बहुतेक व्यक्ती आतून अस्वस्थ आहेत आणि त्याचा आपल्यावरही परिणाम होतोय.
गीतांजली जगदाळे
लहानपणापासून आपल्याला चांगल्या संगतीत राहायला सांगितले जाते. कारण संगतीचा परिणाम खूप खोलवर आपल्यावर होत असतो कधी कळत तर कधी नकळत ! आपल्या विचारांवर, वागणुकीत आणि जडणघडणीत बऱ्याच वेळा संगतीचा ही मोठा महत्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या mood चा देखील आपल्यावर परिणाम होत असतो.
भावना ही एक प्रकारची energy असते. चांगल्या आणि वाईट भावना या energy स्वरूपात लोकांपर्यंत पोहचत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अस्वस्थ असतो किंवा आपल्या आजूबाजूचं कोणी अस्वस्थ असल्यास त्याचा ही गंभीर स्वरूपात परिणाम होत असतो. जो माणूस आनंदी असतो त्याच्या सहवासात आपल्याला ही तेवढ्या वेळेपुरतं का होईना प्रसन्न वाटत. पण तेच दुःखी, बेचैन, किंवा अस्वस्थ मन असल्यास त्याने आजूबाजूच्या लोकांवर त्याचा नकारात्मक परिणाम पाहावयास मिळतो.
काही लोक आतून कितीही अस्वस्थ असले तरी देखील वरून स्वतःला आनंदीच दाखवायचा प्रयत्न करतात. आणि बहुतेक लोकांना ते चांगल्या प्रकारे जमते देखील. तरी सुद्धा खरा आनंद आणि आनंदी असण्याचा मुखवटा यात खूप फरक असतो. लक्ष दिल्यास तो ही लक्षात येतोच.
पण आजकाल आपण इतक्या घाईत असतो आणि इतके स्वतःच्या गोष्टींमध्ये गुरफटलेले असतो की बऱ्याचदा या गोष्टी आपल्या नजरेतून सुटतात किंवा कळून ही लक्षात येत नाही. आणि जे समोरचा माणूस दाखवतो त्यावर आपला विश्वास बसतो. पण तरी देखील त्यांच्याकडून मिळणारी energy ही नकारात्मक च असते. कारण शेवटी मनाची खरी अवस्था जी असते त्याच प्रकारची ऊर्जा ही आपल्या आजूबाजूला पसरत असते. त्यामुळे वर वर दाखवल्या जाणाऱ्या आनंदाने सुद्धा आपल्यावर नकारात्मक परिणामच होत असतो.
मन अस्वस्थ होण्याची अनेक कारणे असतात. पण काही वेळा काही कारण नसताना देखील अस्वस्थ झाल्यासारखं वाटत. त्याच कारण हे ही असू शकत की आपण ज्या वातावरणात राहतो तिथे मानसिक रित्या अस्वस्थ असणाऱ्या माणसांचं प्रमाण जास्त असावं आणि त्यांच्यात राहून त्यांच्या mood चा आपल्यावर देखील परिणाम झालेला असतो.
दुसऱ्यांच्या अस्वस्थतेबद्दल आपण फारसं काही करू शकत नाही. कारण शेवटी आपल्या भावभावनांसाठी आपण जास्त जबाबदार असतो. त्यामुळेच आपल्या अस्वस्थ, बेचैन किंवा कोणत्याही नकारात्मक भावनांचा परिणाम दुसऱ्यांवर होऊ नये किंवा आपल्या बाबतीत ही तो फार काळ टिकू नये यासाठी आपण काहीतरी काळजी नक्कीच घेऊ शकतो.
आजकाल खूप छोट्या छोट्या कारणांवरून माणसं नाराज आणि दुःखी होताना दिसतात. म्हणजे खरंच जेव्हा काही घडत तेव्हा असं वाटण खूप साहजिक असत पण आजकाल काही लोकांच्या दु:खी होण्याच्या, नाराज होण्याच्या मागचं कारण हे देखील असत की अमुक अमुक व्यक्ती माझं ऐकत नाही किंवा माझ्या मनासारखं वागत नाही. प्रत्येक माणसाचे आचार, विचार हे सारखे नसतातआणि असले तरी प्रत्येक ठिकाणी जुळतीलच असं नसत. त्यामुळे आपल्या विचारांनुसार योग्य असणारी गोष्ट समोरच्याला चुकीची वाटण शक्य असू शकत.
त्यामुळे आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींमध्ये किती गोष्टी genuine आहेत आणि किती आपण सोडून देऊ शकतो याचा विचार नक्की च केला पाहिजे. जेव्हा ही गोष्ट स्वीकारली जाते की मला जी गोष्ट योग्य वाटते तीच सगळ्यांना वाटणं गरजेचं नाहीए, त्यावर इतर लोकांचं वेगळं मत ही असू शकत तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण आपली मानसिक अवस्था affect होऊ देत नाही. त्याने असं केल त्यामुळे मला हे असं वाटलं, त्याने असं केल नसत तर मला असं वाटलंच नसत हे आपण दर वेळी प्रत्येक माणसाच्या बाबतीत नाही बोलू शकत.
कारण आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल हा आपल्याच हातात असणं गरजेचं आहे. काही घटना अशा असतात की जिथे हा कंट्रोल जाऊ शकतो पण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींसाठी हे नक्कीच लागू पडत नाही. जेव्हा आपण एखाद्यावर चिडतो, रागावतो, नाराज होतो तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त आपण आपल्या मानसिक आरोग्याचं नुकसान करत असतो.
ही गोष्ट जर लक्षात घेतली आणि त्यात योग्य तो बदल केला तर आपल्या अस्वस्थतेचं प्रमाण देखील कमी असेल आणि त्यामुळे इतरांवर होणारा नकारात्मक परिणाम देखील कमी असेल. लहानसहान गोष्टी धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आणि दर वेळी अस्वस्थ माणसांना टाळणं देखील शक्य होणार नाही आणि कधी कधी तर ते बरोबर देखील वाटणार नाही. एकच आयुष्य आहे ते ही किती आहे, किती नाही आपल्याला माहित नाही, आहे ते दिवस आनंदाने एकमेकांसोबत घालवूयात !!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

