भावना कळणारी व्यक्ती जगातली सर्वाधिक शिक्षित व्यक्ती असते.
जागृती सारंग
सुमारे २०० हून अधिक पुस्तकं लिहिणारे दि ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर, सायंटिस्ट अरस्तू म्हणजेच एॅरीस्टाॅटल यांचं इंग्रजीमध्ये एक सुंदर quote आहे कि “Educating the Mind without Educating the Heart is No Education At All” – Aristotle थोडक्यात याचा अर्थ असा की मनाला किंवा मेंदूला फक्त पुस्तकी ज्ञानाचे शिक्षण न देता काळजावर भाव भावनांचे नितीमूल्यांचे संस्कार केले नसतील तर तुम्ही अशिक्षितच आहात.
हल्ली स्पर्धेचं युग आहे म्हणून आपण आपल्या सोबतच आपल्या मुलांना सतत अभ्यास आणि अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कलाकृतींमध्ये किंवा खेळांमध्ये व्यस्त ठेवतो आहोत. ज्यामुळे बऱ्याचदा मुलांच्या काळजावरच संस्कार घडवायचे राहून जातात. मुलांना आपण मातृभाषा, राष्ट्रभाषा, व्यावसायिक भाषा, विदेशी भाषा शिकवतो पण बोलीभाषा शिकवायला विसरून जातो किंवा ते कमीपणाचं वाटतं. मुलांचंच कशाला प्रगत विकसित शहरांमध्ये राहणाऱ्यांनी स्वतःलाच विचारून पहा ना कि तुम्ही तुमची बोलीभाषा शेवटची कधी बोलला होतात. बोलीभाषाच नव्हे तर आपण बऱ्याच गोष्टी विसरून फक्त पुस्तकी किडे होत चाललो आहोत, तंत्रवत यंत्र होत चाललो आहोत. आतला आवाज विसरून फक्त वरवर ऐकतो आहोत आणि काळासोबत फक्त वेगाने धावत आहोत.
सर्वांना वाटतं कि आपणच पहिले असावे, आपल्या मुलांनी अव्वल असावे आणि या नादात आपण इतरांना प्रोत्साहन देणं, इतरांच्या यशाचा स्विकार करणं, माणूस म्हणून जगणं हरवून बसलो आहोत. टॅलेंट, उच्च पदवी आणि high IQ च्या नादात low EQ होत चालला आहे याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
बऱ्याचदा उत्तमोत्तम गुणवत्ता असलेली माणसं पुढे जाऊन कमजोर मनाचे असलेले दिसून येतं. कारण ते फक्त यशाचा आनंद साजरा करायला शिकलेले असतात पण दुर्दैवाने आयुष्याच्या प्रवासात कधी अपयश वाट्याला आलंच तर ते कसं पचवायचं हेच शिकलेले नसतात. आणि मग सर्वकाही असूनही पदरी पडतं नैराश्य!
High IQ मुळे अशी माणसं बॉस बनतात पण उत्तम मार्गदर्शक / लिडर्स बनत नाहीत किंवा इतरांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं असं कधीच वाटत नाही. अशी माणसं फक्त स्वतःची प्रगती करत जातात. घरातले कर्ता असले तरिही ते कुटुंबाला जोडून ठेऊ शकत नाहीत. अशी high IQ असणारी माणसं फक्त अन् फक्त मेंदूनेच विचार करतात.
याच्याच अगदी उलट High EQ असणारी माणसं नेहमी भावनांचा विचार करून भावनिकतेने निर्णय घेणारी असतात. पण हि माणसं कधीकधी भावनांच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसानही करुन घेतात. म्हणूनच या दोन्हीचा ताळमेळ असणं फार गरजेचं आहे.
वास्तव हेही नाकारता येत नाही कि या जगात अशीही माणसं आहेत जी उच्च शिक्षित नाहीत किंवा ज्यांना शाळेची पायरीसुद्धा चढता आलेली नाही किंवा काही परिस्थितीमुळे शाळा कॉलेज अर्धवट सोडावे लागले आहे. परंतु हि अशी माणसे सुद्धा आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी झालेली आहेत. सर्वार्थाने म्हणजेच आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, नातेसंबंधांमध्ये, सामाजिकदृष्ट्या! हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही भावनिक असता, हळवे असता. म्हणूनच भावनिक आणि हळवी माणसंच सर्वाधिक शिक्षित असतात असं म्हणायला हरकत नाही.
जर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांना काय हवंय, तुमच्या जोडीदाराला काय हवंय, तुमच्या ग्राहकाला काय हवंय, तुमच्या आईवडीलांना काय हवंय, तुमच्या मालकाला, तुमच्या सिनियर्सना, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना, तुमच्या मुलांना, तुमच्या श्रोत्यांना आणि सोबतच तुम्हाला, तुमच्या आत्म्याला तुमच्याकडून काय हवंय हे जर का तुम्हाला कळत असेल तर तुम्ही जगातील सर्वोच्च शिक्षित व्यक्ती आहात. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या भावना कळणं फार गरजेचं आहे जे पुस्तकी ज्ञानातून तुम्ही शिकू शकत नाही.
कितीही मोठ्या विदेशी विद्यापिठात शिक्षण घेतले तरी जर व्यवहार ज्ञान शून्य असेल, भावनांचा आदर करता येत नसेल, अवतीभोवतीच्या समाजाप्रती, माणसांप्रती, परिस्थितीशी जर तुम्ही हळवे नसाल तर माणूस म्हणून तुम्ही शून्य आहात. तुम्ही फक्त यंत्रवत जगत आहात.
बरिच माणसं आपल्या अवतीभोवती असतात जी प्रचंड प्रोफेशनल असतात पण ज्यावेळी ती आपल्या प्रिय व्यक्तीसोबत असतात तेव्हा अगदी विरूद्ध वागत असतात म्हणजेच अगदी लहान मुलांसारखी हट्टी, खट्याळ, खोडकर किंवा हळवेपणाने वागतात परंतू जर समोरच्या व्यक्तीने त्यांच्या याच भावनांना समजून न घेता जर त्यांच्या या स्वभावाला बालीशपणाचे लेबल चिटकवले तर हळूहळू नाती तुटत जातात. म्हणूनच बुद्धीमत्तेसोबतच काळजावरही संस्कार होणं गरजेचं असतं.
आपल्या मनात सहानुभूती, करूणा, दयाभाव, प्रेम असावे, विविधतेचा आदर करता यायला हवा, समोरच्या प्रत्येक व्यक्तीचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा मान-सन्मान करता यायला हवा, देशाच्या कायद्याचा आदर करता यायला हवा, इतर धर्मांचा, इतर धर्मियांच्या संस्कृतीचा आदर करता यायला हवा. स्वतःच्या बंधनात कुणालाही बांधून न ठेवता समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन वैचारीक मोकळीकता देता यायला हवी. इतरांच्या तत्वज्ञानाचे, नैतिकतेचे, कलेचे आणि सामाजिक मूल्यांचे कौतूक करता यायला हवे.
बाळ जन्माला येताच रडतं, हसतं, डोळे मिचकावतं पण हे रडणं, हसणं असंच नसतं तर हे सिग्नल असतात भुकेचे, आनंदाचे, दुःखाचे; गर्भात असताना एकलेले आवाज पुन्हा कानावर पडताच शांतपणे एकाग्र होऊन ऐकणे आणि हे सर्व त्या बाळाच्या आई बाबांना क्षणात कळतात. पण जर बाळाचे आई वडील अडाणी असोत वा उच्चशिक्षित जर त्यांना या बाळाच्या भावनाच कळत नसतील तर ते भावनाशून्य मनाचे अडाणी दगड आहेत असंच म्हणावं लागेल.
आईला बाळाच्या किंवा आपल्याला आईच्या भावना कळण्यासाठी कोणत्याही पुस्तकी ज्ञानाची गरज नसते. मुलांना काय हवंय, त्यांच्या भावना, इच्छा – आकांक्षा काय आहेत याचा जराही विचार न करता बरेच पालक त्यांच्या करीयरची निवड किंवा त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराची निवड करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेतात. ज्याचे दुष्परिणाम पुढे जाऊन अनुभवास येतात.
कधीकधी काही निर्णय मेंदूने नव्हे तर काळजातून घ्यावे लागतात. त्यावेळी तुमचं पुस्तकी शिक्षण कामी येत नाही. आपला आतला आवाज जे सांगतो तेच आपण बहुतेकदा ऐकतो. म्हणूनच ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीने वागणारी भावनिक माणसंच आयुष्यात सर्वाधिक यशस्वी अन् समाधानी असतात. हि भावनिक माणसं कदाचित आर्थिक गरजा पूर्ण करण्यात कधीतरी मागे राहत असतील पण आत्मिक समाधान यांना जास्त असते, हे आपल्या माणसांना लगेच समजून घेत असतात, आणि नकळत इतरांच्या काळजात कायम घर करून जातात.
दुर्दैवाने हल्ली नात्यांमध्ये किंवा प्रोफेशनल आयुष्यात सुद्धा लोकं भावनांना बाजुला सारून जगत आहेत आणि फक्त यशाच्या मागे धावत आहेत एकटेच-एकाकी! कदाचित याचं कारण चाणक्यनितीनुसार हेही असेल कि सरळ झाडं आणि साधी सरळ माणसं सर्वात आधी टार्गेट केली जातात. हे लक्षात घेता भावनांच्या आहारी न जाता हे ही तितकंच समजून घ्यायला हवं कि कोणीही आपला किंवा आपल्या भावनिक असण्याचा गैरफायदा घेणार नाही.
बरेच जणं म्हणतील की प्रोफेशनल आयुष्यात भावनांना थारा द्यायला हवा कि नको, तर हो द्यायला हवा! कारण ज्यावेळेस तुमच्या ग्राहकांना किंवा समोरच्या व्यक्तीला जे हवंय तेच तुम्ही अचूकपणे हेरून घेऊ शकत असाल आणि तेच समोरच्याच्या काळजापर्यंत जर पोहोचवू शकत असाल तर तुम्ही सर्वतोपरी व्यावसायिक दृष्टया सुद्धा यशस्वी आहात.
आपले परिक्षेतील गुण किंवा आपली पोझिशन/ डेझिग्नेशन यावरुन काही माणसं आपल्याला जोडली जातात पण कायमसाठी कोणीही हे सर्व लक्षात ठेवत नाहीत. उलटपक्षी जर तुम्ही एखाद्याला त्याच्या अडचणीतून बाहेर काढले असेल, त्याच्या अडल्या वेळी केलेली मदत मग ती कोणत्याही प्रकारची असेल, एखाद्याला त्याच्या पडत्या काळात दिलेला भावनिक आधार असेल, एखाद्याच्या खचलेल्या क्षणी त्याच्या ओठांवर जर हसू आणले असेल तर तुम्ही त्यांच्या मृत्यूपर्यंत किंवा तुमच्या मरणोत्तर ही त्यांच्या काळजात घर करून राहता.
हल्ली ब्रेकअप किंवा घटस्फोट का वाढले आहेत? काही कारणांपैकी एक कारण हेच की माणसं आपल्या जोडीदाराच्या भावनांना समजून घ्यायला कमी पडत आहेत. समोरची व्यक्ती आपल्यासोबत असं का वागली हेच आपण समजून घेत नाही, जोडीदाराला गृहित धरून खोेटे बोलले जाते किंवा खोटे पाडले जाते, किंवा पुढचा मागचा विचार न करता फसवणूक केली जाते, समोरच्याने समजाऊन सांगितलं तरीही कुणा तरी तिसऱ्याच्या सांगण्यावरून नाती तोडली जातात.
कधी बायकोसाठी आईवडीलांना सोडलं जातं, कधी सासरच्यांसाठी माहेरची नाती तोडली जातात, कधी आईवडीलांच्या सांगण्यावरून पार्टनरला सोडले जाते, चुकीच्या संगतीत येऊन प्रियकर प्रेयसी एकमेकांना सोडून जातात, संशयीपणावरुन नाती तोडली जातात. पण या सर्व गोष्टींना बाजूला सारून, पुढाकार घेऊन, मानपान विसरून झालेल्या चुकांची माफी न मागता एकमेकांच्या भावनांना समजून घ्यायला कमी पडतआहेत. दोघांपैकी एक व्यक्ती कधी कधी समजून घेणारी असली तरी दुसरी व्यक्ती समजून घेत नाही ज्यामुळे नातं एका बाजूने सांधण्याचा प्रयत्न केला जातो अन् दुसऱ्या बाजूने ताणण्याचा! शेवटी सांधणारा थकतो आणि मोडणारा जिंकतो!
म्हणूनच पुस्तकी ज्ञानाइतकेच, high IQ इतके, मेरीट इतकेच महत्वाचे असते व्यवहार ज्ञान, high EQ आणि भावनांना समजून घेणारं एक भावनिक हळवं विनम्र मन! कारण हेच सर्व गुण माणसाला सर्वाधिक शिक्षित बनवत असतात आणि इतरांच्या नजरेत, काळजात, आठवणीत एक घर करून रहायला मदत करतात.
वरवर काटेरी असणारा फणस आतून गोड असतो, वरून टणक असणारा नारळ आत गोड पाणी आणि मऊ खोबरं साठवून असतो अगदी तसंच आपणही रहायला शिकलो आणि आपल्या पुढच्या पिढीलाही पुस्तकी ज्ञानासोबत जर हे शिकवू शकलो तर आणि तरच आपण खऱ्या अर्थाने उच्च शिक्षित समाज घडवण्यात मोलाचं योगदान देऊ शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khup chan
I Like It
Best article sir☝️