Skip to content

मनःस्थिती बिघडण्याची सुरुवात हि भावना दुखावण्यापासून होते.

मनःस्थिती बिघडण्याची सुरुवात हि भावना दुखावण्यापासून होते.


मेराज बागवान


शारीरिक आजार औषध उपचाराने बरे होऊ शकतात पण मानसिक आजार बरे व्हायला बराच काळ जावा लागतो. आणि आज हे मानसिक आजार मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसत आहेत.डोळ्यांना जरी दिसत नसले तरी देखील याची लक्षणे आपण पाहू शकतो, जाणवू शकतो आणि अनुभवू शकतो. मग ह्या मानसिक गोष्टींमध्ये मुख्यतः समावेश होतो तो, भावनांचा आणि आपल्या मनाचा व मानसिक स्थितीचा. प्रत्येक माणसाला भावना ह्या असतातच.

मग ह्या भावना सकारात्मक -नकारात्मक दोन्ही प्रकारच्या असतात. जसे की , प्रेम आणि द्वेष, आपुलकी आणि राग, हसणे आणि रडणे इत्यादी. ह्या सर्व प्रकारच्या भावना आपल्या आयुष्यात खूप गरजेच्या असतात.म्हणूनच ह्या भावनांना अनन्यसाधारण महत्व आहे.पण आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात, त्यामुळे आपल्या भावना ह्या दुखावल्या जातात आणि याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो आणि शेवट म्हणजे आपली मानसिक स्थिती बिघडते.

जसे की , आपण कुणावर तरी अतोनात, निर्मळ प्रेम करीत असतो , पण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करीत नसते किंवा त्या व्यक्तीच्या मनात आपल्यासारख्या भावना नसतात.आपल्याला याची जेव्हा जाणीव होते तेव्हा नकळत आपल्या भावना दुखावल्या जातात आणि आपल्या मनात त्या दडून राहतात.आणि याची पुढची पायरी म्हणजे, मनात ही गोष्ट, तो नकार राहून राहून आपले मन दुःखी करतो आणि मानसिक आरोग्य बिघडून मनस्थिती अशांत होते.

मित्र-मैत्रिणींमध्ये देखील अशा बरयाच गोष्टी असतात. लहान-सहान गोष्टींवरून , किंवा कधी मस्करीत भांडणे होतात आणि मने दूषित होतात. तसेच नवरा आणि बायको यांचे देखील होतेच. नवरा आणि बायको सर्वात जवळचे नाते.पण कित्येकदा एक-मेकांच्या अपेक्षा वेगवेगळया असतात आणि मग त्या पूर्ण नाही झाल्या की भावना नकळत दुखावल्या जातात आणि एकमेकांची मनस्थिती बिघडू लागते. मग कधी अबोला तर मग कधी नात्यांमध्ये अंतर देखील पडू लागते.हे सर्व केवळ भावना दुखावल्यामुळे होते.

कधी घरातील वृद्ध आई-वडिलांना असे वाटत असते की मुलांनी आपल्याला पुरेसा वेळ द्यावा.पण मुलांच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य होत नाही.तसेच लहान मुलांचे देखील.त्यांना देखील वाटत असते की आपल्या पालकांनी आपल्याला मनसोक्त वेळ द्यावा.पण दोन्ही पालक बाहेर नोकरी-व्यवसाय करणारे असतात मग कामाच्या व्यापात कधी कधी मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशा सर्व कारणांमुळे मनस्थिती बिघडू शकते.

कधी कधी घरातील गृहिनीकडून चुकून जेवणात मीठ जास्त होते.तेव्हा घरातील काही मंडळी तिला पटकन बोलतात.यामुळे त्या गृहिणीच्या भावना दुखावतात.

कधी नवरा-बायको मध्ये असे होते की, बायको आपल्या नवऱ्यासाठी काही तरी खास तयारी करते, ‘सरप्राईज’ देऊ इच्छिते, पण अचानक नवऱ्याच्या कार्यालयीन कामामुळे ते शक्य होत नाही .आणि मग बिचाऱ्या बायकोच्या भावना दुखावल्या जातात आणि ती मनाने दुःखी होते.

असे अनेक प्रसंग आपल्या आसपास, आपल्या बरोबर घडत असतात. जिथे नाती येतात तिथे भावना ह्या आल्याच. आपण कोणत्यातरी भावनेने समोरच्याशी वागत असतो, बोलत असतो पण अपेक्षित प्रतिसाद समोरच्याकडून मिळाला नाही की मग आपल्याला एक तर राग येतो किंवा मग आपण शांत राहून मानसिक स्थिती अशांत करून घेतो.

भावना जरी डोळ्यांना दिसत नसल्या तरी देखील ह्या भावांना दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्व आहे. कारण न दिसणाऱ्या गोष्टीच जास्त त्रास देतात.मग ह्या तर भावना आहेत.मनावर आघात करणारच ना?

म्हणुनच जर का मानसिक स्थती बिघडू द्यायची नसेल तर भावनांचा योग्य समतोल साधता आला पाहिजे.एकदा का आपल्या लक्षात आले की , काही भावना आपली मानसिक स्थती बिघडवत आहेत, त्याच क्षणी स्वतःला सावरता आले पाहिजे.फक्त त्यातच गुरफटत राहून जगण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणूनच भावनांचा योग्य वेळी योग्य त्या प्रकारे निचरा करता आला पाहिजे.भावनांना योग्य ती वाट करून देता आली पाहिजे.

ह्या सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगू वाटते.ती म्हणजे ,’अपेक्षा’.जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा आणि आपल्या अपेक्षा याची नीट ओळख झाली की मग भावनांना संभाळणे सोपे जाते.मग कुठे थांबायचे, कुठे जुळवून घ्यायचे हे समजते आणि मानसिक गुंता टाळता येऊ शकतो जो की आपली मानसिक स्थिती निरोगी ठेवतो.म्हणूनच, कोणावरही आपल्याला कोणाच्याही अपेक्षांची, किंवा भावनांची जबरदस्ती करून काहीच साध्य होत नाही.यामुळे फक्त भावना दुखावल्या जातात आणि मानसिक स्थिती बिघडू लागते.

म्हणून जर का स्वतःला स्थिर ,मोकळे ,हलके ठेवायचे असेल तर योग्य वेळी भावनांना आवर घालून मानसिक स्थिती, आणि संपूर्ण मानसिक आरोग्य हे टिकवता आले पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने एक सकारात्मक जीवन जगत आहोत असा अर्थ होईल.कारण मानसिक गुंता घेऊन आपण आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकत नाही.

चला तर मग भावना संभाळूयात आणि मानसिक स्थिती सकारात्मक ठेवूयात.कारण शेवटी बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा, ‘मनःशांती’ महत्वाची असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “मनःस्थिती बिघडण्याची सुरुवात हि भावना दुखावण्यापासून होते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!