Skip to content

“भावनिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर…”

“भावनिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर…”


मधुश्री देशपांडे गानू


माझिया मना जरा थांब ना!

सरींवर सरी या भावनांच्या..

थोडा तरी आवर घाल ना!

वरील लिहिलेल्या ओळी माझ्याच आहेत. अशीच एका भावनिक आंदोलना दरम्यान स्फुरलेली कविता. माणसाचे मन जादूगार आहे. कधी शांत डोहा प्रमाणे. तर कधी सैरभैर आहे. अनेक लहान-मोठ्या भावनांचे हिंदोळे मनात सतत चालू असतात. मन त्यावर झुलत असते. अनंत, अगणित विचार अखंड सुरू असतात. काही या क्षणांचे, आत्ताच्या घटनांचे, काही भूतकाळातील कडू-गोड आठवणींचे, कधी भविष्यकाळातील स्वप्नांचे, उद्दिष्टांचे ,अकारण भीती आणि चिंतेचे.

सुप्रसिद्ध आदरणीय कवियत्री “बहिणाबाई” यांनी लिहूनच ठेवलंय.

” मन लहरी लहरी , त्याले हाती धरे कोन

उंडारलं उंडारलं , जसं वारा वाहादन..

मानवी मन अतिशय गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन, त्याचे विचार त्याच्या भावना ठरवतो. काही माणसे स्वभावाने उथळ , चंचल असतात तर काही संयमी, संयत. काही माणसे साधक-बाधक विचार करू शकतात तर काही नाही करू शकत. अगदी प्राथमिक भावना जसे प्रेम, माया, ममता, राग, चिंता, असूया, विश्वास, अविश्वास, द्वेष, आनंद ,दुःख अशा अनेक असतात.

सर्व प्राणिमात्रांमध्ये फक्त मनुष्यप्राण्याला वाचा दिली आहे. त्याला काय वाटतं हे तो त्याच्या भाषेत व्यक्त करू शकतो.  ही प्रत्येक माणसाची भावनिक गरज आहे. योग्य वेळी योग्य भावना व्यक्त करता आल्याच पाहिजेत. भावनांचा निचरा होणं निरोगी मनासाठी आवश्यक आहे.

पण हा भावनांचा निचरा नाही झाला तर! एखादं उदाहरण घेऊ. अचानक पणे एखाद्या कुटुंबात अकाली घरचा कर्ता पुरुष दगावतो. त्याची बायको, मुलं यांना प्रचंड मानसिक धक्का बसतो. त्यांचे जवळचे नातलग, शेजारी, मैत्र सगळे धावून येतात. त्या कुटुंबाला आधार देतात. पण किती काळ? फारफार तर महिनाभर. त्यांच्या या दुःखाचा, या भावनांचा निचरा होणे गरजेचे आहे, हे सांगणे सोप्पं आहे.

“परदुःख शीतल असतं”.पत्नीचे पती वियोगाचे दुःख, मुलांचे पित्या विना आयुष्य स्वीकारण्याची भावना आणि दुःख, हे  सांगून समजणे कठीण आहे. या भावनांचा निचरा झाला नाही तर कोणीही मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू शकतात. नैराश्याच्या खोल गर्तेत जाऊ शकतात.. अशावेळी आपल्या भावना, दुःख व्यक्त करण्याची गरज जर सांभाळली गेली तर अशा दुःखद घटनांमधूनही माणसे तरून जातात. पुन्हा आयुष्याला सामोरे जायला उभी राहतात.

मी आधी ही अनेक वेळा लिहिले आहे “आयुष्यात एक अशी व्यक्ती कमवा जिच्या पाशी तुम्ही सगळं अगदी सगळं मनमोकळेपणाने बोलू शकता.” तुमची आई, वडील, वहिनी, बहिण, भाऊ, मावशी, काकू,  मित्र, मैत्रीण, नवरा बायको, प्रियकर, प्रेयसी कोणीही.. एक असं नातं नात्यापलीकडे जपा. म्हणजे तुमची भावनिक घुसमट होणार नाही. भावनांची गरज पूर्ण होईल. अशी व्यक्ती जी तुम्हाला चूक की बरोबर अशा चौकटीत मोजणार नाही. ती फक्त ऐकून घेईल.

एक असा ऐकणारा कान तुमच्या आयुष्यात असू द्या. काही वेळा आपल्याला फक्त आपलं कोणीतरी ऐकावं, असं वाटत असतं. सल्ला नको असतो. कोण चूक कोण बरोबर हे ही नको असतं. फक्त आपुलकीने ऐकणारं कोणीतरी हवं असतं. अगदी ऐकणारं कोणी नसेल तर जे विचार , भावना व्यक्त कराव्याशा वाटतात त्या सरळ लिहून काढायच्या.. हा अगदी सोपा मार्ग आहे भावनिक निचरा होण्याचा. मग तुम्ही एखाद्या विश्वासू व्यक्ती ला त्या वाचून दाखवू शकता. यानेही तुम्हांला हायसं वाटतं.

आणि हे आपल्यावरच अवलंबून असतं ना!. असं कोणीतरी आयुष्यात कमावणे ही तुमची जबाबदारी आहे. कोणालाही दोष न देता, तुम्ही प्रयत्न करून अशी व्यक्ती मिळवावी लागते. प्रेम, विश्वास नात्यात निर्माण करावा लागतो. आपण खूप सहज हा असाच आहे/ ती तशीच आहे /असं काही नसतंच/ काही चांगलं घडतच नाही असे अनेक वेळा बोलत असतो.

कायम कोणाचातरी न्यायनिवाडा करतो. या आपल्या भावना आपल्याला नियंत्रित करता यायला हव्यात. आपल्या भावनांचे सुनियोजन करता यायला हवे. काय व्यक्त करायचं? काय सोडून द्यायचं? हेही मनाला शिकवायला हवं. तुम्ही सतत तक्रारीचा सूर लावला, नकारात्मक बोललात तर तुमच्या या भावनिक गरजा कधीच पूर्ण होणार नाहीत.

कोणी ऐकूनच घेणार नाही. आत्यंतिक प्राथमिक असलेली भावनिक गरज जर पूर्ण झाली नाही तर मन आजारी होते. अनेक भावना एकावर एक साठून राहतात. इच्छा दबून राहतात. मग कधीतरी याचा स्फोट वाईट पद्धतीने होतो. कोणी अगदी वाईट , गुन्हेगारी मार्गाला लागतो. एखादा गुन्हा घडण्यामागे ही असा दबलेल्या भावनांचा उद्रेक च असेल ना! याचा वाईट परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. मानसिक आरोग्य बिघडते. माणसे ताण ग्रस्त, नैराश्यग्रस्त होतात. त्यांना मार्ग दिसत नाही. समुपदेशनाची गरज भासते.

असं होऊ नये म्हणून मनातील भावनांना शिस्त लावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मनातील भावना योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य भाषेत, योग्य आवाजात व्यक्त करा. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. नकार पचवायला शिका.  अकारण छोट्या छोट्या गोष्टींवर अतिविचार करणं टाळा. तरच तुम्ही सुस्पष्ट विचार, भावनांची व्यक्तता, निर्णय आणि कृती करू शकाल.  मनमोकळं आनंदी मन हे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. भावनाप्रधान आनंदी मनाने निरोगी शरीराने तुमचं जीवन यशस्वी बनवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““भावनिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर…””

  1. Chandrashekhar Barde

    सर्वात श्रेठ,उत्तम आपली रोजनिशी ( डायरी), आपल्या प्रत्येक कृतीचा आरसा! आणि एकनिष्ठ. दुसऱ्या कुणाकडे व्यक्त झाले तर भविष्यात चुकीचा दुरुपयोग ( नात्यांचा). चांगली पुस्तके हीच उत्तम आधार.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!