पुरुषांना सुद्धा घरातली कामे यायला पाहिजेत कि नाही ??
सौ. शमिका विवेक पाटील
सकाळी 8 वाजले तरी लता अजून अंथरुणातच होती. इथे हेमंतची बडबड सुरू झाली. रात्रीची मोबाईलवर उशिरापर्यंत असतेस आणि मग सकाळी उठायचा कंटाळा करतेस. चल, उठ लवकर. मला उशीर होतोय. Atleast चहा तरी ठेव. कॅन्टीनमध्ये लंच करेन आज. पिंटूला पण शाळेला उशीर होईल ग. उठ पटकन. त्याचं सगळं आवरायचं आहे. दूध पण अजून गरम केलेलं नाही.
लता, काय झालं ? असे म्हणतं त्याने तिच्या अंगावरची चादर खेचली आणि हाताला धरून उठवले. तसे त्याला एकदम गरम चटका लागला. अरे, तुला तर ताप आला आहे. ओ नो, एवढा कसा अचानक ताप आला ? ती काहीच न बोलता चादर अंगावर ओढून झोपून गेली. मला खरंच गळून गेल्यासारखं झालंय, खुप अंग दुखतयं. आज कसेही करून adjust करा. पिंटूला आईकडे सोडून या हवे तर, पण माझ्याने आज काही होईल असे वाटतं नाहीय. कामवाल्या मावशी पण सुट्टीवर गेल्या आहेत दोन दिवसापासून, त्यामुळे तुम्हाला थोडी फार घरातली कामं करावी लागतील.
घरातली कामं बोलल्यावर हेमंतला घाम फुटला, ती अजून काही बोलायच्या आत ह्यालाच थंडी भरली असावी बहुतेक. जमेल का ओ, नाहीतर मलाच उठून करावं लागेल. छे, त्यात काय मोठं ? जमेल की सगळं… आणि पिंटूचे पण सर्व मी करीन, तु फक्त आराम कर आणि लवकर बरी हो. ऑफिस मध्ये फोन करून दोन दिवसांची सुट्टी मागून घेतली.
चला, कामाला लागा म्हणतं त्याने पिंटूला उठवले. त्याची सर्व तयारी केली आणि शाळेचा युनिफॉर्म घालून बसवले. ह्या गडबडीत दुध गरम करायचे राहिले, लगेच त्याने दुधाचं पातेलं गॅसवर चढवले. एका बाजूला डब्ब्यातून बिस्कीट शोधून काढले. थोडं दुर्लक्ष काय झालं इथे दुध उतू गेलं. अरे देवा, म्हणत त्याने कपाळावर हात मारला आणि ग्लासात दूध ओतुन पिंटूला बिस्कीट भरवू लागला.
लता ने अंथरुणातूनच आवाज देत सांगितले, त्याला डब्ब्यात रव्याचा लाडू आहे तो द्या आणि सोबत एक सफरचंद कापून द्या. आता लाडूचा डब्बा शोधायचा टास्क होता, ५ डब्बे चाचपडल्यानंतर काय तो डब्बा मिळाला. पिंटूला स्कूल बस मध्ये बसवून साहेबांची स्वारी घराकडे वळली. घरी आल्यावर चहा बनवायला घेतला.
आधी आई असायची म्हणून कसली घरकामं करायची गरज वाटली नाही. पण आई बाबा महिना झाला शेतीची कामं बघायला गावी गेले होते आणि इथे पूर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर सोपवली. चहा बनवायला घेतला आणि लक्षात आले ह्या आधी कधी पाणी सुध्दा उकळले नव्हते आणि हे सगळे कसे काय जमेल ? धीर एकटवून साहेबांनी YouTube ओपन केले आणि केली सुरुवात. चहाचा सोहळा पार पडला, अर्थातच पहिली experiment यशस्वी झाली. नंतर मशीनला कपडे लावले, घर आवरले आणि झाले एकदाचे सर्व काम म्हणतं हातात मोबाईल घेतला. लताला अजून कणकण वाटत होती, औषध घेऊन ती तशीच झोपून राहिली.
एक, दोन तास आराम केल्यानंतर हेमंतच्या लक्षात आले की दुपारचे जेवण पण आपल्यालाच बनवायचे आहे. तसा ताडकन उठला आणि किचन कडे धाव ठोकली. लगेच YouTube काढले आणि शोधा शोध सुरु झाली. Finally, दाल खिचडी बनवायचे ठरले. सगळी सामग्री शोधेपर्यंत अर्धा तास निघून गेला. ह्या सगळ्या गोष्टी आईने आधीच शिकवल्या असत्या तर आता उगीच धावपळ नसती झाली.
शेवटी काय ती एकदाची दाल खिचडी तयार झाली. थोडी फोडणी करपली पण लताने गोड मानून खाल्ली. जेवताना हेमंत घाम पुसत सगळी किचन मधली हकीकत सांगत होता, लताला मात्र हसू आवरेना. हसायचंच काम कर तू, तुला फार मज्जा येत असेल ना, मला ह्या अवतारात बघून. त्याच्या ह्या बोलण्यावर लताने त्याला घास भरवत सांगितले, की आपल्याकडे मुलाला ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जात नाहीत. ही सर्व मुलींची कामं आहेत, त्यांनीच शिकावी म्हणून किचन पासून मुलाना लांब ठेवले जाते.
संसार जर दोघे चालवत असू तर किचन पण दोघांना सांभाळता आलं पाहिजे. चहा ठेवणे, वेळेला डाळ भात करणे ह्या अगदी बेसिक गोष्टी पुरुषांना जमायला हवेत. आधी तर पाण्याचा ग्लास सुध्दा मुलांना हातात दिला जाई, का तर बायकांच कामच आहे ते म्हणून…पण घरातली स्त्री आजारी पडली तर किती तारांबळ उडते हे तुमच्या लक्षात आले असेलच.
आजच्या मुलांना काय ते मेगी बनवता येते पण ती तरी किती दिवस खाऊन दिवस काढणारं. मी आपल्या पिंटूला ह्या सर्व गोष्टी शिकवणार आहे. अगदीं कोणी हसले तरी चालेल पण मुलगा आहे म्हणून नको ते लाड नाही लावून घेणारं. स्त्रीचा जन्म फक्त चूल आणि मूल सांभाळण्यासाठी झाला हे विचार करणाऱ्या अजून कितीतरी माता आपल्या समाजात आहेत, पुरुषाने ही सर्व कामं केली की त्याला नावं ठेवणाऱ्या बऱ्याच जणी आहेत.
आज कितीतरी शेफ हे पुरुषच आहेत मग स्वतःच्या घरातले काम करायला कसली आली लाज. तुम्ही आज जे काही माझ्यासाठी केलंय ते पाहून खुप समाधान वाटले की अडचणीला तरी तुम्ही ह्या गोष्टी करू शकाल. थँक्यू, जे काही केले त्याबद्दल. अग वेडी, थँक्यू कशाला ? हे माझं कर्तव्य आहे. ह्या पुढे सुट्टीच्या दिवशी मी तुला रोज किचन मध्ये मदत करणारं. हेमंत मधला हा बदल सगळ्या पुरुषांमध्ये व्हायला हवा. त्यासाठी आता घरातल्या स्त्रियांना मात्र आजारी पडावे लागणारं.
पुरुषांना घरातली बेसिक कामं यायला हवी की नको ? ह्यावर तुमचं मत काय आहे ?
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


खरय नाहीतर खाईल तर तुपाशी नाहीतर राहिल उपाशी आशी गत होते. छान लेख नेहमीच यू ट्यूब कामी येत नाही.!.