परिभाषा प्रेमाची……..
सौ. सुधा पाटील I समुपदेशक
(खटाव, पलूस, सांगली)
प्रेम!एक जादूमय अनुभूती!जीवनाच्या प्रवासातील हवाहवासा सोबती!प्रचंड प्रेरणा स्त्रोत असणारी एक लोभस भावना! पण खूपदा प्रियकर आणि प्रेयसी यांच्याच प्रेमाच्या चर्चा सर्वत्र होतात.किंबहुना जगात जणू प्रेमाची महती सांगणारं तेच एकमेव नातं आहे असाच बऱ्याच जणांचा समज असतो.कारण ऐन तारुण्यात प्रेमात पडणारी मुलं-मुली प्रेमभंग झाला की, आपलं आयुष्य जणू संपलंच असं समजून चालतात.आपल्या आजुबाजुला आपली काळजी घेणारी इतरही नाती असतात हेच ते समजून घेत नाहीत.मग प्रश्न पडतो की,प्रेम ही भावना आणि प्रियकर प्रेयसी यांचं नेमकं काय कनेक्शन असावं?कारण माणसाला इतर नात्यातील प्रेमापेक्षा याच नात्यातील प्रेम खूप महत्त्वाचं वाटतं.तरुण पिढीला तर हेच नातं म्हणजे जीवन वाटतं.
मला एका मुलानं त्याची समस्या सांगितली…. एका नात्यातील मुलीवर त्याच प्रेम होतं.ते दोघेही नात्यातीलंच असल्यामुळे एकत्र वाढले.मनमोकळेपणाने त्यांच्यात गप्पा असायच्या.घरचे दोघांचं लग्न करायचं असंही म्हणायचे.याचंही तिच्यावर लहानपणापासून प्रेम होतं.पण ती मुलगी कॉलेजला जाऊ लागली.तिच्या वागण्यात बदल झाला.तिचा बाहेरचा मित्र मैत्रिणींचा संपर्क वाढला.हे त्या मुलाला आवडेना.त्यांने, जेव्हा लग्नाचं वय झालं, तेव्हा तिच्यापुढे आपलं प्रेम व्यक्त केलं.पण तीने ते नाकारलं.मग हा मजनू झाला….
हा प्रसंग हेच सांगतो की, प्रेमात कोणालाही गृहीत धरू नका.प्रेम ही भावना दोन्हीकडून असावी लागते.मुळात तारुण्यात मुलामुलींमध्ये नैसर्गिक आकर्षण असतं.यालाच प्रेम समजून नकली, रंगीत आयुष्यात ही अल्लड मुलं-मुली गुंग होतात.एकमेकांना इंप्रेस करण्यासाठी आपला मूळ स्वभाव लपवून प्रेमाचा मुखवटा परिधान करतात.त्यामुळं काही दिवसातच नावडत्या गोष्टी समोर आल्या की, यांच्यातील प्रेम लगेच कोरडं पडतं आणि खटके उडू लागतात.मग प्रेमभंग!
मग ते मजनू बनून नैराश्यात जाणं..घरच्यांना त्रास देणं असं सारं सुरू होतं.पण या तारुण्यसुलभ आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक अल्लड वयात होऊ नये यासाठी तरुण पिढीला प्रेमाची परिभाषा समजायला हवी.आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजू न शकल्याने सतत प्रेमभंग… पुन्हा प्रेमाचा शोध असं सुरुच राहतं…..कारण आपल्या मनाला नेमकं काय हवं आहे हेच बऱ्याच जणांना लवकर समजतं नाही.
मुळात तुम्ही प्रेमात पडता म्हणजे काय?एखादी व्यक्ती प्रथम दर्शनी आवडली म्हणजे ते प्रेम नसतंच.तसं मग अनेक गुण वेगवेगळ्या माणसांमध्ये असतात.त्या त्या गुणांमुळे ती माणसं आवडतात.पण आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या भावना आहेत.चांगले गुण भावले म्हणजे प्रेम असं नक्कीच नाही.एखादी व्यक्ती तीच्या गुणदोषांसकट हवी असते तेव्हा तिथे प्रेमाची भावना रुजू लागते.प्रेमात पडायला स्वभावाचे काही कंगोरे नक्कीच जुळावे लागतात.
चेहरा पाहून प्रेमात पडणं म्हणजे आकर्षण!आणि स्वभाव पाहून ओढ वाटणं म्हणजे प्रेम! पण तरुण पिढी प्रेमात पडते म्हणजे काय करते? सौंदर्य पाहून एकमेकांच्या मागे लागतात.त्यालाच प्रेम समजतात.नंतर आवडीनिवडी वेगवेगळ्या दिसल्या,स्वभाव वेगवेगळे जाणवू लागले की, मनात नकार घंटा वाजू लागते.पण मग हे प्रेम कसं? प्रेमात माणसाला लवचिक बनता यायला हवं.एकमेकांच्या दुर्गुणांचा स्वीकार करता यायला हवा.
प्रेमात एकमेकांचा आदर,व्यक्तीस्वातंत्र्य या गोष्टी जपाव्या लागतात.तु तुझं आयुष्य मनाप्रमाणे जग.मी माझं आयुष्य मनाप्रमाणे जगतो.पण तरीही आपण एकमेकांत मिसळून जगू.अशी भावना असावी लागते.एकमेकांना जपतं, समजून घेतं ते प्रेम!बाकी सारे मानवी व्यवहार! खरं तर प्रेम ही एक देवाणघेवाण आहे.भावनांची! मनापासून देता आलं तरंच मनापासून घेता येतं.पण एवढ्या खोलवर कोण जातंच नाही.प्रेमाला पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणं समजलं जातं.आणि म्हणूनच खूपदा हा बुडबुडा लगेचच फुटून जातो.
“जिंदगी में प्यार सिर्फ एक बारही होता हैं! असे फिल्मी डायलॉग मारत आमची तरुण पिढी प्रेमभंग झाला की, लगेच मजनू बनून फिरते.ते दु:खं जणू असह्य असं समजून उगाचंच नैराश्यात अडकते.पण मी या तरुण पिढीला एवढंच सांगू इच्छिते की, आपलं आयुष्य भूतकाळात नसतं…ते फक्त वर्तमानात असतं.प्रेमभंगाने झालेलं दु:खं जास्त काळ कवटाळत बसू नये.याचा अर्थ असाच असतो की, दोघांपैकी एकाला ते नातं नको असतो.पण नात्यासाठी दोघांकडून संमती हवी असते तरंच ते फुलतं.मग एकीकडून नकार असणारं नातं हवंच कशाला?
मान्य आहे की,प्रेमभंगाची कारणं अनेक असतात,कधी कधी प्रेम आहे असं म्हणतं दोन जीव मस्त हिंडतात,फिरतात आणि अचानक कोणीतरी एक नातं तोडतो.मग जो मनापासून प्रेम करत असतो त्याला हा धक्का सहन होत नाही.पण आयुष्य तिथेच थांबत नाही.कारण काळ हे सर्वात जालीम औषध आहे.पण उगाचच तेच तेच दु:खं उगाळत बसलात की, कधीच त्यातून बाहेर पडू शकणार नाही.
प्रेम ही एक भावना आहे.माणसाला जगणं शिकवणारी!जीवनाचा आधार बनणारी! त्यामुळे माणूस केव्हाही, कितीही वेळा प्रेमात पडू शकतो.एक प्रेमभंग झाला म्हणजे आयुष्य संपलं असं होतं नाही.गिष्मानंतर पुन्हा वसंत फुलतो अगदी तसंच पुन्हा प्रेमाची भावना तुमच्या आयुष्यात येऊ शकते.म्हणूनच प्रेम म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या.प्रेमात जबरदस्तीने बांधून ठेवणं नसतं.
एकमेकांना एकमेकांत बांधून राहावंसं वाटणं म्हणजे प्रेम! तरुण पिढीला प्रेम आणि आकर्षण यातला फरकच समजत नसल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात.प्रेमात खुनशी वृत्ती नसते हेच या मुलांना समजतं नाही.प्रेम आणि वास्तव आयुष्य यांचा मेळही तितकाच महत्त्वाचा असतो.कारण शाब्दीक प्रेमावर आयुष्य जगता येतं नाही.दैनंदिन गरजा भागविणे, आयुष्याचं उत्तम नियोजन आणि प्रेम भावनांचं व्यवस्थापन हे सारं विचारपूर्वक जमलं की प्रेम आणि आयुष्य यशस्वी होतं.
प्रेम ही आयुष्यात सतत हवी असणारी भावना आहे.प्रेम हा जणू आपल्या मनाचा आहारचं असतो.त्यामुळे आयुष्यात प्रेम नसणारी व्यक्ती ते मिळेपर्यंत ते शोधतंच राहते.अनेकदा असं होतं की, आकर्षणाला प्रेम समजल्यामुळे काही कालावधी नंतर प्रेम संपल्यासारखं वाटतं.किंवा आपल्या मनाला नेमकं काय हवं ते हेच समजत नाही त्यामुळे माणसं भटकत राहतात.
वैचारिक अंतर जास्त असेल तरी देखील माणसं वेगळी होतात.कारण प्रेमात पडताना वरवरचं दिसणं पाहिलं जातं.मूळ स्वभावाचे खरे बारकावे हे सहवासातच लक्षात येतात.त्यामुळे प्रेमात पडतात मूळ स्वभाव लपवू नयेच.जो मूळ स्वभाव स्वीकारून प्रेम करतो तोच ते नातं टिकवू शकतो.कारण खरेपणा हाच प्रेमाचा पाया आहे.म्हणूनच प्रेमवीरांनो….प्रेम समजून घ्या….ती एक जबाबदारी आहे….समजुतदारपणाची कसोटी आहे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

