या लोकांपासून घरातील बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या जातात कारण हे लोक कसे वागतील काहीच सांगू शकत नाही आणि परिणामी अशा स्वभावाचे लोक एकटे पडतात आणि जास्त च रागीट बनतात.अशा लोकांना सांभाळणं आणि त्यांच्याशी वागणं कठीण होऊन जाते.
त्यांचा राग ही त्यांची कमकुवत बाजू बनते आणि त्यांच्या याच स्वभावाचा खूप लोक गैरफायदा घेतात.राग येणं ही खूप मोठी समस्या होऊन जाते आणि त्यावर उपाय योजना केल्या जातात.
मुळात राग येणं वाईट नाही त्या रागावर नियंत्रण नसणं वाईट आहे.मी म्हणाले तसं राग येणं खूप स्वाभाविक गोष्ट आहे पण वेळीच राग शांत करता येणं गरजेचं आहे.ज्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण करणं जमलं त्याला सगळंच जमलं.
काय करावं रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी
१. योगा आणि प्राणायाम : दिवसाची सुरुवात जर आपण योगा करण्याने केली तर पूर्ण दिवस ताजातवाना आणि प्रसन्न जातो.रोज सकाळी लवकर उठून योगा आणि प्राणायाम नियमित पण केले तर हळूहळू आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो.
२. सकारात्मक स्वयंसूचना : आपण जसा विचार करतो तसच आपल्या आयुष्यात घडत आणि हे खरं आहे.जर आपण चांगले विचार केले तर चांगलंच घडेल.म्हणून रोज उठून सकाळची कामे आटपून आरशासमोर उभे रहा स्वतःकडे बघून गोड हसा आणि सकारात्मक ऊर्जा द्या स्वतःला.जसं की
– माझ माझ्या बोलण्यावर आणि रागावर पूर्ण नियंत्रण आहे.
– मी शांत राहणार आहे.
– माझा स्वभाव प्रेमळ आणि दयाळू आहे.
हे रोज म्हणा.दिवसातून तीन वेळा म्हणा आणि फरक बघा.
३. बोलून मोकळे व्हा : कधी कधी खूप प्रयत्न करून देखील आपला आपल्या रागावर ताबा राहत नाही.कितीही नाही म्हणाल तरी चिडचिड होतेच.अशा वेळी आपला संताप मनात दाबून टाकू नका.त्याचा त्रास तुम्हालाच सगळ्यात जास्त होईल.घुसमट होईल आतल्या आत.त्यापेक्षा तुमच्या हक्काच्या जवळच्या माणसाकडे जाऊन बोला.आपला राग व्यक्त करा.
४. दुर्लक्ष करा : कधी कधी आपल्या जवळची लोकं आपल्या स्वभावाचा किंवा कमकुवत बाजू च फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.मुद्दाम अशा गोष्टी करतात किंवा वागतात ज्यामुळे आपल्याला राग येईल.अशा वेळी त्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा.त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देणं थांबवा.एकदा का त्यांच्या हे लक्षात आलं की तुम्हाला काहीच फरक पडत नाही मग ते तुम्हाला त्रास देणार नाहीत.
५. स्वतःवर नियम घाला : रोज स्वतःच्या मनाशी ठरवून घ्या की कितीही राग आला तरीही मी नियंत्रण सोडणार नाही,मनातल्या मनात आकडे मोजेन, अपशब्द वापरणे टलेन.आणि हे नियम कटाक्षाने पाळायचा प्रयत्न करा.
काही लोक अगदी सहज म्हणतात की माझा स्वभाव असाच आहे,मी रागीट, तापट आहे.पण याच स्वभावामुळे आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना ते दुरावतात हे त्यांच्या लक्षात येत नाही.अस होऊ देऊ नका.
आपण आपल्या घरातल्या लोकांवर आपला राग व्यक्त करतो कारण बाहेरची लोकं उगाचच तुमचा राग सहन करणार नाहीत.रागात आपण काय करतो आणि काय बोलतो याच भान आपलं आपल्याला ही नसतं.एखादेवेळी मारलेली खूण निघून जाते पण बोलून वर्मी घातलेले घाव कसे विसरता येतील?? आपल्याच जवळच्या लोकांना आपण बोलून दुखावतो आणि त्यांच्या मनातून कायमचे उतरतो.
आपला राग शांत झाल्यावर आपल्याला आपली चूक लक्षात येते पण त्याचा काही उपयोग होत नाही. एखाद् दुसऱ्या वेळी ठीक आहे पण हे सतत होत असेल तर याचा दूरगामी परिणाम आपल्या नात्यांवर कायमस्वरूपी पडतो आणि हे नुकसान भरून न येण्यासारखं असत.अती राग आणि भीक माग अशी अवस्था होऊन जाते. मग ज्या गोष्टींचा त्रास आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना होतो त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे.
कोणतीही व्यक्ती कधीच परिपूर्ण असू शकत नाही.पण जेंव्हा माणसाला आपल्या स्वभावातला दोष लक्षात येतात तेंव्हा ते दोष घालवून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा आणि बाकी सगळ्यांनी त्यासाठी मदत सुद्धा करायला हवी.नाही का ???
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

