प्रेमात ठेवलेल्या अपेक्षा नेहमी त्रासच का देतात ??
सौ. शमिका विवेक पाटील
प्रश्न लव मॅरेज किंवा अरेंज मॅरेजचा नाहीय, प्रश्न आहे अपेक्षांचा…
मधुरा आणि राहुल ह्यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली, तरीहि दोघांमध्ये मतभेद हे सुरुच. तू माझ्या अपेक्षा पुर्ण करत नाही म्हणून दोघेही एकमेकांवर आरोप करणारं आणि बनी बनायी बात बिघडून टाकणारं. घरातले दोघांची समजूत काढून थकले, बरं इतकी भांडणं असूनसुद्धा कधी नव्हे ते प्रेम जागृत झाले असणारं आणि छोटंसं फुलं जन्माला आलं असणारं. चला तर बघुयात नक्की कुठल्या अपेक्षा आहेत ज्या दोघांनाही पूर्ण करायला जमत नाही.
रविवार सुट्टीचा वार असल्याने सगळेच उशीराने उठायचे. मात्र मधुराला माहेरी रविवारी सुध्दा लवकर उठायची सवय असल्याने तिला उगीच अंथरुणात लोळत पडून रहायला आवडत नसे, ती आपली ठरल्या वेळेत उठून स्वतःच आवरून पेपर वाचत खिडकीत बसायची.
पण तिच्या लवकर उठण्याचा राहुलला त्रास व्हायचा कारण ती उठून लाईट लावणार, भांड्यांचा आवाज, दरवाजा सतरावेळा उघड बंद करणारं, खिडकीत बसून पेपर वाचणारं म्हणजे सूर्याची किरणं घरात येणारं आणि साहेबांची झोप मोड होणारं. ह्यावरुन त्यांच्यात वाद, एक दिवस पण तू लेट उठू शकत नाहीस, एवढी कसली घाई असते उठून उगीच आवरा आवर करायची, मी सांगतो तशी कधीच वागत नाहीस, आदल्या रात्री समजावून सुध्दा तू अशी वागतेस, नेहमी अपेक्षा भंग…
ऐक ना राहुल, अगदी लडिवाळ शब्दात मधुरा जेव्हा त्याला हाक मारते तेव्हा क्षणभर त्याचा स्वतःवर विश्वास बसेनासा होतो. माझ्या ऑफिस मधली प्रिया तिच्या नवऱ्यासोबत डिनरला गेलेली काल, सांगत होती खुप छान टेस्ट होती तिथल्या पदार्थांची. तिला तरी किती लांब आहे ते हॉटेल पण आपल्या घरापासून अगदी काही अंतरावर नवीन बनलं आहे. तुझी इच्छा असेल तर आज जाऊयात का दोघेजण. राहुल लगेच आवाज देऊन घरच्यांना तयार करतो, चला आज सगळे डिनरला जाऊ.
जवळच एक नवीन हॉटेल उघडलं आहे. खरं म्हणजे मधुराला एकांत हवा असतो, थोडं मोकळेपणाने बोलता येईल, जुन्या आठवणीत रमून जाऊ म्हणून तिला फक्त राहुलला घेऊन जायचं असतं. पण परिवार प्रेमी राहुलला ही गोष्ट कळत नाही, तोंड वाकडं करून मधुरा तयारी करायला घेते,
आता काय झालं ? राहुलने रागात विचारल्यावर… काही नाही, तुला ना माझं मन कधी वाचताच येणारं नाही… मला काय हवंय ? काय नको ? हे कधी समजणारं ? प्रत्येक वेळी माझा अपेक्षा भंग…
दोन्ही प्रसंग अगदी साधेच, प्रत्येकाच्या घरात डोकावणारे. अपेक्षा किती साध्या आहेत तरीही संवादच रूपांतर वादात होत जातं आणि नात्यातला आपलेपणा दूर होतो. तसही अपेक्षा ह्या आपल्या माणसांकडूनच करतो मग समोरच्याला समजूनही आपल्यालाच घ्यावं लागणारं ना ? सगळे सांगतात अपेक्षांचं ओझं कमी केलं की संसार सुरळीत होतो मग अपेक्षा तरी कोणाकडून करणारं ? समोरची व्यक्ती हक्काची आहे म्हणून तर अपेक्षा आहेत. नवऱ्याने बायकोकडे काही अपेक्षा केल्या काय आणि बायकोने नवऱ्याकडून काही अपेक्षा केल्या काय, दोन्ही सारखेच.
Opposites Attract हा Law म्हणजे सुखी संसाराचे उदाहरण आहे. का म्हणून एकमेकांच्या आवडी निवडी एकमेकांवर लादायच्या ? तरीही आपल्या पार्टनरने आपल्याला महत्त्व देणे खरंच गरजेचे आहे. अन्यथा ते नाते उगीच जबरदस्ती केल्यासारखे खेचून ताणून निभवल्यासारखे होईल, त्यापेक्षा थोडा समजूतदारपणा दाखवला तर किती तरी संसार मोडकळीस येणार नाहीत.
आपला जोडीदार म्हणजे आपला आरसा असतो. तुम्ही त्याच्यात स्वतःच प्रतिबिंब बघू शकता, आपल्या अपेक्षांचं ओझं बनवुन त्याचे हाल करू नका. एकमेकांना समजून घ्या. अपेक्षा ठेवा पण त्याचा अतिरेक नको, तरच संसार सुखी होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


