Skip to content

भूतकाळ चिघळत न बसणाऱ्या व्यक्ती सदैव फ्रेश मूडमध्ये दिसतात.

भूतकाळ चिघळत न बसणाऱ्या व्यक्ती सदैव फ्रेश मूडमध्ये दिसतात.


सोनाली जे.


शाळेत असताना आपण सगळेच व्याकरणात काळ शिकलो. भूतकाळ , वर्तमान काळ, भविष्य काळ. भूतकाळ म्हणजे काय ? जो काळ घडून गेला आहे. मागील एखादी घटना , परिस्थिती , अनुभव , मग कधी हा अनुभव व्यक्ती सापेक्ष , परिस्थिती सापेक्ष , किंवा स्थल , काल , वस्तू सापेक्ष असेल.

कोणी तरी असे म्हणले आहे की,
” भुलने वाली सारी बांते याद है, इसिलिये जिंदगी मैं विवाद है !!”

आपल्या सर्वांना परिचित असलेली लहानपणापासूनची आपल्या चिमणी आणि कावळ्याची गोष्ट. भर पावसात कावळा चिमणी कडे येतो .आसरा मागण्यासाठी. पण चिमणी तिच्या घरी , तिच्या कामात , तिच्या बाळाचे आवरण्यात खूप बिझी होती. तिला नुसते दार उघडुन कावळ्याला आत घेण्यात वेळ जाईल. असे वाटत होते.

आणि तशी तिची ती priority सांभाळत होती. त्यामुळे ही थोडे तिने कावळ्याच्या हाके कडे दुर्लक्ष केले. कावळा मात्र भर पावसात भिजत होता, थंडीने कुडकुडत होता. चिमणी ला दार उघडं म्हणून कळवळून विनंती करत होता. पण चिमणी तिच्या कर्तव्य , कामे , priority मध्ये बिझी .. ती जेव्हा त्यातून free झाली. बाळाला झोपविले त्यानंतर तिने दार उघडले तर कावळा तिथून निघून गेला होता. चिमणी ला वाईट वाटले . तिला त्याची काळजी वाटू लागली. कुठे गेला असेल. अरे रे मी वेळेत दार उघडायला पाहिजे होते असा विचार करून ती दुःखी होते.
पण घडून गेलेली घटना .. ती वेळ ही गेली. कावळा ही निराश होवून गेला. कावळ्याची ती केविलवाणी हाक, ती विनवणी आठवून चिमणी रोज दुःख , त्रास करून घेत असे.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही अशी व्यक्ती येत असते. परिस्थिती येत असते. जी खूप आपुलकीने आपल्याला हाक मारत असते आणि आपण आपल्याच कामात , कर्तव्यात , priorities मध्ये व्यस्त असतो.

ती आपली व्यक्ती अनेक वेळा विनवणी करते, चिडचिड करते , बडबड करते, कधी स्वतः ला त्रास करून घेते , कधी स्वतः सोबत तुम्हाला ही ..ज्यांना ती आपले समजत असते . त्यांनाच . पण जेव्हा लक्षात येते की या त्रासाचा , दुःखाचा , आपल्या गरजांचा समोरच्यावर काही परिणाम होत नाही, त्याला / तिला काही फरक पडत नाही अशा वेळी एकमेकांच्या पासून दुरावतात. कधी गैरसमज निर्माण होतात . कधी अंतर निर्माण होते. कायमचे एकमेकांना गमवून बसतात.

काही वर्षांनंतर आपल्या चुकांची जाणीव होते ही , पण भूतकाळ आठवला की काय चुकले आणि काय करायला पाहिजे होते असे वाटते पण तेव्हा जाणीव झाली तरी व्यक्ती दुरावलेली असते.

ह्याच कावळ्याच्या गोष्टीत पुढे काही दिवसांनी चिमणी ला कावळ्याची खूप आठवण येते. तो कसा असेल म्हणून ती त्याच्या घरी भेटायला जाते. दाराबाहेर कावळा त्याच्या पिलांचा आनंदाने उत्साहाने सुरू असलेला दंगा ऐकू येतो तिला. चिमणी ने दार वाजविल्या वर कावळा लगेच दार उघडतो.

तिचे खूप मनापासून स्वागत करतो. चिमणी त्याची माफी मागते. कावळा म्हणतो तू अजून ती भूतकाळात ली गोष्ट मनात ठेवून आहेस? विसरून जा . बघ मी तर ते कधीच विसरलो. मी माझ्या पिलांचा आनंद आणि त्यांच्या सहवासा मध्ये खूप उत्साही , आनंदी असतो. दुःख , त्रास , द्वेष ही नाही.

तू ही मनातून काढून टाक तू मला असे तेव्हा मदत केली नाहीस , वेळ दिला नाहीस , आसरा दिला नाहीस म्हणून काय झाले .मी ते विसरून गेलो. माझ्या घरचे दरवाजे आपल्या लोकांकरिता कायम उघडे आहेत. तू कधी ही येवू शकते आमच्या आनंदात सहभागी होवू शकतेस.
त्याचा उत्साह , आनंद , सुख यातून चिमणी ही उत्साही झाली आणि तिने कावळ्याला सांगितले तुला कधी गरज पडली तर नक्की ये.

आपण मात्र प्रत्यक्षात तो / ती माझ्याशी तेव्हा असे वागला / वागली . त्यांनी असे केले , तसे केले नाही , वेळ दिला नाही , लक्ष दिले नाही , महत्व दिले नाही हेच लक्षात ठेवतो आणि पूर्वी ते असे वागले म्हणून सतत तेच मनात धरून आजही त्यांच्याशी असेच तोडून वागत असतो. नाही तर कायमचे आपल्याच लोकांना गमवून बसतो .

भूतकाळात गाडीचा झालेला accident आणि त्यात एखादा प्राणी मारला गेला असेल तर गाडी चालवताना कायम भूतकाळाची आठवण येवून ती भीती मनात असते. तसेच भूतकाळात शिक्षण , नोकरी , व्यवसाय , प्रेमात आलेले अपयश आपण जास्त कुरवाळत बसतो आणि आहे या क्षणापासून , आपल्या लोकांच्या पासून , मिळणाऱ्या नव्या संधी पासून ही दुरावत असतो.

नदीचा प्रवाह पुढे जायचं असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाह वाहत असतो. मागचे ठिकाण एका ठिकाणाहून पुढे गेले की तोच प्रवाह मागे जात नाही . तर ती पुढे वाहत असते. आणि अथांग , विशाल समुद्राला जावून मिळत असते.

भूतकाळ चिघळत न बसणाऱ्या व्यक्ती सदैव फ्रेश मूडमध्ये दिसतात. याची काही कारणे बघुयात :

१. भूतकाळ विसरून ते वर्तमानात जगतात.

होवून गेलेल्या घटना विसरून , आता या क्षणी जे आहे त्याचा आनंद घेतात. ज्या गोष्टी घडून गेल्या त्या बदलू शकत नाही. त्यावर त्रास करून , गेलेली वेळ , व्यक्ती , परिस्थिती परत येणार नसते. आणि time clock मागे जावून तिथे थांबवून बदल घडविणे शक्य नसते. त्यामुळे ज्या व्यक्ती मागे घडून गेल्या घटनांचा विचार , त्रास करून आताचे आनंदाचे क्षण वाया घालवत नाहीत ते उत्साही असतात.

जेव्हा ज्या व्यक्ती सोबत असतात, जी परिस्थिती असते त्या सोबत सुखाचे क्षण , आनंदाचे क्षण वेचीत असतात. त्यामुळे ते सदैव फ्रेश मूड मध्ये असतात. वास्तव गोष्टींवर विश्वास ठेवतात. आणि वास्तवात जगतात. त्यात मग भूतकाळ ही नाही आणि भविष्याची चिंता ही नाही. म्हणून आताचा क्षण माझा आणि तो भरभरून जगतात.

२. अपेक्षा ठेवत नाहीत : –

भूतकाळात घडलेल्या घटना अनुभव म्हणून बघतात. भूतकाळ घडून गेला , तो अनुभव कधी खूप चांगला ही असतो .म्हणून तो वर्तमानात आताही तसाच चांगलाच अनुभव येईल अशी अपेक्षा ठेवत नाहीत. बरेचदा एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि ती जागा तो अनुभव तेव्हा खूप आवडतो परत त्याच अपेक्षेने गेलो तर कदाचित निराशा पदरी पडते कारण तेव्हा कोणता सिझन होता , आता कोणता आहे , हा हवामानाचा , वातावरणाचा फरक पडतो , सिझन चा फरक , तेव्हा गर्दी नसेल odd सिझन ला गेले असाल तेव्हा गर्दी नसेल आता अगदी भर सिझन मध्ये गेलात तर प्रचंड गर्दी असेल तर उगीच आलो असे वाटते.

त्यापेक्षा मागचा अनुभव विसरून जायचा .. आज नवीन अनुभव घ्यायचा असे ठरवून गेलात , अपेक्षा न ठेवता गेलात तर त्यात हा अनुभव ही आवडून जाईल. जसे तिथल्या लोकांची गर्दी कुठे आहे. नवीन काही तरी बघत आहेत तिकडे लक्ष जाईल .नवीन गोष्टी बघता येतील , अनुभवता येतील.. हा अपेक्षा विरहित दृष्टिकोन ही कायम उत्साही ठेवत असतो.

३. स्वतः ला गुंतवून ठेवतात :

Empty mind is devil’s workshop. रिकामे राहिलात तर सतत मागे असे घडले , भूतकाळात असे होते , असे झाले होते हेच विचार करून मागे पडाल. त्यापेक्षा नवीन गोष्टी शिकण्यात हा वेळ घालवा . स्वतच्या विचार आणि स्वतः ला आवडत्या गोष्टी , छंद, travelling , tracking , music यात गुंतवून गतकाळ आणि त्या आठवणी यातून बाहेर काढून स्वतः ला व्यस्त आणि , काही तरी नाविन्याची संधी देवून गुंतवून ठेवतो त्यातून नवीन ऊर्जा , energy निर्माण होते जी आपला आणि सोबत असणाऱ्यांना चा ही उत्साह वाढविते.

४. मित्र – मैत्रिणी , नातेवाईक यांच्या सोबत मनमोकळा संवाद साधतात : –

भूतकाळात एखादी चूक घडली असेल , अपयश आले असेल , नात्यात दुरावा असेल , तर चुकीमुळे नोकरी गमवावी लागली असेल . त्रास होणार , दुःख होणार , अगदी डोळे पाण्याने भरून येणार. अशावेळी मनसोक्त , मोकळेपणाने आपल्या लोकांच्या बरोबर संवाद साधतात.
असे म्हणतात की इतरांच्या सोबत आपले दुःख शेअर केल्याने आपले दुःख कमी होते. असे का ? तर तेव्हा मनातल्या कोंडलेल्या भावना बाहेर पडत असतात. कुकर ची वाफ कोंडल्यावर शिटी होवून ती बाहेर पडते तसे हे लोक आपल्या मनातली कोंडलेल्या भावना संवादातून बाहेर काढून टाकतात आणि आपले मन , विचार , भावना हलक्या करतात.

कधी गरज पडली तर डोळ्यातले अश्रू ढसाढसा रडून बाहेर काढून त्यातून सुटका करून घेतात. पाण्याने भरलेले काळे ढग एका जागी अडून राहतात, पावूस पडून गेला की कसे पांढरे शुभ्र आणि हलके होवून मुक्तपणे इकडे तिकडे जातात तसेच या व्यक्ती सगळ्यातून मुक्त होवून भावनांच्या ओझ्यातून बाहेर पडतात आणि परत हलक्या मनाने , नव्या उत्साहाने पुढे जातात.

५. शांतता : एकांत :

कधी कधी भूतकाळ ज्या कारणामुळे घडला त्याचा विचार एकांत आणि शांतते मध्ये जावून केला जातो. काय घडले , कसे घडले , का घडले याचा सारासार विचार , आत्मपरीक्षण केले जाते. आणि जे घडून गेले ते परत घडू नये याचे विचार करून पुढे पावूल टाकतात. वर्तमान आणि भविष्य यात अतिशय चोखंदलपणा ने पुढे जातात. चूक काय बरोबर काय हे समजल्यामुळे कसे वागावे याची जाणीव त्यांना आज जगताना उत्साहित करत असते. ठेवत असते.

६. विचार :

भूतकाळ , त्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा विचार नक्कीच मनात येणार. पण जे लोक त्यातच अडकून पडत नाहीत . सतत तेच तेच विचार करत नाहीत. किंवा तेव्हा असे केले आसे आनंदी क्षण साजरे केले, अशी वाईट घटना घडली सतत हेच विचार न करता . एकदाच जे घडले त्यावर विचार करून आनंद असो दुःख तिथेच सोडून देतात . ते विचार तिथेच सोडून नव्याने जगतात. नवीन. गोष्टी स्वीकारतात . त्या करतात त्यांचे विचार दुसरीकडे divert करतात . सक्रिय काम करण्याला महत्त्व देतात. ते नवीन गोष्टीत रमतात . ते कायमच उत्साही असतात. आणि अजून उत्साही कसे राहता येईल हे शोधत असतात.

७. स्वीकार : –

जी घटना घडून गेली आहे तिचा स्वीकार करा . त्यातून काय शिकता येईल ते बघा. Thorndike .. थोर्नडाईक यांची trial and error theory विचारात घेतली तर तुम्ही काय करत असता. Stimulus म्हणजे काय उद्दीपन आणि रिस्पॉन्स..प्रतिक्रिया. घडून गेलेली घटना ही तुम्हाला तेच तेच विचार करण्यास उद्दिपित करत असते आणि त्यावर आपण विचार करून , दुःखी किंवा तेच आनंद लक्षात घेवून , कधी प्रेमभंग असेल , कधी विश्वासघात याच गोष्टी नचे विचार परत परत करण्यास आणि तशी प्रतिक्रिया म्हणजे काय राग , द्वेष , मत्सर , दुःख आपल्यात निर्माण करत असते. ती प्रतिक्रिया दिली जात असते.

थोर्नडाईक यांचाच नियम

१. Law of readiness ..

एखादी गोष्ट जी पूर्वी घडून गेलेली तुम्ही स्वीकार केलात आणि नवीन बदलांना स्वीकार करण्याची तयारी दाखविली तर त्यातून निश्चितच आनंद , संतुष्टता मिळते जी तुमचा उत्साह वाढण्यास , तुम्हाला फ्रेश ठेवण्यास मदत करते.

थोर्नडाईक यांचाच एक प्रयोग . एका भुकेल्या मांजराला बंद पेटीत ठेवले . बाहेर खाण्याचे ठेवले होते जे त्या बंद पेटी मधून मांजराला दिसेल आणि ते त्या पेटीतून बाहेर येण्याचे प्रयत्न करेल. आणि त्यात एक लिव्हर होती / खटका म्हणता येईल .जो दाबला की ती पेटी उघडेल आणि भुकले मांजर बाहेरचे ते खाणे खाईल.

सुरुवातीला त्या मांजराला त्या खटक्याची माहिती नव्हती. ते खाणे घेण्यासाठी बाहेर पडण्याचे प्रयत्न करू लागले ..धडपड करत असताना चुकून तो खटका दाबला गेला आणि त्या पेटी चे दार उघडले गेले आणि त्या मांजराला खाणे मिळाले. प्रत्येक वेळी मांजराला भुकेले ठेवून हा प्रयोग केला गेला तेव्हा दुसऱ्या वेळी कमी प्रयत्नात दार उघडत आले. ..तिसऱ्या वेळेस अजून कमी प्रयत्न करून नंतर तर पहिल्याच प्रयत्नात खटका दाबून खाणे मिळविणे ही मानसिकता आणि प्रयत्न झाले आणि कमी प्रयत्नातून खाण्यातून संतुष्टता ही वाढली.

असेच आहे ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या प्रयत्नपूर्वक सोडून देवून नवीन गोष्टी करण्याची तयारी ..प्रयत्न तुम्हाला कायम संतुष्ट ठेवतात. फ्रेश मूड मध्ये ठेवतात.

२. Law of effect

लहान मूल अभ्यास करत नाही तेव्हा आपण punishment किंवा reward देतो. कधी कधी अभ्यास केला तर मी खावू देईन , chocolate देईन , तर कधी punishment शिक्षा , अभ्यास नाही केला तर मी खेळायला पाठविनार नाही. यातून अभ्यासाची गोडी मुलांना लावत असतो.
तसेच आपल्याही बाबतीत पूर्वी घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करायचा नाही हे आपण निक्षून बजावयचे मनाला. कधी कधी मग स्वतः साठी ही reward and punishment तंत्र वापरायचे. त्यातून मग तुम्ही सगळे पूर्वीचे विचार काढून टाकले , की नव्या दमाने उत्साहित , एकदम फ्रेश.
मनातले तेच तेच विचार , मानसिक त्रास , मानसिक torcher हे दूर होवून मन हलके आणि फ्रेश होते.

भूतकाळ चिघळत न बसणाऱ्या व्यक्ती सदैव फ्रेश मूडमध्ये दिसतात.कारण त्या होवून गेलेल्या घटनेत ,परिस्थिती मध्ये किंवा त्याच भावना , तेच विचार यात अडकून पडत नाहीत. दुधात पडलेली माशी जशी पटकन काढून टाकावी तसे पूर्वी घडलेल्या घटनेचे मनातले विचार ही पटकन झटकून पुढे असेल ते स्वीकारतात. त्यात गुंतून पडतात. भावनिक विश्वात , स्वप्नाच्या दुनियेत जगण्या पेक्षा ते सध्याच्या परिस्थिती मध्ये वर्तमानात जगतात.

आणि जे काही असेल त्याचा स्वीकार करून त्याला तोंड देण्याकरिता सज्ज होतात. मी हरलो आता कधीच जिंकणार नाही असे विचार करत नाहीत तर स्वतः हरून समोरचा जिंकला त्याचे अभिनंदन करून पुढे आपण ही जिंकू याकरिता प्रयत्न करतात.

आयुष्य सुंदर आहे. भूतकाळ चिघळत बसू नका. जे बदलणे आता आपल्या हातात नाही. त्यावर विचार करू नका. पण जे बदलणे शक्य आहे , प्रयत्न करणे शक्य आहे, शिकणे शक्य आहे ते मात्र निश्चय पूर्वक शिका. आणि सतत काही तरी करण्याची जिद्द असलेले , आहे त्या परिस्थितीतून मार्ग शोधनारे , प्रोब्लेम कडे प्रोब्लेम च आहे , त्रास च आहे , मीच का , मलाच का त्रास असे न बघता त्यातून समस्या सोडविण्यासाठी solution शोधा.

तुम्ही सदैव फ्रेश मूडमध्ये दिसाल कारण तुम्हाला कायम काही तरी नवीन प्रेरणा मिळत असते. काही तरी ध्येय तुम्ही ठेवत असता आणि ते पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करत असता. ते प्रयत्न आणि त्यातून मिळणारे यश , कधी तरी अपयश ही येते पण ते परत प्रयत्न करण्या करिता motivate करत असते. हेच आहे जे भूतकाळात न जगता त्याचा विचार जागीच सोडून पुढे भूतकाळ चिघळत न बसणाऱ्या व्यक्ती ना सदैव फ्रेश मूडमध्ये ठेवत असते.

आयुष्य सुंदर आहे. भूतकाळ चघळत जगण्यापेक्षा वर्तमानात जगा आणि आपल्या सोबत इतरांनाही आनंदाने जगू द्या.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!