Skip to content

प्रत्येकाला आयुष्यात जपून ठेवणं शक्य नसतं!

प्रत्येकाला आयुष्यात जपून ठेवणं शक्य नसतं!


जागृती सारंग


फुलपाखराला कैद करणं शक्य आहे का?
सोनचाफ्याचा सुगंध लपवणं शक्य आहे का?
मेहंदीचा रंग तळव्यावर तसाच जिवंत ठेवणं शक्य आहे का?

अगदी तसंच आपल्यालाही आपल्या आयुष्यात प्रत्येकाला जपून ठेवणं शक्य नसतं! आपण आपल्या जवळच्या माणसांना कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरीही ती अत्तराच्या बंद कुपीतून अत्तर उडून जावं तशीच आपल्या कळत नकळत आपल्यापासून कधी ना कधी दुरावली जाताताच.

कितीही जवळचं नातं असो, कितीही घनिष्ठ मैत्री असो वा जिवापाड केलेलं प्रेम असो! कधीतरी तडा जातोच, खटके उडतात किंवा परिस्थितीमुळे वा मृत्यूमुळे, इत्यादी कारणांमुळे माणसं दुरावतात. वाईट वाटतं, दुःखही होतं पण समर्थांच्या मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे या श्लोकाप्रमाणे आपल्याला पुढे चालत राहणं गरजेचं असतं.

लोकं सुरूवातीला अनोळखी असतात, थोडं बोलणं सुरू होतं आणि वैचारीक देवाण घेवाण झाल्यावर विचार जुळले की मैत्री होते. विरूद्ध लिंगी व्यक्ती असल्यावर मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. पण मेत्री असो वा प्रेम त्यात कधी कधी काही ना काही कारणामुळे दुरावा येतो मग कारण काहीही असो!

मग त्यात दोघांनीही एकमेकांना जिवापाड जीव लावला असेल पण राग, त्रागा झाल्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन बसते. मग एकाकडून हळूहळू अबोला येत जातो किंवा प्रायोरिटीज बदलत जातात. आपसूकच एकाने वाट पाहिलेली असते सगळं नीट होण्यासाठी परंतू वाट पाहणं नकळत लांबत जातं. हे प्रकार सर्वच नात्यांमध्ये असतात.

आईवडील सुद्धा मुलं मोठी झाल्यावर आपल्या लेकरांची आस लावून वाट पाहत असतात की आपण ज्या प्रमाणे त्यांना लहानपणी वेळ दिला, सांभाळलं, काळजी घेतली अगदी तसंच आपल्या वृद्धापकाळात आपल्या मुलाबाळांनी आपल्यासाठी करावं. परंतू काही कारणांमुळे हे बहुतांशी घडताना दिसत नाही. असं म्हटले जाते कि अपेक्षा कधीच ठेवू नयेत पण कितीही नाकारलं तरी प्रत्येकाला प्रेम, काळजी, माया, वात्सल्य, कौतुक या सर्व गोष्टींची थोड्या थोडक्या प्रमाणात कोणा ना कोणाकडून अपेक्षा असतेच. म्हणून वास्तव ही सोबत ध्यानात ठेवायला हवं की आपण प्रत्येकासाठी आणि इतर जणं आपल्यासाठी सतत मनासारखं नाही वागू शकत.

माणसं जेव्हा आपल्या मनासारखं वागत नाहीत तेव्हा आपल्याला वाटतं कि ती बदलली आहेत. मग दुरावा आला की मन खट्टू होतं, राग राग येतो, चिडचिड होते. आपण कुठे कमी पडलो, काय नाही केलं, दिवस रात्र एक केला मग असं का घडावं असे ना ना विचार मनात येतात. मग हळव्या मनाची माणसं अचानक चिडचिडी होतात, दुःखी होतात, एकलकोंडी होतात किंवा मग अगदी डिप्रेशनचेही शिकार होतात.

प्रेमभंग झाला असेल तर अगदी आत्महत्येचेही विचार मनात येतात. तेव्हा फक्त हाच विचार करावा आपण समोरत्याला फुलासारखं जपणार आहोत पण समोरचा आपल्या प्रेमाला पारखा होतोय, त्याने आपल्याला नव्हे तर आपलं प्रेम लाथाडलं आहे तर आपल्याला इतका त्रास होतोय मग आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या आईवडील, भावंडं, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून आपण का कायमचं लांब जावं? त्यांनी तर आपल्याला लाथाडलेलं नाही ना!

त्यांच्यासाठी तर आपण राजकुमार, लाडली, यार, जिगरी दोस्त, बेस्टी आहोत ना! मग जी व्यक्ती आपलं प्रेम डिजर्व्ह करते त्या व्यक्तीसाठी वाट पहावी. त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम उधळावं इतकं की आपल्याला लाथाडून जाणाऱ्या व्यक्तीला अक दिवस हेवा वाटावा आणि पश्चाताप व्हावा. समोरच्या व्यक्तीने आपल्याला जर कोणत्या कारणासाठी नाकारलं असेल तर त्या गोष्टीवर वर्कआऊट करावं, कृतीतून बदल आणावा म्हणजे जर वेळ असेल तर समोरची व्यक्ती पुन्हा माघारी सुद्धा येऊ शकते.

पण कोणतंही नातं का असेना, जर त्यात कडवटपणा आला असेल वा कारण कोणतेही असो जर दुरावा आलाच तर एक गोष्ट कायम ध्यानात घ्यावी कि आपण प्रत्येकाला आयुष्यभर जपून ठेवू शकत नाही! अगदी मनातसुद्धा आपण कालांतराने कधी काळी जीवापाड जपलेल्या माणसांना विसरतोच. कदाचित पटणार नाही पण हे सत्य आहे. कधीतरी काही कारणामुळे योगायोगाने आठवण झाल्यावरच आपण त्यांची आठवण काढतो.

जर हे पटलं तर वास्तव न नाकारता मनावर हे कायम कोरून ठेवलं की आपण जवळ असणाऱ्या वा लांब असणाऱ्या कोणालाही आयुष्यभर जपून ठेऊ शकत नाही तर आयुष्यात कधीच त्रास होणार नाही. आयुष्य सिरियस होऊन जगण्यापेक्षा काळजातल्या भावनिकतेला मेंदुच्या सोबत घेऊन प्रॅक्टिकलपणे जगावं.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रत्येकाला आयुष्यात जपून ठेवणं शक्य नसतं!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!