Skip to content

“फार इमोशनल असताना एखाद्याकडे आपल्या पर्सनल गोष्टी का शेअर करायच्या नसतात??”

“फार इमोशनल असताना एखाद्याकडे आपल्या पर्सनल गोष्टी का शेअर करायच्या नसतात??”


मधुश्री देशपांडे गानू


माणूस समुह प्रिय प्राणी आहे. त्याला सतत आपल्या आजूबाजूला कोणी तरी लागतं. मनातलं सांगायला, भावना वाटून घ्यायला, भीती कमी करण्यासाठी, सुरक्षित वाटण्यासाठी, एकटेपणा जाणवू नये यासाठी, अगदी रागावण्यासाठी कोणीतरी विश्वासाचं, हक्काचं सतत बरोबर हवं असतं. आणि सहज नैसर्गिक आहे हे.

जन्मापासून मिळालेले नातेसंबंध, स्वतः निर्माण केलेली मैत्रीचे बंध अशी थोडकी पण त्याची स्वतःची अशी माणसं असतात. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी आपल्यासोबत ही आपली माणसं असतातच. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने काही औपचारिक ओळखीचे असतात. समाजात वावरताना आपले शेजारी, अगदी रिक्षावाले, भाजीवाले, दुकानदार किती रोजची ओळखीची माणसं असतात. या सगळ्यांबरोबर आपला संवाद त्या त्या ओळखी पुरता असतो.

कालच अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची युट्युब वर मुलाखत पाहिली. ती म्हणाली,” माझे आई-वडील, शाळेतले पहिलीपासून चे काही मोजके मित्र-मैत्रिणी हेच माझे सगळ्यात जवळचे सुहृद आहेत. मी फक्त यांच्या जवळ सगळे शेअर करते.” म्हणजेच अगदी खोल मनातलं आवडलेलं, नावडलेलं, आनंदी, रागाचं, दुःखी, निराश काहीही आपण फक्त अगदी आपल्या विश्वासाच्या, प्रदीर्घ सहवासाने जवळच्या असणाऱ्या व्यक्तीलाच सांगतो. इतर कोणालाही नाही आणि सांगू ही नये.

व्यावसायिक ओळख असेल, मैत्री असेल आणि अगदी नव्याने प्रेमात पडला असाल तरीही तुम्ही किती स्वतःबद्दल सगळं समोरच्याला सांगता?? सुरुवातीला शक्यतो नाहीच. हळूहळू ओळख वाढत जाते. एकमेकांचे ट्युनिंग व्हायला लागतं. एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेऊ लागतो. आणि मग हे नातं प्रदीर्घ काळ आपल्याबरोबर असणार आहे अशी खात्री पटली तरच आपण अगदी मनातल्या गोष्टी शेअर करतो. लगेच आपण आपल्या खाजगी वैयक्तिक गोष्टी कोणाबरोबरही शेअर करत नाही ना! तसं करणे योग्य नाहीच.

रोजच्या आपल्या आयुष्यात आपण अनेक लहान-मोठ्या प्रसंगांना तोंड देत असतो. ते सहज आपण आपल्या सहकाऱ्यांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करतो. कारण भावना व्यक्त करणे ही प्रत्येक माणसाची गरज आहे. बऱ्याचदा आपल्या मूडवर आपलं बोलणं, व्यक्त होणं अवलंबून असतं.

पण कोणत्याही भावनेच्या भरात वहावत जाऊन आपण त्या प्रसंगापुरते व्यक्त न होता जर आपल्या वैयक्तिक गोष्टी सहज समोरच्या व्यक्तीबरोबर शेअर करू करत असू तर मात्र ते नंतर त्रासदायक ठरू शकतं. काहीजण अगदी बोलघेवडे असतात. काही अगदीच अबोल, अंतर्मुख असतात.

काही वेळा हीच अबोल माणसं छोट्याशा भावनिक आघाताने ही सगळे बोलून मोकळे होतात. आपण कितीही भावनाप्रधान झालो तरीही आपण बोलताना काय शेअर करतोय, कोणा बरोबर शेअर करतोय याचं भान प्रत्येकाला असायलाच हवं. प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला आपण पूर्ण जाणत नसतो. काही तुमचे मित्र म्हणवतात पण त्यांचा अंत:स्थ हेतू फार वेगळा असतो.

अनेक स्त्रियांना पुरुष सहकाऱ्यांचा आणि पुरुष मित्रांचा अत्यंत वाईट अनुभव आलेला असतो. प्रचंड असूया, मत्सर, तुमचं चांगलं होऊ नये अशी नकारात्मक ऊर्जा असणारे लोक तुमच्या अवतीभवती असतात. तुमच्या इमोशनल असण्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त असते. आज सोशल मीडियावर सहज कोणत्याही पुरुषाचा आपलं दुःख सांगायला खांदा शोधणाऱ्या स्त्रिया या फसवल्या जाऊ शकतात. स्त्रियांना गाॅसिप करण्याची सवय असते. एका मैत्रिणीबद्दल दुसऱ्या मैत्रिणीला सांगायचं. मग ती मैत्रीण ते जाऊन पहिल्या मैत्रीणीला सांगते. आणि मैत्रीत वितुष्ट येतं.

आज आभासी जगाचा आपल्यावर इतका पगडा आहे आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट पोस्ट केलीच पाहिजे. मग तुम्ही सहलीला गेलात तरी निसर्गसौंदर्याचा आनंद न घेता सतत Live येता. कशासाठी?? घ्या ना मनमुराद आनंद.. अगदी छोट्या छोट्या दोन-तीन वर्षाच्या मुली मॉडेल सारख्या नटवून त्यांचे फोटो पोस्ट केले जातात. याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यांचं बाल्य संपून जातं. सगळ्याचाच अतिरेक झाला आहे.

आई-वडील, नवरा-बायको भाऊ-बहीण ही ठराविक अशी नाती आपल्या आयुष्यात असतात. ज्यांच्यापासून आपण काहीही लपवू नये. पारदर्शकता, विश्वास, प्रेम, कुटूंबाचा एकसंधपणा हाच तर या नात्यांचा पाया आहे. इथे तुम्ही भावनिक मोकळेपणाने व्यक्त झालात तर बाहेर कुठेही वैयक्तिक गोष्टी शेअर करायची तुम्हांला गरजच पडणार नाही.

प्रियकर-प्रेयसी असू दे, नवरा-बायको असू दे, तुमचं जोडीदाराशी असलेलं नातं, संबंध हे कधीही कोणाबरोबरही शेअर करायचे नसतात. तुमची सांपत्तिक स्थिती, आर्थिक स्थैर्य याबद्दलही कधीच कोणाकडे वाच्यता करू नका. कितीही जवळची व्यक्ती असेल तरी एखाद्या गाफील क्षणी ती कशी वागेल आणि तुम्हांला कधी फसवेल हे सांगता येत नाही. तुम्हीं गोत्यात येण्याची शक्यता त्यामुळे वाढते. काही लोकांना सतत “victim card” खेळायची सवय असते. अशा व्यक्ती नेहमी परक्या माणसांवर पटकन विश्वास ठेवतात. आणि आयुष्याचे नुकसान करून घेतात.

आपले कुटुंबिय, प्रियजन अशी मोजकी प्रेमाची, विश्वासाची माणसं जर तुम्हीं तुमच्या आयुष्यात कमावलीत तर तुमच्या भावनांचा असा बाजार मांडायची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. आपल्या भावनांचं सुनियोजन करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या भावना योग्य वेळी, योग्य व्यक्ती पाशी, योग्य पद्धतीने व्यक्त व्हायला हव्यात. तरच तुम्हांला तुमच्या आयुष्यात योग्य साथ, योग्य मार्ग मिळतो. हो ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!