भावनाशून्य माणसांसाठी आपले अश्रू वाया घालवू नका.
मयुरी महेंद्र महाजन
पुणे
जिथे जीव आहे तिथे भावना आल्याचं…. या मी ठिकाणी माणूस म्हटले नाही कारण की भावना फक्त माणसालाच असतात असे नाही, त्या प्रत्येक जीवामध्ये असतात फरक फक्त इतकाच की मुक्या प्राण्यांना ते बोलून मांडता येत नाही परंतु माणसापेक्षा प्राणी आपल्या भावनांसोबत बनावटी नसतात…. माणूस भावनेच्या ओझ्याखाली कितीतरी लोकांची फसवणूक करून घेतो ,…परंतु प्राणी असं कधीच करत नाही जीवनाच्या वाटेवर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जगात वावरतात प्रत्येक जण आपापली तर्हा जोपासतो…..
एकाच छताखाली वाढणारे दोन जीव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची विचारधारा अंगिकृत करतात… त्यामध्ये जीवावर झालेले संस्कार मिळाले प्रेम आपुलकी आणि मिळालेले वातावरण या तीन गोष्टी माणसाला घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात….
काहीजण खूप भावनिक असतात अगदी टीव्ही मध्ये जर काही भावनिक सीन चालू असेल तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी येते ती नाटक करणारी पात्र ईतकी जिवंत वाटतात आणि हूबेहूब वाटतात….कि वास्तवाचा संबंध त्या पात्रांशी जोडलेला आहे आणि त्यामुळे त्यात भावनिक गुंतवणूक वाढत जाते ….आणि काही यापेक्षा उलट असतात त्यांना कोणाच्या सुख-दुखाशी समरुपता वाटत नाही… दगडाला पाझर फुटतो पण अशा व्यक्तींना नाही असे बरेच जण म्हणतात माणूस हा भाव भावनांनी जोडलेला आहे.
मनाच्या निर्मळ भावनेचा ओलावा हा प्रत्येक व्यक्तीला अनुभवायला मिळेलच असे नाही …. बर्याचदा पेपरमध्ये, बातम्यांमध्ये जेव्हा क्रूरपणाच्या घटना प्रसंग वाचते तेव्हा आपसूकच प्रश्न पडतो मला…… खरंच ही माणसे इतकी भावनाशून्य कशी असू शकतात दोन दिवसाचे बाळ कचर्याच्या कुंडीत सापडते तेव्हा त्या जन्म देणाऱ्या माऊलीच्या भावनांची शिदोरी आटून गेली का संपून गेली …..असा प्रश्न पडतो???????????
माणूस माणसासारखा कमी आणि राक्षसासारखा जास्त वागू लागलाय… कारण कुठेतरी माणसाच्या भावना माणसाने मारून टाकलेल्या आहेत…. म्हणून हल्ली खून करायला एखाद्याचा जीव संपायला तसा प्रयत्न करायला जीव कचरत नाही याउलट भावनिक असणाऱ्यांना अशा लोकांमुळे भरपूर त्रास होतो आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू दुखावलेल्या मनाची व्यथा सांगतात भावनाशून्य असलेल्यांना त्याचे काहीच वाटत नाही.
त्यामुळे भावनाशून्य माणसांसाठी आपले अश्रू वाया घालवू नका कारण …बर्याच जणांना असे वाचते की भावनिक असणं चुकीचं आहे परंतु भावनिक असणं ही माणूस असण्याची पहिली पायरी आहे फक्त काळजी घ्यावी की आपल्या भावनिक असण्याचा कुणी गैरफायदा घेता कामा नये आपण कुठे आणि किती प्रमाणात भावनिक असावे याला काहीतरी मर्यादा असावी कारण एकाची भावनिक गुंतवणूक दुसर्याच्या अर्थी भावनाशून्य असेल तर फक्त त्या भावनाशून्य असलेल्या व्यक्तीसाठी अश्रु वाहून काहीच उपयोग नसतो.
त्यामुळे स्वतः स्वतःच्या भावना जपणं त्यांना योग्य ठिकाणी व्यक्त करणं आणि त्या भावनांची कदर करणं हे सर्वस्वी आपणच आपल्यासाठी करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला माफ करणे,… कारण जर समोरची व्यक्ती भावनाशून्य आहे आणि आपण त्याच ठिकाणी भावनिक गुंतवणूक करून ठेवलेली असेल तर आपल्याला होणारा त्रासाचा सर्वच आरोप आपण स्वतःलाच आरोपी ठरवतो आणि मलाच कळले नाही मी चुकले मला त्या वेळेसच असे माहिती असते तर माझ्यावर ही वेळ नसती असे कितीतरी प्रश्नांनी आणि मनातल्या मनात युद्ध सुरू असते…
आपल्याला येणारे अश्रू आपल्या खर्या आणि निर्मळ भावनेचे प्रतीक आहे परंतु काहीजण खोट्या अश्रूंची वाट धरून फसवणूक सुद्धा करतात त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल आणि त्याचे अश्रू याची सांगड जुळत असेल तर ती व्यक्ती खरी आहे आणि जर डोळ्यांची भाषा काहीतरी वेगळेच सांगत आहे आणि अश्रू मात्र काही तरी वेगळेच सांगत तर मात्र कुठेतरी गफलत होतेय…. सावधगिरी बाळगा समुद्राचा तळ शोधणं सोपं परंतु माणसाच्या मनाचा तळ सापडणं कठीण ….
जर कुणा मुळे आपल्या डोळ्यात पाणी येत असेल तर आपण त्या व्यक्तीला जाणीव करून द्यायला हवी की आपले अश्रू इतके स्वस्त नाही ज्यांना त्याची कदर नाही त्यासाठी ते वाहू शकतील ज्या लोकांना आपल्या अश्रूंशी देणेघेणे नाही अशांसाठी आपण तटस्थतेची भूमिका घेतलेली कधीही उत्तमच…..
पूर्णता भावनाशून्य आणि पूर्णतः भावनिक असणे दोघेही घातकच त्यामुळे आपण सुद्धा आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना जाणून घेण्यात आणि त्याचा योग्य तो परिणाम घडवूण आणण्यात यशस्वी होऊ शकतो फक्त गरज आहे ती समजून घेण्याची आणि योग्य तिथे गुंतवणूक करण्याची जगण्यात आनंद अनुभवायचा असेल तर भावनांची जाण असायलाच हवी शेवटी आनंद सुद्धा मानवी मनाची भावना तरं आहे….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


