Skip to content

बाहेरचे आपल्याला टेन्शन देतात, मग आपण घरच्यांना का टेन्शन देतो.

बाहेरचे आपल्याला टेन्शन देतात, मग आपण घरच्यांना का टेन्शन देतो.


टीम आपलं मानसशास्त्


कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद , किंवा प्रतिक्रिया म्हणजे ‘तणाव’ / टेन्शन होय.

एखादी गोष्ट आपल्या कंट्रोल मध्ये नसेल तर, किंवा बाह्य परिस्थिती मध्ये होणारा बदल आपण पटकन accept करत नाही त्यामुळे आपल्या मनाची होणारी अवस्था म्हणले तरी चालेल .

तणाव अनेक ठिकाणी असतो .कामाच्या ठिकाणी असेल , अभ्यासाचा असेल , बढती चा असेल किंवा नोकरी मध्ये रोजचे टार्गेट पूर्ण करण्याचा असेल , किंवा घरच्या स्त्री ला घरच्या जबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडण्याचा असेल. आज आपण विचार करणार आहोत की ,
” बाहेरचे आपल्याला टेन्शन देतात, मग आपण घरच्यांना का टेन्शन देतो.” ?

मानवी स्वभाव आहे बाहेर काही बिनसले की घरी येवून राग काढायचा सगळा.चिडचिड , ते बाहेरचे टेन्शन आपल्या घरात घेवून यायचे. कारण काय तर आपले घरचे आपल्याला समजून घेणारे असतात. आपण चिडलो तरी ऐकून घेवून शांत बसतात. आपल्याला विरोध करत नाहीत. किंवा मग शांत राहुन आपले ही टेन्शन कमी करण्याकरिता मदत करतात .

आपल्याला आधार देतात. कधी काही चांगला सल्ला देवून , कधी योग्य ती मदत करून . जसे शारीरिक असेल तर ती नाही तर मानसिक आधार ती. आपल्याला आपले टेन्शन आपल्या लोकांच्या समवेत शेअर केले की हलके वाटते . आपले टेन्शन कमी होते. मार्ग ही सुचतात. म्हणून बहुतेक वेळा बाहेरच्या नी टेन्शन दिले की आपण घरच्यांना टेन्शन देतो.

शाळा , कॉलेज ,ऑफिस मध्ये शिक्षक रागावले , तर इकडे बॉस रागावले. कामाचे टेन्शन दिले, तर कधी शिक्षकांनी अभ्यासाचे , पुढे पास होण्याचे टेन्शन दिले किंवा वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे टेन्शन असेल, कधी प्रेमात वाद विवाद असतील रिलेशनशिप मध्ये टेन्शन असेल , कधी मैत्री मध्ये गैरसमजातून आलेले टेन्शन असेल तर या सगळ्या टेन्शन चा परिणाम म्हणून ते बाहेरचे टेन्शन आपण घरी घेवून येतो.

आणि घरच्यांवर चिडचिड करतो , रागावतो , भांडतो. नाही तर मग कधी खाण्यापिण्यावर राग काढतो. अगदी च एखाद्याचा स्वभाव कोणाला काही न सांगण्याचा असेल तर घरी आल्या आल्या आपल्या खोलीत निघून जावून शांत बसत असेल. कोणाशी काही बोलणार नाही. घरच्यांना ही त्याच्या या एकटे पणांचे टेन्शन लक्षात येते की बाहेरचे काही तरी घरी आले आहे.

अशीच एक गोष्ट एक वडील ऑफिस मधून घरी आले की ऑफिस मधल्या कामाचे रोजचे टेन्शन , बॉस ने कामाचे टार्गेट पूर्ण करण्याचे दिलेले टेन्शन यामुळे रोज घरी आले की घरच्या सगळ्यांवर चिडचिडेपणा करत. त्यांच्या बरोबर घरी कोणाला बोलण्याचे ही टेन्शन येत असे.

एकदा वडील घरी येतानाच ऑफिस चे टेन्शन त्यामुळे चिडचिड करतच घरी येतात. घरी आल्या बरोबर मुलगा त्यांना म्हणतो की बाबा , बाबा , मला तुमची मदत पाहिजे आहे. मला शाळेत एक प्रोजेक्ट दिला आहे त्याकरिता तुंमची मदत पाहिजे.बाबा त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात तुझा तू प्रोजेक्ट कर. बिचारा मुलगा रडत रडत जातो आणि आपला प्रोजेक्ट पूर्ण करता करताच झोपून जातो .

वडील जेव्हा शांत होतात तेव्हा त्यांना वाईट वाटते मुलावर चिडल्याचे . ते मुलाचा प्रोजेक्ट बघायला येतात तेव्हा तो रडत रडत झोपलेला दिसतो मग अजूनच वाईट वाटते. ते बघतात की त्याने काय लिहिले आहे. त्याला दिलेला विषय काय आहे .विषय असतो की , जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी कोणत्या :

वडील वाचायला लागतात. सुरुवातीला च मुलाने लिहिले असते . की माझे बाबा खूप मेहनत करतात , ऑफिस मध्ये मनापासून काम करतात. तरीही त्यांना ऑफिस मध्ये काम पूर्ण करण्याचे टेन्शन असते. त्यांचा बॉस त्यांना सतत टार्गेट पूर्ण करण्याचे टेन्शन देत असतो. म्हणून माझे बाबा घरी आल्यावर आमच्या वरही चिडचिड करतात. त्यामुळे आम्हाला ही टेन्शन येते.

पण माझे बाबा जगातले सगळ्यात चांगले बाबा आहेत. कारण प्रत्येक वेळी माझे लाड माझे बाबाच पूर्ण करतात. मला छान छान ड्रेस माझे बाबाच घेतात, माझ्या गरजा बाबाच पूर्ण करतात. शाळेची फी , पुस्तके याचा खर्च माझे बाबाच करतात. मला नवीन गोष्टी संगतात. शिकवतात. त्यामुळे आनंदाच्या गोष्टी पुढे आम्ही टेन्शन विसरून जातो.

त्यानंतर पुढे लिहिले असते. जगातली अजून एक चांगली गोष्ट म्हणजे परीक्षा आणि परीक्षेचे टेन्शन : परीक्षा आपल्यालात खूप सुधारणा घडवून आणते. परीक्षा असते म्हणून आम्ही मुले चांगला अभ्यास करतो , पाठांतर करतो. पाढे पाठ करतो म्हणजे पटकन गणित सुटते. पेपर चांगला लिहावा , लिहिलेले समजावे म्हणून सुंदर आणि मोत्या सारखे अक्षर काढायला शिकतो.

परीक्षा असते त्याचे टेन्शन असते म्हणून आम्ही चांगले प्रयत्न करतो आणि त्याचे फळ म्हणून आम्ही चांगले मार्क्स मिळवून पास होतो. आणि अजून पुढील इयत्तेत प्रवेश मिळवून पुढचा अवघड अभ्यासक्रम शिकतो. ती शिकण्याची संधी मिळते.

मुलाच्या बाबांच्या डोळ्यात पाणी च येते. आपण ऑफिस मधल्या कामाच्या टेन्शन मुळे, बॉस कामाचे सततचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता देत असलेल्या टेन्शन मुळे घरच्यांची चूक नसताना त्यांच्यावर चिडत होतो. आता इथून पुढे मी कामाच्या टेन्शन मुळे स्वतः ही त्रास करून घेणार नाही आणि माझ्या विचित्र , चिडचिड करण्याच्या वागणुकीचे टेन्शन घरच्यांना ही देणार नाही.

त्यामुळे मुलांना जी भीती बसली होती .की मुलं बाबांचा मूड कसा असेल बोलावे का नाही या गोष्टींचे टेन्शन घेत असतील ते सगळे आता दूर करणार. ऑफिस चे टेन्शन ऑफिस मध्येच सोडून येणार असा ठाम निश्चय बाबा करतात .

एकदा बाबांचे बॉस त्यांच्या सोबत त्यांच्या घरी येतात. तेव्हा घरात येण्यापूर्वी अंगणातल्या प्राजक्ताच्या झाडाला काही तरी टांगून ठेवायला सुरुवात केली आणि ते झाल्यावर काही तरी सोडून घेत होते सोबत , तेव्हा बॉस ने त्यांना विचारले हे काय करत आहात तुम्ही ? काय टांगून ठेवत आहात.

तेव्हा बाबा आपल्या बॉस ना सांगतात की घराचा उंबरा ओलांडून येण्यापूर्वी मी या प्राजक्ताच्या झाडावर माझे बाहेरचे सगळे टेन्शन , इतर लोकांनी मला कसे ही वागवू देत तो राग , चिडचिड , द्वेष , स्पर्धा , जे काही असेल ते हे सगळे मी तिथे बांधून ठेवतो. आणि सोबत शांतता , प्रेम , आपुलकी , माया , आनंद हे त्या झाडावर बांधून ठेवलेली माझी पुंजी घराचा उंबरठा ओलाडताना माझ्या सोबत घेवून येतो.

बॉस ना त्याच्या या कृतीचे खरेच कौतुक आणि आश्चर्य वाटते. आणि त्याला त्याच्या सुखी कुटुंबाचे रहस्य ही कळते. बाहेरचे आपल्याला टेन्शन देतात, आपण त्यावर react होत असतो. त्याला response देत असतो. आणि मनाविरुद्ध घडले . किंवा आपण या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकलो नाही तर मग आपण घरच्यांना का टेन्शन देतो.

आयुष्य सुंदर आहे. बाहेरच्या लोकांच्या वागण्याचा आपल्यावर , आपल्या मनावर टेन्शन येवू देवू नका आणि आपल्या घरच्यांना ही त्याचे टेन्शन देवू नका. स्वतः टेन्शन फ्री जगा. आणि घरच्यांनाही टेन्शन फ्री जगू द्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!