“भावना शेअर करायला जवळचे कोणी नसल्यास अशा वेळी काय करावे?”
मधुश्री देशपांडे गानू
कविता माझी..
सखी साजणी..
एकटीने चालता वाटही..
शब्द शब्द सोबत असती..
सखी साजणी…
या माझ्याच कवितेतील काही ओळी आहेत. एकटेपणा जाणवतो तेव्हा अशा कविता होतात आपोआप. माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे. एकटे राहायला नाही आवडत त्याला. सोबत ही हवीच. बघा! तुमच्या घरात एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल, अगदी बिछान्याला खिळून राहिलेली. तिचा तुम्हांला काही उपयोग नाही असे तुम्हाला वाटेल. तिच्यासाठी सगळं करावं लागतं म्हणून तुमची चिडचिड होईल. तरीही त्या व्यक्तीचे अस्तित्व, चैतन्य सतत तुमच्या बरोबर असते. आणि अशा व्यक्तीच्या जाण्यानंतरही एक पोकळी, ती सोबत नसल्याची जाणीव तुम्हाला अस्वस्थ करतेच.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे घरात भरपूर माणसे, नातेवाईकांचा गोतावळा मोठा होता. त्यामुळे माझ्या भावना शेअर करायला कोणी नाही असं म्हणायचा प्रश्नच येत नसे. पण आता छोटे कुटुंब, एकुलते एक अपत्य. वडील नोकरीधंद्याच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात किंवा परदेशी. आई ही बहुतेक नोकरी करणारी. मुलगा-मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी. इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळे सगळं जग एकत्र आलंय. काय चाललंय हे लगेच कळतं. पण नात्यांचे बंध मात्र विस्कळीत झाले आहेत. नाती एकमेकांपासून दुरावत चालली आहेत.
एकाच घरात राहणाऱ्या तीन माणसांचा व्हाट्सअप ग्रुप असतो. आणि त्यावर निरोप ठेवले जातात. फक्त एवढाच संवाद असतो माणसांचा एकमेकांशी?? या संवाद हरवत चालल्यामुळे सुद्धा लग्नसंस्था ही अडचणीत आली आहे. सुसंवाद नसल्याने घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बाहेर तंत्रज्ञानामुळे इतके हुशार आणि स्मार्ट होणारे आपण आंतरिक मनाने इतके कोरडे झालेत का? मग माणसे एकटी पडत जातात. मित्र मैत्रिणी असतात पण ते बाह्य संबंध झाले. अगदी जीवाला जीव देणारे ही मित्र असतात. आपण बरोबर आहोत किंवा चुकलो तरीही आपलं घर आणि घरातील माणसं आपल्याला समजूनच घेतील हा विश्वास कमी होतोय.
भावना शेअर करायला सोशल मीडियाचा, न पाहिलेल्या व्यक्तींचा आधार घेतला जातोय हे धोकादायक आहे. रोज प्रेमात, पैशाच्या व्यवहारात फसवल्याच्या बातम्या आपण बघतोयं. गुन्हेगारी वाढलीय. कारण आपल्या घरच्याच माणसांवर आपला विश्वास नाहीये. परकी माणसं लगेच आपली वाटायला लागतात. सरसकट सगळेच वाईट असतात असं अजिबातच नाही. पण फसवणुकीचे प्रमाण आहेच.
मी नेहमी सांगते, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती कमवा जिला तुम्ही सगळं अगदी सगळं मनमोकळेपणे सांगू शकता. ती व्यक्ती त्याचा न्यायनिवाडा करणार नाही. तुमचं ऐकून घेईल. आणि अशी नाती लहानपणापासूनच तयार व्हायला हवीत. पालकांनी मुलांचे मित्र मैत्रीण होण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करायला हवेत. तेवढा मोकळेपणा संस्कारांमध्ये हवाच.
काहीवेळा अकस्मात आलेल्या प्रसंगामुळे किंवा प्रिय व्यक्तीच्या जाण्यामुळे तुम्ही एकटे पडता. अशा वेळी तुमच्या हक्काचं, प्रेमाचं माणूस तुमच्याजवळ बोलायला नसतं. कधीकधी काही माणसं आत्मकेंद्रित असतात. त्यांना समाजात वावरणं, मित्र मैत्रिणी असं फारसं जमत नाही. स्वतःबद्दल न्यूनगंड असतो. त्यांनाही हा एकटेपणा जाणवत असतोच. काही माणसं समजून-उमजून एकटे राहणे पसंत करतात. पण एकटेपणा वाईटच. एकट्याने राहणं वेगळं आणि माणसांमध्ये राहूनही तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही म्हणून येणारं एकटेपण वेगळं.. अर्थात नातं सांभाळायचं कसं हे तुमच्यावर अवलंबून आहे. सतत दुसऱ्याला नावं ठेवणारी, दुसऱ्यांमध्ये दोष काढणारी, स्वतःचा अहंकार कुरवाळणारी माणसं नंतर नंतर एकटी पडत जातात.
भावना व्यक्त करणं ही अगदी नैसर्गिक सहज गरज आहे. जर त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीसमोर व्यक्त झाल्या नाहीत तर प्रचंड घुसमट होते. त्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो. ही मानसिक घुसमट, व्यक्त न होणे अनेक शारीरिक, मानसिक व्याधींना आमंत्रण देतं. व्यक्ती नैराश्यग्रस्त होऊ शकते. प्रसंगी विकृत, हिंसक होते. कधीतरी परिस्थितीने माणूस एकटा होतोच. मग अशावेळी काय करायचं?
साधक-बाधक विचार करायचा. चुकीचा मार्ग पत्करायचा नाही. एक तर अशी वेळच येऊ द्यायची नाही. तुमची मुलं ही मोठी झाल्यावर तुमचे सगळ्यात चांगले मित्र व्हायला हवेत.मग ते लांब रहात असले तरी मनमोकळा सुसंवाद सुरू राहतो. माझा मुलगा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. त्याच्याजवळ मी माझं मन मोकळे करू शकते. कारण तो तेवढा समजूतदार आणि प्रगल्भ आहे. मग बाहेर खांदा शोधायची गरजच पडत नाही. मला जेव्हा एकटेपणा आला तेव्हा मी लिहायला सुरुवात केली, जे मनात येईल ते. त्यामुळे भावनांचा निचरा होत गेला. हा निचरा होणं खूप गरजेचं असतं, हे मी स्वानुभवाने सांगू शकते.
याआधीही मी सांगितलंय भावना शेअर करायला कोणी नसेल तर त्या सरळ लिहून काढायच्या. जशा असतील तशा. रागाच्या, दुःखाच्या, अपमानाच्या, प्रेमाच्या असतील तशा लिहून काढायच्या. नंतर त्या तुम्ही एखाद्या विश्वासू व्यक्तीला वाचायला देऊ शकता. यामुळे तुमच्या भावनांचा निचरा होतो आणि तुम्हाला मोकळे वाटू लागतं. असंही कोणी नसेल तर सरळ लिहून कागद फाडून टाकायचा.
“ध्यानधारणा” हा तर सर्वात उत्तम मार्ग आहे. दिवसातील किमान दहा मिनिटं तरी शांत डोळे मिटून एका जागी स्तब्ध बसावं. विचार, भावना मनात येत राहतात. येऊ द्याव्यात. पण हळूहळू त्याकडे त्रयस्थ नजरेने पहायची सवय होते आणि त्रास कमी होतो. एकट्याने निसर्गात फिरायला जाणे हाही यावर छान उपाय आहे. संगीत ऐकणे, एखादी आवड जोपासणे, नवीन छंद शिकणे, या छंदाचे जमलं तर व्यवसायात रुपांतर करणे अशा कितीतरी गोष्टी आपण करू शकतो. आणि भावनिक कोंडमारा होऊन आपली जी ऊर्जा खर्च होते तीच आपण योग्य प्रकारे वापरू शकतो. अत्यंत सकारात्मकतेने जीवनाकडे पाहणे, कोणावरही दोषारोप न करणे यानेही भावनांचे नियोजन होऊ शकते. एखाद्या वृद्धाश्रमात , अनाथाश्रमात जाऊन काम करा , त्यांना वेळ द्या. बघा केवढं समाधान मिळतं. मग तुम्हांला कळेल की तुमची व्यथा काहीच नाही.
फक्त कधीही निराश होऊ नका. ही तात्पुरती वेळ आहे असे समजा. सगळे दिवस सारखे नसतात. हाही काळ जाईल, असा आशावाद मनी बाळगा. तुमचं मन ज्याच्यात रमेल, आनंद मिळेल अशा गोष्टी जाणीवपूर्वक करा. न जाणो अशा गोष्टींमधून ही तुम्हांला नवनवीन मित्र मैत्रिणी मिळतील. जीवनाला सकारात्मकतेने सामोरे जा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


