भरकटणारे मन संशय घेऊन जगू लागते.
हेमा यादव-कदम I 7875550789
“स्वतःवर विश्वास नसेल तर
सारे जग खोटे वाटू लागते …
भरकटणारे मन मग
संशय घेऊन जगू लागते ……..”
मनाशी मैत्री करण्याच्या कडे दुसरे पाऊल उचलण्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा की तुमचा स्वतःचा स्वतःवर विश्वास आहे का ? कदाचित तुम्ही म्हणाल की माझा स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे.
पण खरंच अस आहे का?
तुमच्यामध्ये असणारी अमर्याद शक्ती तुम्ही ओळखली आहे का?
विश्वास आणि अतीविश्वास यातील फरक तुम्हाला कळतो का ?
आयुष्यात तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही स्वबळावर मिळवण्याचा प्रयत्न करता की नशिबावर सोडून देता?
बरेच लोक असं म्हणतात की मी खूप प्रयत्न केले पण अपेक्षित ते यश मला मिळाले नाही , हा झाला तुमचा तुमच्या प्रयत्नांवर असलेला अति विश्वास आणि हा अतिविश्वास तुम्हाला खूप घातक ठरू शकतो,
माझ्या दृष्टीने विश्वास एक सुंदर भावना आहे , जो ईश्वर निर्गुण निराकार आहे त्याच्यावर आपण संकटकाळात डोळे बंद करून विश्वास ठेवतो. स्वतःला त्याच्या भरवश्यावर सोडून देतो .. जिथे आपण सुरक्षित आहोत हि भावना मनात येते त्याच क्षणी तिथे आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो ..
“उदा . सध्या कोरोना मुळे अनेक परप्रांतीय त्यांच्या लहान – लहान मुलांना घेऊन चालत चालत हजारो किलोमीटर चा प्रवास करत त्यांच्या गावी निघाले आहेत . आईवडिलांचा हात धरून ती लहान मुले ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता ना करता चालत आहेत त्यांना कोरोना शी काही घेणे-देणे नाही त्यांचा फक्त त्या आई बाबा वर विश्वास आहे आणि खात्री आहे कि ते त्याच्या सोबत सुरक्षित आहे ..
आपल्याकडे एक म्हण आहे “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” याचा अर्थ की तुम्ही जर योग्य मार्गाने कठीण परिश्रम घेतले खूप मेहनत केली तर तुम्हाला अपेक्षित असणारे यश तुम्हाला नक्कीच मिळणार असते पण कोणतीही एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण एकतर नशिबाला दोष देतो किंवा आपण म्हणतो की प्रयत्न करूनही हे मला मिळाला नाही , आपण स्वतः वरती आणि स्वतः केलेल्या प्रयत्नांवर कधीही संशय घेत नाही आपले प्रयत्न आपल्याला नेहमी योग्य वाटत असतात , याला आपण आंधळा विश्वास म्हणू शकतो .
सर्वात आधी आपण हे स्वीकारायला हवे की आपले प्रयत्न कमी पडले , विश्वास नसणे जितके घातक आहे तितकेच घातक अति विश्वास असणे हे देखील आहे कारण ज्या लोकांचा स्वतःवरती अतिविश्वास असतो ते स्वतःच्या चुका आयुष्यात कधीच सुधारू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक प्रगतीची वाढ खुंटताना दिसून येते.. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून स्वतःची बाजू नेहमी योग्यच आहे असं मांडणे नव्हे .
स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आपण स्वतःला आधी पूर्ण ओळखणे गरजेचे आहे, जगात आतापर्यंत ज्या लोकांनी त्यांना अपेक्षित यश प्राप्त केले ती व्यक्ती आणि आपण वेगळे नाही आहोत प्रत्येकाच्या मेंदूचे वजन एकसारखेच असते त्या लोकांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये फरक फक्त इतकाच आहे ही आपण स्वतःच्या क्षमता ओळखत नाही आणि स्वतःवर असलेल्या अति विश्वासामुळे आपण कुठे चुकतोय हेसुद्धा स्वीकारत नाही आपण शंभर टक्के बरोबरच आहोत आपल्या वागण्यात बोलण्यात सर्वच गोष्टीत आपण खूप हुशार आहोत ही संकल्पना आणि हा अतिविश्वास आपल्याला घातक ठरतो ..
मनाशी मैत्रीत करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वतःला विचारा की खरंच माझी आणि माझ्या मनाची मैत्री होऊ शकते का ? मनावर नियंत्रण मिळवण्यात इतका मी सक्षम आहे का?
कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे तटस्थपणे पाहायला सुरुवात करणार नाही आणि स्वतःवरील अतिविश्वास दूर करून स्वतःमधील दोष शोधून काढणार नाही तोपर्यंत तुमची तुमच्या मनाशी मैत्री होणार नाही
मनात येणाऱ्या लाखो विचारांमुळे आपले मन सदैव भटकत असते याला एका ठिकाणी थांबवून ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होणे गरजेचे आहे कारण जर मन स्थिर नसेल तर यश खूपच दूर राहते मनाला एका जागी केंद्रित करता आलं पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला लागाल कोणी तुम्हाला वाईट म्हणाले म्हणून तुम्ही वाईट होत नाही आणि कोणी तुमचे तोंड भरून कौतुक केले म्हणून तुम्ही चांगले होत नाही ..
वाईट गोष्टीने दुखावून जाऊ नका आणि कौतुकाने हुरळून देखील जाऊ नका. नाव ठेवणारी लोकच कौतुक करायलाही पुढे येतात आणि कौतुक करणारी लोक एक दिवस आपल्याला नाव ठेवायला ही तयार असतात त्यामुळे लोकांचा विचार करून त्याचा परिणाम स्वतःच्या मनावर होऊ देऊ नका तुम्ही कोण आहात आणि तुमचे भविष्य तुम्ही किती छान घडवू शकता हे फक्त तुमच्या स्वतःवर असलेल्या विश्वासावर अवलंबून असते.
आधीच तुमचे मन भरकटलेले त्यात इतर लोकांचे ऐकून निर्णय चुकतात आणि निर्णय चुकले कि आयुष्य चुकते त्यामुळे सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका कारण जर स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवलात स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या निर्णयांवर जर तुम्ही संशय नाही घेतलात तर कदाचित तुम्ही तुमच्या मनाशी मैत्री करण्याकडे पहिले पाऊल नक्की उचललेले असेल.

Online Counseling साठी !
लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.
तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.

