“फोमो (FOMO) मी सोडून सगळे आनंदी जीवन जगत आहेत, या आजारी मानसिकतेची ओळख आणि उपाय…”
मधुश्री देशपांडे गानू
फोमो (FOMO ) म्हणजे काय? ही संज्ञा या आधुनिक जगातच अस्तित्वात आली आहे. आणि आता याचेच अति विकसित आणि अत्यंत गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. अनेक समुपदेशक, मानसोपचार तज्ञ यावर उपचार करीत आहेत. अनेक थेरपीद्वारे यावर चांगले उपचार होऊ शकतात..
आता (FOMO) म्हणजे काय? ते प्रथम पाहू. बहुतेकांना माहीत असेलही. ही इंग्रजी संज्ञा आहे. FOMO– Fear Of Missing Out. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला सतत असं वाटणं की त्याच्यापेक्षा इतर सर्व जीवनाचा जास्त आनंद घेत आहेत. ही अशी नकारात्मक भावना आहे ज्यामुळे त्या व्यक्तीला आपण मागे पडतोय, इतरांसारखे आनंदी नाही अशी भावना वाढीस लागते. उदाहरणार्थ माझ्याकडे मोठा फ्लॅट नाही, अमक्याकडे आहे. मी सारखं सहलीला जात नाही, अमका जातो. इथपासून उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे?? इथपर्यंत सगळ्या भावना. आता मत्सर, हेवा कधीतरी वाटणं ही नैसर्गिक भावना आहे.
पण याचा अतिरेक झाला तर मात्र ती व्यक्ती फोमोला बळी पडते. वरवर ही भावना तुलनात्मक वाटत असली तरीही त्यामागे खोल दडलेल्या प्रखर नकारात्मक भावना असतात. सगळ्यात महत्त्वाची भावना म्हणजे प्रचंड मत्सर, हेवा. अशा अति मत्सरी व्यक्तीचा स्वाभिमान खालावलेला असू शकतो. सातत्याने आपण इतरांपेक्षा जीवनात कमी आहोत, आपल्यात न्यून आहे ही भावना त्या व्यक्तीमध्ये वाढीस लागते. आणि त्याला हताश, अगतिक वाटू लागतं. हेच वाटणं गंभीर मानसिक आजार ठरू शकतं. या फोमो चा अगदी प्राचीन काळातही उल्लेख आढळतो..
डॉक्टर डॅन हरमन (Dan Herman) या marketing strategist नी FOMO ही संज्ञा सर्वप्रथम १९९६ मध्ये प्रत्यक्षात आणली. खरंतर फोमो ही संज्ञा किंवा हा आजार सोशल मीडियामुळे वाढीस लागला. सोशल मीडिया हे या फोमोचं आज सर्वात मोठे व्यासपीठ आहे.
आज आपण सर्रास पाहतो आहोत रोज स्वतःचा फोटो बदलणारे, सतत लाईक आणि कमेंट चा अखंड विचार करणारे, त्याला अति महत्त्व देऊन निराश, दुःखी होणारे आभासी जगातील लोक हे फोमो चाच प्रकार आहेत. अमकीच्या फोटोला जास्त लाईक आणि कमेंट, माझ्या का नाही?? ही फोमो ची सुरुवात आहे. आज सोशल मिडीया अतिवापरामुळे ग्रस्त होऊन मानसोपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
पण प्रत्यक्ष आयुष्यातही असे फोमो ग्रस्त आपल्याला दिसतात. ते सतत स्वतःची कोणाशी तरी तुलना करतात. त्यांच्यासारखंच जगू पाहतात. स्वतःच्या आयुष्याला त्या व्यक्तीची फुटपट्टी लावू पाहतात. स्वतःची प्राधान्यता, वास्तववादी विचार व कृती यामध्ये गडबड व्हायला सुरुवात होते. केवळ दुसर्याची कॉपी करायची म्हणून आयुष्यावर गंभीर परिणाम करणारे चुकीचे निर्णय घेतले जातात.
एक वास्तवातील सत्य उदाहरण घेऊ. सुशिक्षित, सुसंस्कारित मध्यमवयीन उच्चपदस्थ स्त्री शकुंतला. आणि तिच्या अगदी जवळचं नातं सांगणारी दुसरी तरुण स्त्री स्वाती. शकुंतला ला सुरुवातीपासूनच अकारण स्वातीचा मत्सर, हेवा वाटत असतो. स्त्रीसुलभ भावना म्हणून सोडून द्यावं तर तसं नव्हतं.
शकुंतला ला प्रत्येक गोष्ट स्वाती सारखीच करायची होती. दोघींच्या वयात जवळजवळ तीस वर्षांचं अंतर असूनही. स्वतःचे वेगळे अस्तित्व, वेगळे व्यक्तिमत्व, वय, स्वभाव, शारीरिक-मानसिक ठेवण कशाचाही विचार न करता शकुंतला मत्सराने इतकी ग्रासली होती. याचा अतिरेक झाल्याने तिच्यातील सद्सद्विवेकबुद्धी ही संपली होती. इतक्या पातळ्यांवर ती स्वतःची तुलना स्वातीशी करू लागली. स्वातीने जी भाजी केली असेल किंवा बाजारातून आणली असेल तीच भाजी शकुंतला त्याच वेळी हवी असायची. तिने ज्या रंगाचे पेहराव केले असतील त्याच रंगाचे पेहराव शकुंतलाला हवे असायचे.
आणि हे असं अखंड वर्षानुवर्षे चाललं. याचा अर्थातच स्वाती लाही मानसिक त्रास झालाच. ही मानसिक अवस्था किंवा आजार इतका वाढला की आता शकुंतला स्वतःच्या सुनेची तुलना सतत स्वाती शी करू लागली. स्वातीचं राहणीमान, तिचं दिसणं, तिचा रंग, तिचे छंद, तिचा व्यवसाय हे सगळं आपल्या सुनेनेही करावं अशी अवास्तव मागणी ती करू लागली. अगदी स्वाती ची टिकली, स्वाती ची लिपस्टिक याचीही तुलना होऊ लागली. यासाठी सूनेला दूषणं देऊ लागली. याचा तिच्या सुनेला प्रचंड त्रास होऊ लागला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की सुनेबरोबर तिचं नातं तर बिघडलंच, पण ती स्वतः अनेक शारीरिक आजारांची शिकार झाली. नैराश्यग्रस्त झाली. रात्रीची झोप नाहीशी झाली. आपण फोमो या आजाराने ग्रस्त आहोत हे आजही तिच्या लक्षात येत नाही. कोणी लक्षात आणून दिले तर तिला ते मान्य होत नाही.
या फोमोमुळे अनियंत्रित वर्तन, एकटेपणा, असुरक्षितता, न्यूनगंड, ताण, चिंता, सामाजिक वर्तुळात वावरायची भीती, नैराश्य, प्रचंड नकारात्मकता आणि प्रचंड असमाधानी वृत्ती बळावत जाते.
सातत्याने दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे?? हेच आपल्या आयुष्याचे ध्येय होऊन जातं. वरवर साधा वाटणारा आणि कोणाच्याही लक्षातही न येणारा हा आजार त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांनाही प्रचंड मानसिक त्रासदायक असतो.
यावर आपण मात करू शकतो. फक्त आपली इच्छाशक्ती आणि कृती करण्याची इच्छा प्रबळ हवी.
१) सर्वप्रथम आपल्याच आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आमूलाग्र बदलायला हवा. यासाठी समुपदेशकांची जरूर मदत घ्यावी.
२) जे तुमच्याकडे आहे तुमच्या वस्तू, तुमची प्रेमाची माणसं यांच्यावरच लक्ष केंद्रित करा.
३) जे आज तुमच्याकडे नाही त्याचा विचार करून दुःखी होऊ नका.
४) जाणीवपूर्वक सकारात्मक, वास्तव वादी व्यक्तींच्या सानिध्यात रहा.
५) स्वतःची कोणाशीही तुलना करणं थांबवा.
६) ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी जास्त करा. अगदी समाजसेवाही.
७) स्वतःचे बरेवाईट विचार लिहून काढा. रोजनिशी लिहा.
८) वास्तव, खरी आणि योग्य नाती निभावण्याचा प्रयत्न करा.
९) जे तुमच्याजवळ आहे त्याबाबत नेहमी कृतज्ञता बाळगा.
१०) आयुष्य सुंदर आहे. स्वतःचे आणि मिळालेल्या आयुष्याचे भरभरून कौतुक करा.
या आणि अशा अनेक सोप्या उपायांनी आणि योग्य समुपदेशनाने तुम्ही फोमो मुक्त होऊ शकता. खरंच जीवन खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक व्यक्ती ही विशेष आणि महत्त्वाची आहे. कोणाशी तरी अवास्तव, अकारण तुलना करून त्यात वाहवत जाऊन आपलं आयुष्य बरबाद करू नका. फक्त स्वतःच्या गुण दोषांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःवर काम करा. स्वतःची प्रगती होईल यासाठी प्रयत्नशील राहा. सोशल मीडियाच्या आभासी जगात फार रमू नका. तुमची प्रेमाची माणसं जपा. आणि निरामय सुंदर आयुष्य आनंदाने सुखाने बहरण्यासाठी प्रयत्नशील राहा…. माझ्या शुभेच्छा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
