Skip to content

“प्रामाणिकपणा हा मर्यादित असावा, अमर्याद असल्यास लोक मर्यादा ओलांडतात.”

“प्रामाणिकपणा हा मर्यादित असावा, अमर्याद असल्यास लोक मर्यादा ओलांडतात.”


मधुश्री देशपांडे गान


“प्रामाणिकपणा हे सर्वात चांगले धोरण आहे.” अशा अर्थाची इंग्रजी म्हण आपल्याला माहित आहेच. अगदी लहानपणापासून आपल्याला हेच शिकवले जाते. जे अगदी योग्य आहे. मानवी नातेसंबंध टिकून राहण्यासाठी प्रामाणिक असणं अगदीच महत्त्वाचं आहे. अगदी व्यावहारिक जगातही सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी प्रामाणिकपणा गरजेचा आहे.

तरच छोटे-मोठे व्यवसाय, बलाढ्य संस्था, कंपन्या टिकून राहतात. अगदी एका कुटुंबाचा विचार केला तरीही घरातील सदस्यांमध्ये वागणुकीत प्रामाणिकपणा हवाच, तरच घराचे सौख्य, नाती, शांतता टिकून राहते.

खोटं बोलणारी व्यक्ती, खोटेपणा कोणालाच आवडत नाही. एखाद दोन वेळेला सहनही केला जाईल पण सतत नाही. शक्यतोवर आपण स्वतःला जगासमोर प्रामाणिकपणे जसे आहोत तसे मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच योग्यही आहे. कोणत्याही नात्याचा पायाच प्रामाणिकपणा आणि विश्वास हाच आहे.

पण काही वेळा अति प्रामाणिक राहून चालत नाही. प्रामाणिक जरूर असावं पण प्रसंगानुरुप तारतम्य पाहून वागावं. सध्या सोशल मीडियाचा अतिरेक आपण पाहतो आहोतच. न पाहिलेल्या माणसांशी अगदी प्रामाणिकपणे सहज वैयक्तिक आयुष्य, खाजगीतल्या गोष्टी, पैशाचे व्यवहार हे सगळं शेअर करतो. आणि मग प्रेमात फसवणूक, पैशांची फसवणूक हे अगदी नित्य दिसून येतं. हा प्रामाणिकपणा काय उपयोगाचा??

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक, दोन अत्यंत नकारात्मक, स्वभाव दोष असलेल्या व्यक्ती असतात. नातेवाईक असतील, मित्र मैत्रीण असतील.. अत्यंत आगाऊपणे त्या तुमच्या आयुष्यात डोकावतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नको इतकी ढवळाढवळ करतात. ज्याचा तुम्हांला त्रास होतो. अशावेळी “जाऊ दे” म्हणून दुर्लक्ष न करता स्पष्टपणे आणि योग्य शब्दांत तुम्ही त्या व्यक्तीला समज दिली पाहिजे. आणि त्याची मर्यादा त्याला दाखवून दिली पाहिजे.

तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक असता. काम योग्य पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करण्याची तुमची अत्यंत चांगली सवय असते. पण याच सवयीमुळे लोक सहज तुम्हांला गृहीत धरतात. अगदी घरातली माणसं ही तुमच्यावरच अतिरिक्त कामाचा बोजा टाकतात. घरात, कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ही याचा तुम्हांला त्रास होतो. ही त्रास देणारी माणसे एक तर स्वतः काहीच करत नाहीत किंवा आळशी, विस्कळित असतात.

मग तुमच्या या प्रामाणिकपणाचा हे लोक गैरफायदा घेतात. प्रत्येक गोष्टीत तुम्हांला गृहीत धरतात. गोड बोलून तुमच्या कडून जास्तीची कामे किंवा त्यांच्यावाटची ही कामे करून घेतात. प्रामाणिकपणा बरोबर जर तुम्ही भिडस्त ही असाल तर मग तुमची इच्छा नसतानाही त्यांची कामे करून देता.

काहीवेळा घरात नात्यांचा वरचढपणा किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे ऐकावे लागते अशा वेळी आपला प्रामाणिकपणा आपल्याच अंगाशी येतो. याचा मानसिक , शारीरिक त्रास तुम्हांला होतो. जरी प्रामाणिकपणा हा गुण असला तरी नम्रपणे पण ठामपणे “नाही” म्हणता आले पाहिजे. प्रामाणिकपणाच्या मर्यादाही ओळखता यायला हव्यात.

एक उदाहरण घेऊ. छान मैत्रिणींचा ग्रुप असतो. किटी पार्टी, भिशी, सहलीला जाणे, एकत्र हॉटेलिंग अशा अनेक प्रकारे हा ग्रुप मस्त मजा करतो. शक्यतो संसारातील सर्व जबाबदार्‍या पार पडलेल्या असतात. निवांत वेळ काढून सगळ्याजणी भेटतात. एकमेकींची सुख-दुःखं शेअर करतात. मनातलं एकमेकींना सांगतात.

अशाच ग्रुपमध्ये एखादी अशी मैत्रीण असते जी तुम्ही जे सांगाल ते सगळीकडे तिखट मीठ लावून सांगते. तुम्ही प्रामाणिकपणे, विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी चार चौघात वेगळ्या पद्धतीने सांगते. अशी एखादी मैत्रीण असते जी फटकळपणे तुमचे दोष सांगते. अगदी तुच्छपणे “कसली साडी नेसली आहेस? आणि तुझ्या काळ्या रंगाला तर आजिबात शोभत नाहीये” असे तोंडावर सांगणारी ही असते.

सगळ्या रंगाचा बेरंग होतो. अशावेळी तुम्ही गप्प न बसता स्पष्ट शब्दांत तिला समज दिली पाहिजे की ही माझी आवड आहे आणि मी ती बदलणार नाही. खूप लोकांना इकडचं तिकडे तिखट मीठ लावून सांगायची सवय असते. त्यामुळे प्रामाणिकपणे सगळं खरं बोलू नये. काही गोष्टी विशेषतः तुमचे वैयक्तिक आयुष्य, तुमचे पैशासंबंधी चे व्यवहार हे कोणाला सांगू नयेत. कोणीही याचा गैरफायदा घेऊ शकतात.

प्रत्येक ठिकाणी, प्रसंगी प्रामाणिक असून चालत नाही. काही वेळा आपल्याला  एखाद्याचे वागणे पटत नाही. पण प्रसंग, परिस्थिती बघून बोलावं. किंवा सरळ सरळ शांत राहावं. काही वेळा काहीच न बोलण्याने ही प्रसंग निभावून नेता येतात. त्यावेळी तुमचं प्रामाणिक मत समोरच्याला त्रासाचे ठरू शकतं. विशेषत: आजारी व्यक्तीला बघायला गेल्यावर तर माणसं अगदी प्रामाणिकपणे स्वतःचे, आणखी कोणाकोणाचे अनुभव सांगत सुटतात.

त्याने आजारी व्यक्तीला बरे वाटण्याऐवजी त्रासच होतो. आपल्याकडे तर हे सर्रास दिसतं. खरं म्हणजे जाऊन शांतपणे फक्त आपली उपस्थिती नोंदवावी. आपल्याला त्यांची काळजी वाटते एवढंच कळणे गरजेचे आहे. जास्त बोलू नये. पण हे लोकांना कळत नाही. काही लोक प्रामाणिकपणा हे शस्त्र म्हणून वापरतात. सगळीकडे प्रामाणिक मतं रूक्षपणे, तुच्छतेने मांडत असतात. ही माणसं कोणालाच आवडत नाहीत.

“प्रामाणिक असणं” हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आणि आयुष्यात आपल्याला प्रगतीपथावरच नेतो. प्रामाणिक असलं की खोट्याची, खोटेपणाची भीती राहत नाही. आत्मविश्वास वाढतो. प्रामाणिकपणे स्वतःची चूक कबूल करणं हा मनाचा मोठेपणा आहे. आणि यामुळेच तुम्हां

ला नवीन मार्ग मिळतो. तुमची प्रगती होते. पण प्रामाणिक असणं हे तारतम्य बघून ठरवावं. प्रसंग, परिस्थिती, समोरची व्यक्ती किती महत्त्वाची आहे, नातेसंबंध टिकून राहावेत या सगळ्या बाबी विचारात घेऊन प्रामाणिक असावं. “स्वतःशी प्रामाणिक असावंच.” पण लोक आपल्या प्रामाणिकपणामुळे स्वतःच्या मर्यादा ओलांडतील असं वागू नये.

सारासार विचार, विवेक, संयम आणि महत्वाचे योग्य ठिकाणी मौन या यशस्वी जीवनाच्या पायऱ्या आहेत. प्रामाणिक असणं हे तुमच्या आयुष्याच्या आनंदाचा, प्रगतीचा, समाधानाचा, मन:शांतीचा मार्ग असू द्या..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!