Skip to content

प्रत्येकाची मन-मर्जी सांभाळून जगणं गरजेचं आहे का ?

प्रत्येकाची मन-मर्जी सांभाळून जगणं गरजेचं आहे का ?


मेराज बागवान


‘मन’ ही अशी बाब आहे, जी डोळयांना दिसत नाही पण फक्त आपल्या भावना त्या मनाला खरा अर्थ देतात आणि माणसाला जिवंत ठेवतात. मग हे मन आहे तरी काय? मन ही अदृश्य गोष्ट आहे. माणसाला खऱ्या अर्थाने मनुष्यपण प्राप्त होते ते केवळ ह्या मनामुळेच. हे मन आपल्याला प्रेम,विश्वास, त्याग ,आवडी-निवडी सर्व काही शिकविते. जेव्हा एखाद्यामध्ये सर्व प्रकारच्या भावना असतात तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने मन आहे असे आपण म्हणू शकतो.

आपल्या सभोवताली अनेक माणसे असतात. प्रत्येकाला मन हे असतेच. कधी आपण स्वतःचे मन जपतो.म्हणजे, आपल्याला जे वाटते ते करतो, तसे वागतो,बोलतो,राहतो आणि जगतो.तशाच प्रकारे, आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांचे देखील मन जपावे लागते. त्यांच्या मनाप्रमाणे-मर्जीप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात.एका पातळीपर्यंत हे गरजेचे देखील असते.

आपल्या लोकांसाठी असे करणे ह्यात मोठे असे काहीच नाही .कारण सगळ्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी त्याग कराव्या लागतात आणि आपल्या माणसांचे मन जपावे लागते. पण ह्या जगात, आपल्या आयुष्यात अनेक माणसे असतात.मग प्रत्येकाचेच मन जपत बसणे कितपत शक्य आहे ? असे जगणे खरेच गरजेचे आहे का ?

जसे की साधे उदाहरण घ्यायचे झाले तर ; काही कार्यक्रम असतात, आपल्याला तिथे आमंत्रण असते. पण नेमके त्याच दिवशी आपल्याला सुट्टी असते आणि आपल्याला घरीच राहून आराम करायचा असतो. पण बोलवले आहे म्हणून, त्यांचा मान राखायला आपण तिकडे जाण्याच्या तयारीत असतो आणि दुसरे मन घरीच आराम करावा असे सांगत असते. अशा अनेक गोष्टी आहेत.

एका मुलाचे लग्न ठरते, मुलगी त्याच्या पसंतीची तसेच त्याच्या पालकांना देखील आवडलेली. पण नातलगांमध्ये कुणाला तरी ती मुलगी पसंत पडत नाही आणि ती व्यक्ती हे मुलाच्या पालकांकडे ही गोष्ट बोलून दाखविते. आता इथे मुख्य व्यक्तींनाच मुलगी पसंत आहे , तर बाकी कोणाची मर्जी सांभाळण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तशी गरज ही नाही.

काही जण अति विचार करतात. “अरे अमुक एका नातलागला बोलावले नाही तर त्यांना कसे वाटेल? मी कामात आहे खूप , म्हणून मला तिला मदत करता येत नाही,साधा फोन देखील करता येत नाहीये , तिला काय वाटत असेल? अरे….मी घाईत होतो आणि तिथे कुणाशी नीट न बोलताच परतलो, त्यांना कसे वाटले असेल? अरे , मी त्याच्या मेसेज ला उत्तर च दिले नाही.” असे अनेक विचार आपल्या मनात डोकावत असतात. पण प्रत्येक वेळी सगळ्यांची मने सांभाळणे गरजेचेच असते का ? तर अजिबात नाही. जर तुम्ही खरे आहात , तर त्या व्यक्ती घेतील ना तुम्हाला समजून. मग आपण प्रत्येकाच्या मनाचा विचारच करत राहणार का फक्त ?

आज प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे आहेत. जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे. मग अशा वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाशी बोलणे, प्रत्येकाच्या मेसेज ला उत्तर देणे नाही जमत.मग असे असताना, प्रत्येकाची मर्जी सांभाळणे कसे बरे शक्य आहे ? बऱ्याचदा काय होते, कुटुंब प्रमुखाकडे अनेक जबाबदाऱ्या असतात. घरातील प्रत्येक व्यक्ती मला हे हवे आहे, मला ते हवे आहे असा हट्ट करीत असतात.

मग अशा वेळी त्या कुटुंब प्रमुखाची प्रत्येकाचे मन जपत जपत जणू तारेवरची कसरतच होते. मग काही वेळेस , तो कुटूंबमुख सगळ्यांची मने जपतो आणि एक मग कोणी तरी त्याच्या जवळची व्यक्ती, जसे की त्याची पत्नी तिचे मन तो जपू शकत नाही , कारण प्रत्येकाची मर्जी सांभाळून सांभाळून तो अगदी वैतागून जातो.

म्हणूनच असे वाटते, घर असो किंवा समाज, समाजात वावरत असताना, थोडे आपल्या मनाप्रमाणे पण जगावे लागते.प्रत्येकाची मने जर का आपण सांभाळत बसलो तर आपण जगूच शकणार नाही. आणि आपण नेहमी ताणामध्ये वावरत राहू.आणि आज एवढा वेळ तरी कुठे आहे प्रत्येकाकडे की प्रत्येकाची प्रत्येकजण मर्जी सांभाळत बसेल?

अनेक जण असा विचार करतात की , कधीच आपल्याकडून कुणाचे मन दुखावले नाही गेले पाहिजे, जेणेकरून आयुष्यभर कोणती खंत मनात राहणार नाही. पण असे प्रत्येकवेळी होईलच असे नाही.काही निर्णय हे घ्यावेच लागतात, पुढे जाण्यासाठी.मग मी नसेल तर त्यांचे कसे होईल, असा विचार करणे व्यर्थ असते.कारण आयुष्य क्षणभंगुर असते, आज एक तर उद्या एक.म्हणून थांबून नाही चालत, पुढे जावेच लागते.

आपल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. आपल्याला आवडले आणि दुसर्याना नाही म्हणून आपण त्यांच्या मनाचा का विचार करायचा? एखादी गोष्ट खूप सुंदर आहे , सगळयांना ती खूप आवडली आहे , पण एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट नाही आवडत. मग त्या व्यक्तीने , सगळ्यांना आवडते म्हणून ती गोष्ट आवडून घ्यायची का ? आणि सगळ्यांची मने जपता जपता स्वतःला काय आवडते हे विसरून जायचे का?

एखाद्या मुलाला एखाद्या कोर्स साठी प्रवेश घ्यायचा आहे. त्याचे पालक त्याला म्हणत आहेत,तू अमूक एका कोर्स ला प्रवेश घे, सगळे तिथेच प्रवेश घेत आहेत. पण त्या मुलाला मात्र तो कोर्स नको आहे आणि त्याची आवड दुसरी आहे.मग इथे त्याने प्रत्येकाची मने जपत बसायचे की आपली आवड जोपासायची? म्हणूनच असे जगण्याची तशी काहीच गरज नसते.

समाजात, लोक तेवढ्यापुरते बोलतात.पण पुढचे सगळे तर आपल्यालाच करायचे असते. म्हणून कोण काय म्हणतोय, या कडे लक्ष न देता, स्वतःचा आनंद कशात आहे हे ओळखून पुढे गेले पाहिजे.मग आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती खरच आपल्या असतील, त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास असेल तर त्या आपल्याला समजून घेतलीच की. कुणाचे मन काय सांगते या पेक्षा माझे मन काय सांगते या कडे आज प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.

विचारांच्या बाबतीत देखील असेच आहे. काही जणांचे खूप सामाजिक विचार असतात, त्यांची नेहमी समाजकार्य करण्याची इच्छा असते आणि ते तसे करीत असतात. मग फक्त समाजात मान मिळायला, आपले असे विचार नसून देखील आपण असे वागलेच पाहिजे याची अजिबात गरज नसते. आपण जसे आहोत तसे राहिले पाहिजे.

उगाच इतरांची मने जपण्यासाठी स्वतः मारून-मुटकून जगणे याची काहीच अवश्यकता नसते.यामुळे त्रास फक्त अपल्यालाच होतो आणि आतल्याआत आपण कुढत राहतो.आणि आयुष्यातील शांतीच जणू भंग पावते.इतरांचे सदैव ऐकून ऐकून आपण आपली विचारशक्ती देखील कधी कधी हरवून बसतो.

मग ह्या सगळ्याचा आयुष्यातील वेगवेगळे निर्णय घेताना खूप अडचण येते.ठाम एका मतावर आपण लवकर पोहचू शकत नाही.म्हणून कोणाला काहीही वाटो, कोणी काहीही म्हणो, आपण तेच केले पाहिजे जे आपले मन आपल्याला सांगत आहे.आणि आपण प्रत्येकाची मन-मर्जी सांभाळत जर का बसलो, तर आपण आपले आयुष्यच लवकर संपून टाकत आहोत असे समजा.

म्हणून मनाला जरूर जपुयात, स्वतःच्या आणि इतरांच्या देखील.पण इतरांची मने जपताना ‘लक्ष्मणरेषा’ मात्र लक्षात ठेवुयात.कारण ‘अति’ झालेली कोणतीही गोष्ट आयुष्यासाठी हानीकारकच असते.

‘मन’ ही अदृश्य पण तितकीच सुंदर गोष्ट आहे. त्या मनाला भरकटू देण्यापेक्षा योग्य वळणावरती नेऊयात….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!