Skip to content

“पुढची काळजी आपल्याला या क्षणाचा आनंद घेऊ देत नाही.”

“पुढची काळजी आपल्याला या क्षणाचा आनंद घेऊ देत नाही.”


मधुश्री देशपांडे गानू


“अरुंधती” ही नावारूपाला येऊ पाहणारी विशी बावीशीची गुणी, सुंदर अभिनेत्री. नागपूरहून येऊन मुंबई नामक मायानगरीत स्वतःची ओळख निर्माण करू पाहणाऱी. नाटक, चित्रपट, मालिका क्षेत्रांत यशस्वी पदार्पण करणारी. सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेली. आई-वडिलांचा विरोध पत्करूनही स्वतःची आवड, स्वतःचा ध्यास मनापासून जोपासणारी.

मुंबईच्या वेगवान गर्दीमध्ये स्वतःला सांभाळायला शिकत होती. लोकलचा प्रवास, इथला वेग, इथलं राहणीमान सगळेच नवीन, अंगावर येणारं. पण तरीही नेटानं सगळ्याला सामोरं जाणारी. अभिनेत्री म्हणून अत्यंत उज्ज्वल भविष्य असणारी. नुकतीच या क्षेत्रात स्थिरावू पाहत होती. डोळ्यांत मोठी रंगीबिरंगी स्वप्न होती. प्रयत्न, मेहनत, शिकण्याची तयारी होती. एक एक यशस्वी पाऊल टाकत होती.

अशातच तिच्या अगदी जवळच्या नातलगाचं अकाली निधन झाल्याचं तिला कळलं. आणि त्याचा तिच्या मनावर प्रचंड आघात झाला. तिचे आई-वडील दोघेच नागपुरात राहत होते. मोठी बहीण लग्न करून अमेरिकेत स्थायिक. त्यामुळे हिला आईवडिलांची खूप काळजी वाटू लागली. त्यांच्या बाबतीत पण अचानक असंच काही झालं तर?? हा विचार तिला दिवस-रात्र छळू लागला.

अत्यंत भावनाप्रधान असल्याने ही भीती ती कायम बाळगू लागली. तिच्या कामावर याचा परिणाम दिसू लागला. अगदी छान तालमी झालेलं शेवटच्या टप्प्यात आलेलं उत्तम नाटक यामुळे तिच्या हातातून गेलं. हळूहळू ती नैराश्याने ग्रासली गेली. काही केल्या ही भीती तिच्या मनातून जात नव्हती. तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

करियरच्या सुरुवातीलाच तिच्या यशाचा मार्ग खुंटतो की काय असं वाटायला लागलं. उद्या, परवा, भविष्यात आपल्या आई-वडिलांना काहीतरी होईल, ते कायमचे आपल्यापासून दूर जातील या अकारण, अवास्तव काळजीने तिचा वर्तमान काळ झाकोळून गेला. तिचं काम करणं कमी होऊ लागलं. जे अत्यंत आवडीचं काम होतं त्याचाच आनंद ती घेऊ शकत नव्हती.

हळूहळू आपलं चुकतंय हे तिच्या लक्षात येऊ लागलं. मग समुपदेशकांच्या मदतीने तिने यातून मार्ग काढला. याला नक्कीच काही काळ जावा लागला. तिची भीती अनाठाई होती, हे तिच्या लक्षात आलं. तिचे आई-वडील आरोग्यपूर्ण, आनंदी जीवन जगत होते.

निराशेच्या गर्तेतून ती लवकर बाहेर पडली. सकारात्मकतेने आणि वास्तवाचं भान ठेवून आजचा क्षण परिपूर्णतेने जगण्याचा प्रयत्न करू लागली. परत एकदा आत्मविश्वासाने तिचं कार्यक्षेत्र यशस्वीपणे गाजवू लागली.

अरुंधती ची ही कथा आपल्याला हेच सांगते की पुढची अकारण काळजी जर आपण करत राहिलो तर आपण आत्ताचा क्षण आनंदाने जगू शकत नाही.

मान्य आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या, त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी असते. असायलाच हवी. आपलं आणि कुटुंबियांचं भविष्य चांगलं सुरक्षित असावं यासाठी प्रत्येक व्यक्तीची धडपड ही असतेच. त्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करावेत. पण भविष्यात काय घडेल किंवा काही तरी वाईटच घडेल अशा नकारात्मक विचारांनी ग्रासून कित्येक जण त्यांचा आज, त्यांचा वर्तमान बिघडवून टाकतात.

मी अनेकदा लिहिल्याप्रमाणे खरंतर माणसाच्या हातात फक्त आत्ताचा क्षण असतो. उद्याचं कोणी सांगितलं आहे?? हातात असलेला क्षण वाया न घालवता संपूर्णपणे भरभरून जगायचा असतो. उद्याच्या सुरक्षिततेसाठी आपण अमाप पैसा आयुष्यभर राब राब राबून कमावतो.

पण आज त्याचा उपयोग घेतच नाही. कित्येक नोकरदार, व्यावसायिक स्त्री-पुरुष निवृत्त झाल्यावर स्वतःची अनेक स्वप्नं, इच्छा, आवडी साकार करायचं ठरवतात. पण निवृत्ती जवळ येईपर्यंत अनेक शारीरिक आजार मागे लागलेले असतात.

आता पैसा असतो पण तू मनासारखा उपभोगायला शारीरिक मानसिक स्वास्थ्य मात्र नसतं. सतत उद्याची, पुढे काय होणार? याची काळजी करून तुम्ही स्वतःचा आज गमावत आहात. “आत्ताचा क्षणच अवघं जीवन आहे” या विश्वासाने जगून तर पहा! नुसती काळजी करण्याने काहीच साध्य होत नाही. उलट स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ताचा तुमच्या हातात असलेल्या या क्षणाचा पुरेपूर, भरभरून आनंद घ्या. त्यासाठी स्वस्थ राहा.. आनंदी राहा..

“जिंदगी हंसने गाने के लिये है पल दो पल..

इसे खोना नही खो के रोना नहीं….

पटतंय ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!