Skip to content

फर्स्ट क्लास दिसणं, आणि थर्ड क्लास वागणं.. ही सध्याची जीवनशैली!

फर्स्ट क्लास दिसणं, आणि थर्ड क्लास वागणं.. ही सध्याची जीवनशैली!


लालचंद कुंवर

पुणे.


‘ Simple living and High thinking,’ या वाक्याचा सोयीस्कर उलटा अर्थ का घेतला जातोय सध्याच्या युगात ?
का आम्हाला आज गांधीजींच्या तत्वांचा विसर व्हावा ?

जगालाही भुरळ पडावी , अशी आमची पुरातन काळापासून आदर्श भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्ये. त्यांची जोपासना करून , येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अमूल्य वारसेचा ठेवाच आहे .

याच बरोबर आज या सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण काळाची पावलं ओळखुन काळाबरोबर बदललही पाहिजे ,आधुनिक विचासरणीची कास धरलीच पाहिजे , त्याशिवाय तरणोपाय नाही पण त्याला नैतिकतेची जोड असावी. सदसदविवेकबुध्दीला स्मरून विवेकशील सदवर्तनाची कास असावी .

पण आज आधुनिक विचारसरणीचा बुरखा पांघरून, सद्यस्थितीत शिक्षित तर होत अहोत पण सुशिक्षित , सुसंस्कारित सुजाण नागरिक म्हणून , आमचं चारित्रसंपन अस्तित्व सद्या का निर्माण होत नाहीत ?

नेमक कुठं पणी मुरतंय ?

शिक्षणाच्या डिग्ऱ्या या फक्त आपल्या नावापुढे पाटीवर लिहण्यासाठी एवढ्या पुरत्याच मर्यादित असाव्यात कि काय ?
आज मुठभर चारित्र्यसंपन्न असतीलही आणि ते नक्कीच वंदनीय आहेत ,पण ढीगभर चारीत्रहीन आज समाजात साळसूदपनाचा आव आणून धुडघुस घालत आहेत , त्यांच काय ?

Character is lost , Everything is lost , हे या आधुनिक युगात कधी कळणार आम्हाला ? का फर्स्ट क्लास दिसणं अणि थर्ड क्लास वागणं , हि सध्याची जीवनशैली बनू पाहतेय की काय ? अशा अनेक प्रश्नांची वादळ आज घोंघावत आहेत.

अस म्हणतात की, आज पैशाने सर्व काही विकत घेता येतं . पण ‘चारित्र आणि शिल ‘ विकत घेता येईल अशी आज सध्यातरी कोणतीही करन्सी जगाच्या पाठीवर अस्तित्वात नाही. म्हणून फर्स्ट क्लास दिसण्याबरोबर फर्स्ट क्लास वागणं सुद्धा रक्तात भिनवाव लागेल, अणि हाच वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा असेल.

‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ‘

या अभंगातून संत चोखामेळा हे लोकांच्या डोळ्यात झणझणीत वास्तवतेच अंजन घालताहेत. वरवरच्या दिसण्याला आणि भपकेबाजपणाच्या भुलभुल्लैयाला भुलू नका बाबांनो ! कारण नुसतं शेंदूर फासून तोंड रंगवून कोणाला देवत्व प्राप्त होत नाही , त्यासाठी संस्काररूपी टाकीचे घाव अंगी सोसावेच लागतात. संतांनी उगीचच नही सांगून ठेवलंय, ‘ जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण.’

पण आज Modern civilization च्या नावाखाली समाजात एक सगळीकडे चमकोगिरीचा धुडघुस सुरु झाला आहे आणि त्यातूनच एक नितीमुल्यहिन भंपक पिढी उदयास येत आहे की काय ? अशी भेसूर अणि भयाण वास्तव सर्वत्र सद्यस्थितीत दिसत आहे.

असण्यापेक्षा दिसण्यालाच डोक्यावर घेतल जात आहे. छान कपडे , चेहऱ्याची रंगरंगोटी आणि बोलघेवडेपणा यालाच जन्माच सार्थक मानून , मानवी मूल्य पायदळी तुडवणारी अशी संस्कारहिन वागणारी जमात खरं तर मेंढरच , आज भारतीय संस्कृतीच्या गळ्याला लागलेला फास तर नाहीत ना ?

येवू घातलेल सध्याच थर्ड क्लास वागणं ही जीवनशैली आदर्श भारतीय समाजव्यवस्थेला वाळवी प्रमाणे आतून पोखरत तर नाही ना ?
वागणं आणि बोलणं हे जर एकमेकांशी सुसंगत असेल तरच दिसणं सुंदर भासेल, नहीतर ‘ बडा घर पोकळ वसा , अशी गत सर्वत्र दिसेल.

अर्थातच Dutiful असाल तरच Beautiful दिसाल नाहीतर नुसतं हे विचारहीन बेगडी सौंदर्य कधीही उघड पडू शकतं.

कारण सुटाबुटातलं फर्स्ट क्लास दिसणं हे जर गोरगरिबांना छळणार असेल, भ्रष्ट असेल अणि कोणाचा तरी असह्यातेचा फायदा घेणारं असेल आणि हेच थर्ड क्लास वागणं जर शिष्टाचार होऊ पाहत असेल , आणि हिच सद्याची जीवनशैली असेल तर येणारा काळ, आम्हाला कधीच माफ करणार नाही.

खरं तर , आम्ही आज जगाला संस्काररुपी नौकानयनाचे धडे देत आहोत आणि आमचीच नौका आज पाण्यात बुडत असेल तर , या सारखी सद्यस्थितीतली शोकांतिका कुठली असेल बरं !

समाप्त



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “फर्स्ट क्लास दिसणं, आणि थर्ड क्लास वागणं.. ही सध्याची जीवनशैली!”

  1. Prof.Sanjay Chavhan

    सध्याच्या स्थितीचा वास्तविक आॅडिट…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!