बहरलेली सकाळ येण्यासाठी रात्रीची शांत झोप महत्वाची!!
डॉ.रोहिणी कोरके
‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य संपदा लाभे.’ असे आपल्याकडे म्हटलेले आहे. जो सकाळी लवकर उठतो त्याचा पूर्ण दिवस ताजातवाना जातो. नाहीतर दिवसभर आळस आपली पाठ सोडत नाही.
आयुर्वेदात ‘ब्राम्हे मुहूर्त उत्तिश्ठेत जातवेगा समुत्सृजेत!’ असे म्हटले आहे याचाच अर्थ ब्राम्ह मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी म्हणजे साधारण दीड तास उठले पाहिजे आणि याच काळात प्रात:विधी उरकले पाहिजेत असे वर्णन केलेले आहे. कारण हा काळ वात दोषाचा सांगितला आहे. या काळात ते विधी झाल्यास शरीरस्वास्थ्य टिकून राहते. पण ब्रम्ह मुहूर्त म्हणजेच सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे महत्वाचे आहे. राञी लवकर व शांत झोप लागली तर झोप व्यवस्थित होते व सकाळीही प्रसन्न वाटते.
आयुर्वेदामध्ये आहार, निद्रा आणि ब्रम्हचर्य हे तीन शरीराचे उपस्तंभ सांगितले आहेत, या तिन्ही गोष्टींवर शरीराचे स्थैर्य / आरोग्य अवलंबून असते. म्हणजे आपल्या आयुष्यात निद्रेलाही आहाराइतकेच महत्व आहे हे यावरून स्पष्ट होते.जितका चांगला आहार शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे तितकीच शांत झोप ही महत्वाची आहे.
निद्रेचे लाभ
निद्रायत्तं सुखं पुष्टिं आरोग्यं बलं
वय ।
असे वर्णन आहे.म्हणजेच योग्य प्रमाणात निद्रा घेतल्यास सुख,पुष्टी,आरोग्य,बल,वय म्हणजे दीर्घायु यांची प्राप्ती होते. निद्रा किती प्रमाणात घ्यावी तर सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींना 6-7 तास तर मुले, बालक यांना 10-12 तास निद्रा आवश्यक असते.
परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निद्रेचे प्रमाण खूप कमी झाले आहे किंवा असे म्हणता येईल रात्रीचे निद्रेचे प्रमाण कमी झाले आहे. कारण रात्री 11-12 वाजेपर्यंत कोणी सहसा झोपत नाहीत. लहान मुलेदेखील इतका वेळ पर्यंत जागी असतात. याला कारण म्हणजे एकतर कामाच्या उशिरापर्यंतच्या वेळा आणि दुसरे म्हणजे TV, Mobile इ.मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धी अधिक प्रमाणात झाल्याने रात्री उशिरा झोपण्याची सवय जडत चालली आहे.
त्यापरिणामी सकाळी उशिरा उठणे ही आता सामान्य बाब झाली आहे लहान मुलांनाही तशाच सवशी लागत आहेत. तसेच Mobile, T.V च्या अति उपयोगामुळे साहाजिकच त्या किरणांच्या परिणामस्वरूप रात्रीची शांत झोप लुप्त होत चालली आहे. तसेच यासोबत अनिद्रा किंवा निद्रानाश, स्वप्नविकार इ. मनोविकार जडू लागतात.त्याचे शरीरावरही दुष्परिणाम दिसून येतात.
म्हणून रात्रीची शांत झोप खूप महत्वाची आहे. शांत झोप लागण्यासाठी काही आयुर्वेदोक्त उपाय.
१) एकतर दुपारची झोप टाळावी किंवा रात्री जितके जागरण झाले असेल त्याच्या निम्मा वेळ दुपारी झोप घ्यावी.
2) आहारामध्ये दूध, तूप फळे अशा सात्विक पदार्थांचे प्रमाण असावे.म्हणजे शांत अन् प्रसन्न निद्रा प्राप्त होते.
३) खसखस ची खीर घ्यावी.
४) रात्री झोपताना तळपायाच्या तळव्यांना खोबरेल तेल चोळावे.
५) डोळ्यात रात्री झोपताना त्रिफला / महात्रिफळा घृताचा एक एक थेंब टाकावा. झोपही शांत लागते.तसेच इतर नेत्रविकारही होणे टळते किंवा असलेले विकार बरे होण्यास मदत होते.
६) निद्राजनन औषधी जसे की तगर,जटामांसी, ब्राम्ही यांचा उपयोग गरजेनुसार व वैद्याच्या सल्ल्याने करावा.
७) रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण मधातून घ्यावे.डोळ्यांसाठी चांगले असते
अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय केल्यास रात्री लवकर व शांत झोप लागते व आपली सकाळ बहरलेली व प्रसन्न अशी अनुभवाला येते.
आपल्याकडे सुखी माणसाच्या व्याख्येमध्ये म्हटले आहे ना की ज्याला बिछान्यावर पडल्याबरोबर लगेच झोप लागते तो खरा सूखी मनुष्य! मग आपण या सुखाला पारखे का व्हावे.म्हणून आजपासून सर्वांनी लवकर झोपण्याचा आणि प्रसन्न प्रभात समयीचा संकल्प करूया.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


