Skip to content

प्रत्येक क्षणाला नव्याने जगूया… नवीन वर्षाचे स्वागत करूया!!

प्रत्येक क्षणाला नव्याने जगूया… नवीन वर्षाचे स्वागत करूया!!


सौ. मिनल वरपे


कालच सागर आणि सुरेश या दोन घट्ट मित्रांचं खूप जोरात भांडण झालं.. अस वाटल इतके चांगले मित्र आता मात्र यांच्यात काहीच संबंध राहणार नाही.. जेवढे चांगले तेवढेच वाईट होतील आता एकमेकांसाठी… पण अगदी काही दिवसातच पाहिलं तर दोघं एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून गावात फिरत होते… आश्चर्य आहेना…

आपण म्हणतो की कोणी कितीही चांगल वागत असेल तरी कधीना कधी वाईटपणा येतोच.. आणि त्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी आधीची कटुता मनात असतेच.. पण याच गोष्टी डोक्यात ठेवून कोणीही कितीही जरी चांगल वागल तरी मनात नकारार्थी विचार येतात.. अर्थात संशयी स्वभाव होतो..

एखादी व्यक्ती जी आपल्या जवळची आहे तिच्याशी काही वाद झाले.. पुन्हा आपण दोघंही बोलायला लागलो आणि त्या व्यक्तीने जर आपल्याला पहीलेसारखाच जीव लावला तर नक्की ही व्यक्ती पूर्वीसारखी जीव लावते की मनात काही भलतचं ठेवून आपल्याशी वरवर गोड वागतेय.. ही व्यक्ती इतके वाद होऊनसुद्धा आपल्याशी पुन्हा इतकी व्यवस्थित का बोलत असावी…

पण असे प्रश्न घेऊन आपण खरचं चांगल असलेलं नात सुद्धा बिघडवतो… मित्र , नवरा बायको अगदी कोणतंही नात असल तरी त्यामधे वाद हे होतच असतात… काही गोष्टी पटत नाहीत तर काही गोष्टी समजून घेण्याची इच्छाच नसते.. कधी कोणाचं वागणं बोलणं आवडत नाही… तर कधी अचानक स्वभावच खटकायला लागतात.. खरं तर वाद होण्यासाठी खूप मोठ्या कारणाची गरज असतेच अस नाही… एकदा मनात नकारार्थी विचार आले की लहान सहान गोष्टी सुद्धा आभाळासारख्या मोठ्या दिसतात ..

जस वाद होण्यासाठी कारणाची गरज नसते अगदी तसचं नात पुन्हा पूर्वीसारखं होण्यासाठी सुद्धा कारणाची गरज नसते… गरज असते ती फक्त नव्याने जगण्याची…

आपण जेव्हा परीक्षेत अपयश मिळवतो त्यावेळी लगेच माघार घेत नाही… पुन्हा नव्याने अभ्यास करतो… तसचं आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात नव्याने जगण्याची प्रेरणा मनाशी ठाम असेल तर कधीच मनात कोणत्याच गोष्टीची भीती नसेल.. ना कोणती कटुता.. ना कोणते संशय..

कोणत्याही नात्यात मनात आढेवेढे घेऊन बसलं की कधीच त्या नात्यातील आनंद मिळणार नाही… जे झालं ते त्याच क्षणाला सोडून येणाऱ्या वेळेत त्याच नात्याला पुन्हा एकदा संधी दिली तर नक्कीच त्या नात्यातील ओढ ही वाढत जाते… जे झालंय तेच धरून ठेवलं तर सतत तेच विचार ना आपल्याला सुखाने जगू देत ना दुसऱ्याला जगून देत.. जर तेच कोणतेच विचार मनात न ठेवता नव्याने त्या व्यक्तीला त्या नात्याला जवळ ठेवलं तर नक्कीच ते नात अजून पक्व होणारं..

फक्त नातच नाही तर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही जर नव्याने जगायची ठरवली तर कधीच मन कुठे घुटमळत राहणार नाही आणि आयुष्यं अगदी सोप वाटेल…

करिअर मधे अपयश आले असेल तर सतत त्याचाच विचार करण्यापेक्षा पुन्हा नवीन संधीचा शोध घेतला तर पुढे कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल आपलं करिअर होणार..

वाद होत असतील तर ते नात तोडण्यापेक्षा त्या नात्याचा पुन्हा नव्याने विचार केला तर ते नात आयुष्यभरासाठी आपल्यासोबत राहील…

कधी कोणी फसवते तर कोणी विश्वासघात करते, कधी अपयश येते तर कधी आयुष्यभर पुरेल अस दुःख येते पण यामुळे आयुष्य तिथेच न थांबवता.. सतत रडत बसून, डोक्याला हात लावून, दुःखाची तक्रार मांडत राहिल्याने हातात काहीच मिळणार नाही.. त्यापेक्षा आपल्या आयुष्याला.. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला नव्याने जगलं तर नक्कीच आयुष्याचा प्रत्येक क्षण न क्षण आपल्याला समाधान देईल… आणि आयुष्य साधं सरळ आणि स्वच्छंदी जगण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळेल….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रत्येक क्षणाला नव्याने जगूया… नवीन वर्षाचे स्वागत करूया!!”

  1. या प्रमाणे प्रेरनादायक विचार सकारात्मक जीवन जगण्यास लाभदायक ठरतात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!