प्रेम मिळालं नाही, म्हणून अत्यंत टोकाकडे जाणाऱ्या तरुण-तरुणी आणि मानसशास्त्र!!
प्रा. गीत किरण वाळवेकर
(मानसशास्त्र या विषयाच्या निवृत प्राध्यापिका)
अगर तू मेरी न होती तो…..
ते दोघेही बालमित्र. एकमेकाशी गप्पा गोष्टी चालायच्या,ती त्याला लाईक करायची, तोही तिचे आपल्यावर किती प्रेम आहे याची कायम स्वप्न रंगवत असायचा. मित्रांच्या ग्रूपमध्ये ही दोघांबद्दल चर्चा .आणि अचानक अस झाल की ती त्याच्याकडे बघेना झाली तिने त्याला नकार दिला.
त्याचा मानभंग झाला. मित्रांत आता किती चेष्टा होणार… आपल्याला अस का फसवाव तिने? असे वाटून तो सूडाने प्रेरित झाला .तिच आणखी काही लफडं आहे का, या मागावर तो सतत राहू लागला नि त्याने एक दिवस भर रस्त्यात तिला गाठले, चाकूने सपासप वार करून तिला संपवले व स्वतःही ट्रकच्या समोर जावून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेवढ्यात मित्रांनी त्याला बाजूला ओढले.
ही सत्यकथा आहे प्राची या मुलीची. योगेशने आपल्या प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरले आहे कळल्यावर, आता तुझ्या लग्नानंतर पुन्हा आपल्याला भेटता येणार नाही, शेवटच एकदाच भेटू म्हणून तिला बोलावून घेतलं.ती आल्यावर तिच्या डोक्यात राँडने वार केले, जवळच्या शेतात मृतदेह टाकून त्याने पळ काढला. रिंकू पाटीलपासून ते आजपर्यंत अशा कित्येक घटना आपण ऐकत आहोत.
प्रेमात असफलता आली की मानसिकता उध्वस्त होऊन कोणत्याही थराला जायचं. यात केवळ मुलेच हिंसक होतात असे नाही तर काही वेळा मुलीही वेगवेगळ्या मार्गाने त्रास देत राहतात. अकरावीत शिकणाऱ्या नीताला काँलेजमधला तो देखणा अनिकेत पहाताच तिला वाटले की अगदी जनमजनमका प्यार हो गया है। त्याच्या त्या डौलदार मोटारसायकल वरून येताना तो आणखीनच रुबाबदार दिसे.जवळून गेला की त्याच्या सेंटच्या फवाऱ्याचा सुगंधात ती धुंद होऊन स्वतःला हरवून बसे.
ती अक्षरशः बेभान झाली. तो जिथे जाई त्याच्या मागे जाई. तो सांस्कृतिक मंडळाचा सेक्रेटरी म्हटल्यावर तीही त्या मंडळाची सभासद झाली, त्याच लक्ष खेचून घेण्यासाठी नाना क्लुप्त्या करू लागली. दोघांच्यात संवाद सुरु झाले. तो आपल्यावर कसा मरतोय हे साऱ्यांना सांगू लागली. पुढ ती एक क्षणही त्याला सोडेना .. त्याच्या मनात मूळातच फारस काही नव्हते. तो तिला टाळू लागला, दूर राहू लागला. पण ती त्याचा पिच्छा सोडेना.
तू दूर गेलास तर मी आत्महत्या करीन म्हणून धमक्या देऊ लागली दुपारी तो जिथे कामाला जायचा त्याठिकाणी जाऊन ती सतत त्याने आपली फसवणूक केली वगैरे जोर जोरात सगळ्यांना सांगून सतत तमाशा करू लागली. अखेर त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.
एका पुजाऱ्याने सांगितलेला हा एक किस्सा ,एक तरूणी रोज भल्या पहाटे देवळात यायची, प्रदक्षिणा घालत घालत काही तरी पुटपुटत असायची नीट ऐकल्यावर ऐकू यायच ‘त्या मेल्या दिलप्याच वाटोळ होऊ देत.. त्याची नोकरी जाऊ देत…. त्याची बायको मरू देत…’ तिचा प्रेमभंग झाल्यावरचे तिचे हे वर्तन. पुढे तिला मनोरूग्णालयात अँडमीट कराव लागले.
आपल्याला पाहिजे ते आपण त्वरित मिळवू शकतो, हा तरूणांचा सैराट विचार. ती समोर दिसली… छाती धडधडली..बघून हसली.. की जमल ते प्रेमच.. मग आय लव्ह यू चे मेसेज… फटाफट ह्रदयाची इमोजी..मग एकत्र कोणत्याही अवस्थेतले फोटो काढायचे.काही वेळा ही मुलगी दुसऱ्याशी बोलतेय हे दिसले की आपल्या लाईनवर दुसरा मरतोय म्हणून लगेच मारामाऱ्या सुरु करायच्या.
अखेर या सगळ्याचा उबग येऊन तिने नकार दिला तर ‘अगर तू मेरी न होती तो तू किसी की भी नही हो सकती .’ असे फिल्मी डाँयलाग मारत भर रस्त्यात तिची हत्या करायची.
मानसशास्त्रज्ञांच्या मते हे प्रेम नसून एक हाव आहे. एखादी गोष्ट मिळत नाही म्हटल्यावर काहीही करून ती मिळालीच पाहिजे या साठी वाट्टेल ते करायचे, मिळाली तरी केंद्रस्थानी फक्त आपण व आपणच पाहिजे हा विचार .अशा या हावऱ्या प्रेमाचा उबग येऊन जोडीदार टिकत नाही कारण त्यात मैत्रीचा अभाव व कमालीच्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा व बंधने.. मग कोणताच आनंद टिकत नाही.
टिव्ही, चित्रपट इत्यादी माध्यमातून प्रेमाचा बाजार, अपुरे लैंगिक शिक्षण या सारख्या कारणातूनही मुलेमुली या थराला जाऊ शकतात. पालकांनी वेळीच मुलांना सुरक्षितता देऊन आश्वस्त करावे, शाळा-काँलेजात हेल्पलाईन सुरु कराव्यात, लैंगिक शिक्षण दिले जावे प्रसंगी समुपदेशकाची मदत सुध्दा उपयुक्त ठरते व मुख्य म्हणजे मुलामुलींनीही स्वतःच स्वतःला मदत करून खंबीर व्हावे.भावनांवर नियंत्रण ठेवून परिस्थिती शांतपणे स्वीकारली पाहिजे.
गुमराह चित्रपटातील नायक त्याच्या प्रेयसीच्या घरी जातो तेव्हा ती आता दुसऱ्याची झाली आहे हे जाणल्यावर त्या परिस्थितीचा स्वीकार करतो व म्हणतो ‘ठिक आहे आपण पुन्हा अनोळखी व्यक्तींसारखै वागू,एखाद्या नात्याचे ओझे होत असेल तर ते संपवणेच श्रेयस्कर. जी कहाणी पुढे नेऊ शकत नाही त्या वाटेला एका सुंदर वळणावर सोडून दूर जाऊ….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

