“बस्स.. जगायचं आहे.” निर्दय काळात एवढंच लक्षात ठेवा.
मधुश्री देशपांडे गानू
“जीवन चलने का नाम..
चलते रहो सुबह शाम”
सध्या आपण सगळे म्हणजे संपूर्ण मानव जात एका भयंकर संकटातून जात आहोत. जवळजवळ आता दोन वर्ष होत आली. अजून किती काळ हे संकट रेंगाळणार आहे माहित नाही. ताण-तणाव, चिंता , आपल्या माणसाचं जाणं हे सगळे पूर्वी होतंच. पण आता सारखी अगदी कधीही, कोणालाही जाणवेल अशी मृत्यूची भीती नव्हती.
आपण सगळ्यांनीच या कठीण काळात आपले आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणी, सहकारी गमावले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूचे तांडव प्रथमच अनुभवत आहोत. प्रत्येकाच्या मनात संशय , भीती आहेच. कोणी यातून सुखरूप बाहेर पडले पण इतर आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडले आहेत.
आयुष्य जगण्याची सामान्य जडणघडणच विस्कटून गेली आहे. आज अनेक स्त्रिया-पुरुष त्यांच्या जोडीदाराच्या अकाली जाण्याने हताश, निराश झाले आहेत. कित्येक मुले पोरकी झाली आहेत. एकाच घरातील अनेक जण या करोनाच्या लाटेत नाहीसे झाले आहेत. जे आहेत त्यांना प्रचंड भीतीने ग्रासले आहे.
मानवाला अगदी सुरुवातीपासूनच अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. जरी मानव सर्वशक्तिमान, प्रचंड बुद्धीमत्ता, वाणी यांनी समृद्ध असला तरीही. निसर्गापुढे, पंचमहाभूतांपुढे आणि परमेश्वरी किंवा एका अदृश्य शक्तीपुढे तो अगदीच नगण्य आहे. कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित आपत्तींना मानवाला तोंड द्यावे लागले आहे.
कधी वैयक्तिक आयुष्यात दुःखद घटनांना सामोरे जावे लागते. माणसाला कायमच माणसाची सोबत हवी असते. गरज असते त्याच्या भावना व्यक्त करायला, भावनांचा निचरा होण्यासाठी. आपले कुटुंब, समाज हे माणसासाठी महत्त्वाचे घटक आहेत. कोणत्याही अगदी कोणत्याही वैयक्तिक किंवा सामूहिक आपत्तीला केव्हाही तोंड द्यावे लागले, सामोरे जावे लागले तर अतोनात दुःख होते.
मन दुःखाच्या वेदनेत बुडून जाते. असे का घडले? हा विचार मन पोखरू लागतो. कोणताही सारासार विचार करायची ताकद, ऊर्जा उरत नाही. अकस्मात कोसळणार्या दुःखाच्या डोंगराने भले भले ही कोसळतात. आता पुढे काय? हे प्रश्नचिन्ह सतावत असते.
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिचा प्रत्येक घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याचे चांगले-वाईट होणारे परिणाम प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने स्वीकारते किंवा नाकारते. दुःखाला सामोरे जाण्याची प्रत्येकाची कुवत वेगळी असते. काहीजण अगदी दुःखद प्रसंगातूनही काहीतरी सकारात्मक विचार करतात आणि हळूहळू यातून बाहेर पडून पुन्हा नव्याने जीवनाला सामोरे जातात. काहींना हा धक्का सहन होत नाही. ते पूर्णपणे कोलमडतात. त्यांना मार्ग दिसत नाही. सारासार विचार करण्याची क्षमता ते हरवून बसतात. आणि नैराश्याच्या गर्तेत सापडतात. क्षणिक दुःखाच्या, रागाच्या आवेगात आत्महत्येसारखा अगदी चुकीचा मार्ग अवलंबतात.
काहीजण अगदी डोंगराएवढे दुःख ही सहज पचवतात आणि जीवनात आनंद शोधतात. सकारात्मकतेने, प्रयत्नपूर्वक स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करतात. पण काही अगदी छोट्याशा दुःखद घटनेने ही पूर्णपणे मोडून जातात. आणि अविचार करतात. रोज आपण बातम्या बघतो. टोमॅटोला भाव कमी मिळाला म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आई वडील ओरडले, हवी ती वस्तू मिळाली नाही, प्रेमात अपयश, फसवणूक, कोणीतरी केलेला क्षुल्लक अपमान की लगेच मौल्यवान जीवन आत्महत्या करून आज अनेक जण संपवत आहेत. संयम, शांतपणे घडलेल्या घटनेचा विचार हे करता येत नाही. जीवन इतकं क्षुल्लक आहे का??
मान्य आहे की तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. तुम्हांला तुमच्या मनाविरुद्ध एखाद्या अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागले, तरीही “हे जीवन खुप सुंदर आहे.” मनुष्य जन्म एकदाच मिळतो. कोणाच्या तरी चुकीची, कोणत्यातरी घटनेची, तुमचं प्रिय माणूस कायमचं सोडून गेल्याची किंवा स्वतःच्याही चुकीची इतकी मोठी शिक्षा स्वतःला देऊ नका. गच्च अंधारानंतरही पहाटेची सोनेरी किरणे उगवतातच. त्याच प्रमाणे कोणतेही दिवस सारखे नसतात. परिस्थिती एकसारखी कधीच नसते. ती बदलतेच. जीवन प्रवाही आहे. काळ सगळ्या दुःखांवर, वेदनांवर औषध आहे. अशावेळी गरज आहे ती तुम्ही शांत, संयमी राहण्याची.
दुःख, वेदना, पश्चाताप, फसवणूक, अपयश, अपमान अशा कोणत्याही नकारात्मक भावनांना तुम्हाला सामोरं जावं लागलं तरीही स्वतःमधला आशावाद कधीही संपू देऊ नका. वास्तवाचा स्वीकार करा. “जे घडायचं ते घडून गेलं, आता फक्त चांगलंच घडणार.” हा विश्वास स्वतःला द्या. आणि न डगमगता हळूहळू का होईना पण नवीन जीवनाची सुरुवात करा.
तुमच्यातील जीजिविषु वृत्ती अबाधित ठेवा. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रसंगावर यशस्वी मात करू शकता. आज सगळीकडेच वाईट परिस्थिती आहे. आपण माणसं गमावली आहेत. नोकरी, व्यवसायावर परिणाम झाले आहेत. रोजचं जगणं खूप कठीण झालं आहे. यातून कसं बाहेर पडायचं? हा प्रश्न आहे. जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, कुटुंबाची ओढाताण सगळेच अंगावर येणारं आहे.
तरीही “आज मला बाकी काही जमले नाही तरी चालेल पण फक्त जगायचं आहे, या काळाचा कसंही करून सामना करायचा आहे. चांगले दिवस येणारच” हा विश्वास स्वतःला द्यायचा आहे. फक्त प्रचंड सकारात्मक वृत्ती, सारासार विचार, वर्तन, कृती, ध्यानधारणा या अशा कठीण काळात मन शांत ठेवण्याचे उत्तम मार्ग आहेत. आज कठीण काळातही माझ्याकडे काही तरी चांगलं आहेच. मी ते शोधीन आणि ते बरोबर घेऊन पुढे जाईन. तुमचे अनेक छंद, आवडी असतील ज्या तुम्हांला या काळात जोपासता येतील.
स्वतःला सतत आवडीच्या कामात गर्क ठेवा. म्हणजे नकारात्मक विचार येणार नाहीत. दुःखाची बोचणी कमी होईल. तुमची सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर गरजवंतांना मदत करा. बघा तुम्हाला मानसिक शांती मिळते की नाही. असं काही करा की तुम्हांला जीवनाचे ध्येय सतत समोर दिसले पाहिजे. आणि या निर्दय काळातही तुमची ऊर्जा प्रखर तेजाने “बस्स.. जगायचं आहे कारण जीवन सुंदर आहे.” यासाठी काम करत राहील.
सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या प्रेमाच्या माणसांना अंतर देऊ नका, त्यांचे मूल्य जाणा. हीच तुमची कठीण काळातील शक्ती आहे. त्यांना सोबत घेऊन या दिवसांना आत्मविश्वासाने, सकारात्मकतेने सामोरे जा. उज्वल, यशस्वी, आनंदी दिवसांचे , काळाचे स्वागत करण्याकरता……
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


