Skip to content

पुढे जाताना नाईलाजाने अनेकांना मागे सोडावे लागते, हा निसर्ग नियमच!

पुढे जाताना नाईलाजाने अनेकांना मागे सोडावे लागते, हा निसर्ग नियमच!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


पानगळ…. पानगळ झाली की नवी पालवी फुटायला सुरुवात होते. पण तेव्हा झाड मात्र रडत बसत नाही. ते झाडही झालेल्या बदलांना अगदी हसत हसत स्वीकारत असावं.नवीन काही अनुभवण्यासाठी जुनं मागे सोडावं लागत.हा निसर्गनियम कदाचित त्या झाडालाही मान्य असावा.नाहीतर पानं गळून पडतात म्हणून त्यांनी तक्रार केली असती.

या झाडांच्या बाबतीत जो निसर्गनियम लागू होतो तोच नियम आपल्या आयुष्याच्या बाबतीतही लागू होतो.आपलं आयुष्य हे जितकं काचाकुट्यांनी भरलेलं आहे अगदी तितकच ते विलक्षण मोत्यांनीही भरलेलं आहे.खरं तर माणूस मरताना कोणत्याही भौतिक गोष्टी वर घेऊन जात नाही पण जाताना तो आठवणी मात्र नक्की घेऊन जातो. आठवणी म्हणाल तर एक जगण्यातील फिलॉसॉफी झाली. पण आयुष्य जगताना आपण अशाच कित्येक गोष्टी मागे सोडतो.कधी मुद्दाम तर कधी नाइलाजाने…! पण पुढे जाताना गोष्टी मागे सोडाव्या लागतात हा जणू निसर्गनियमच…!

आयुष्याचा प्रवास किती पल्ल्याचा आहे याचा अंदाज आपल्याला नाही. पण जोपर्यंत हा प्रवास सुरू आहे तोपर्यंत विविध गोष्टींसोबत , माणसांसोबत आपली ओळख होत असते. आपण त्यांच्या सानिध्यात वावरत असतो. पण कायमस्वरूपी आपण काही एकाच जागेवर थांबून राहत नाही. हा प्रवास आहे जो अखंडपणे चालू असतो. त्यामुळे एका जागेवरून चार पावलं पुढे सरकणं गरजेच असतं.

आणि पुढे जाताना कधी कधी काही गोष्टी नाइलाजाने आपल्याला मागे सोडाव्या लागतात. फार कठीण असतं एखादी गोष्ट सहजासहजी मागं सोडणं पण काय करणार…. गोष्टी मागे सोडल्याशिवाय पुढेही जाता येत नाही नं…?

मनाची कितीही तयारी नसली तरीही आपल्याला काही गोष्टी या मागे सोडाव्याच लागतात.”मी नाही सोडू शकत हे, मला नाही जमणार ,हे सोडून मी कशी /कसा पुढे जाऊ…?” त्यावेळी हे असं बोलून चालत नाही. याऊलट ” मला हे सोडावच लागेल त्याशिवाय पुढे जाता येणार नाही” असा विचार करणं आवश्यक असतं.कारण तिथूनच आयुष्याची पुढील वाटचाल निरंतर चालत राहणार असते.

खरतर ही रोजची कहाणी…. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला वेगवेगळ्या माणसांना भेटायची संधी मिळते.काही आपलीशी झालेली असतात तर काही अनोळखी असतात. इतकच नाही तर त्या बससमधल्या अनोळखी लोकांसोबतही आपण कधी कधी खूप आपुलकीने वागतो.जणू काही जन्मोजन्मीचे नाते आहे असा संवाद साधतो.पण नंतर अचानक वाटा वेगळ्या होतात.

प्रत्येकाच्या वाटाही वेगवेगळ्या असतात.त्यामुळे तिथे त्या सहप्रवाशासोबत आपण काही थांबू शकत नाही. किंवा त्याच्यासोबत पुढे जाऊही शकत नाही. कारण एकच…..प्रवास जरी आयुष्याचा असला तरी प्रत्येकाच्या वाटा सारख्या मुळीच नाहीत. त्यामुळे नाइलाजाने का होईना त्यांना मागे सोडून आपल्याला आपल्या दिशेने जावच लागतं.

कुणी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात आपल्याला भेटत असतं.पण सगळ्याच भेटीगाठी या आयुष्याच्या शेवटापर्यंत नसतात. काहींना असच कधी कधी अर्ध्यावर निरोप द्यावा लागतो.

अगदी छोटी छोटी साधी सरळ उदाहरणं सांगायची झाली तर….चॉकलेट्स बऱ्याच जणांना आवडतात. पण कुणाला कशाची क्रेझ असेल काही सांगता येत नाही.म्हणजे चॉकलेट्स बरोबर त्या कागदाचही कित्येकांना आकर्षण असतं , अप्रूप वाटतं. पण मग चॉकलेट्स खायच झालं तर ते फोडल्याशिवाय काही खाता येत नाही. त्यामुळे त्या कागदाला कुठेतरी मागे सोडावच लागतं.

आणि इतकच नाही तर कुणाला तीच कागदं संग्रही ठेवायचीही सवय असते.पण पहा आता पर्यावरणाचा विचार करायचा झाला तर ह्या कागदांनाही गुडबाय करावाच लागणार.अगदी आयुष्यातील भेटलेल्या प्रत्येक गोष्टीच असच काहीस आहे.

आपण दीर्घकाळ कोणतीही गोष्ट हातात पकडून ठेवू शकत नाही. कधी ना कधी तीची वाट आपल्याला सोडावीच लागते.आयुष्यात पुढे जायच असेल तर काही गोष्टींना ‘अलविदा’ करता यायला हवं. अगदी आपण एखाद्या सरत्या वर्षाला निरोप देतो तसच हेही जमायला हवं.

मुळातच जमणं वगैरे हा काही विषयच नाही. तो निसर्गाचा नियम आहे. आपण केवळ तो हसतहसत स्वीकारला पाहिजे. मोकळ्या मनाने मान्य केला पाहिजे.कारण जर माणसांना , गोष्टींना सोडता आलं नाही तर पुढचं जगणं कठीण होत जातं.आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला उशीर होतो.त्यामुळे वेळीच हा निसर्गनियम मान्य करा आणि आयुष्याच्या उर्वरित प्रवासाला सुरुवात करा.नवीन माणसं , नवी वळणं तुमची नव्याने प्रतीक्षा करत असतात….!

Life is a great journey….
So… Accept and move on….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!