Skip to content

पालकांनी मुलींची जबाबदारी तिचं लग्न करून नव्हे, तर तिला सक्षम करून संपवावी.

पालकांनी मुलींची जबाबदारी तिचं लग्न करून नव्हे, तर तिला सक्षम करून संपवावी.


गीतांजली जगदाळे


पुरुषप्रधान संस्कृती असल्याने मुलगी म्हणून आपल्याला समाजात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. पण अनेकदा घरातूनही मुलींना या लैंगिक भेदाचा सामना करताना कित्येक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. लहान वयापासूनच मुलींना घरात वेगळी वागणूक दिली जाते. सुरक्षेच्या नावाखाली त्यांना मर्यादा तर घातल्या जातातच पण एक चांगली व्यक्ती होण्यासाठी काय काय करावे लागते हे त्यांच्या मनावर चुकीच्या पद्धतीने बिंबवले जाते. चांगली बाई ही आधी चांगला माणूस असायला हवी पण हे सांगायला पालक खूप उशीर करतात आणि इतर गोष्टी तिच्या मनावर बिंबवत राहतात.

लग्न हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. पण त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आपल्या पायावर उभं राहून, आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं हा आहे. आपल्या पायावर उभी नसलेली मुलगी लग्नाआधी आईवडिलांवर आणि लग्नानंतर नवऱ्यावर संपूर्णतः अवलंबून असते.

आयुष्यात कोणता प्रसंग, कोणती परिस्थिती कधी उभी राहील सांगता येत नाही, कधी त्या मुलीच्या आयुष्यात अशी परिस्थिती आलीच की, ती ज्या माणसावर अवलंबून आहे तो आधारच तिच्या आयुष्यात राहिला नाही तर मग मानसिकरीत्या विरहाने आलेला त्रास तर भोगावाच लागतो, पण मालमत्ता नसेल तर आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागते.

कितीही म्हणलं, आईवडील आहेत , नातेवाईक आहेत, तरीही अशावेळी ही मंडळी कितपत मदत करू शकतील आणि जी मदत ते करतील ती खरंच पुरेशी असणारे का, आणि आयुष्यभर आपल्याला कोण मदत करणार, आणि तिथून पुढे जाऊन पायावर उभं राहणं किती अवघड जाईल हे आणि असे बरेच प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात.

कधीतरी काहीतरी आपत्ती येईल आणि म्हणूनच आपण सक्षम असणं गरजेचं आहे असं नाही. पण आपण आपल्या मुलींना आर्थिकरित्या , शिक्षणाने आणि सगळ्या बाजुंनी सक्षम केले तर समाजात त्यांचं एक अस्तित्व असेल. या अमक्याची मुलगी आणि तमक्याची बायको किंवा सून, एवढीच आपली ओळख न राहता समाजात मानाचं असं आपल्याला एक स्थान असत.

गृहिणी होण्यात काहीच वाईट नाही उलट ती तर २४ तासांची न संपणारी आणि सुट्टी नसणारी , बिनपगारी अशी ड्युटी आहे. सगळ्यात अवघड जॉब तर गृहिणीचाच असतो. पण आपल्या समाजात गृहिणीचं असणार स्थान प्रत्येकालाच माहित आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक पालकांची आपल्या मुलींना चांगलं शिक्षण देण्याची आणि त्यांना समानतेने वाढवण्याची जबाबदारी आहे.

त्यांच्या लग्नाचं टेन्शन घेण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज आहे. लग्न काय झाल्याशिवाय राहत नाही, फार धुमधामीत करण्यापेक्षा फारफार तर साधं करता येईल. असाही लग्नात किती खर्च झाला यावर तर लग्न टिकणार की नाही, किंवा जोडपं किती खुश राहील हे तर नक्कीच अवलंबून नसत.

पण तुम्ही तुमच्या मुलीला सक्षम करून जेव्हा पाठवताल तेव्हा नक्कीच तिथे ही तिला मान सन्मान मिळतो. आणि मुलगी सक्षम असते तेव्हा ती स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचीही प्रगती उत्तमरीत्या करू शकते, आणि म्हणूनच तर ‘ मुलगी शिकली प्रगती झाली’ असं म्हणलं जातं. कारण एक मुलगा शिकतो तेव्हा फक्त तो एकटाच शिकतो, पण मुलगी शिकते तेव्हा ती तिच्यासोबत संपूर्ण कुटुंबच शिकवत असते, प्रगल्भ बनवत असते.

आपल्या शिक्षणावर, हा माणूस आदरास पात्र आहे की नाही हे ठरवणं खूप चुकीचं आहे. कारण प्रत्येक माणसाचा आदर हा केला गेलाच पाहिजे, भले त्याच शिक्षण किती का असेना, माणूस म्हणून आदर मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण आपल्या समाजातील ही एक सत्यता आहे की शिक्षणाने आपला आदर ही होतो आणि आपल्या मताला किंमत ही येते. त्यामुळेच आपल्याला आपल्या मुलींना चांगले शिक्षण , चांगले विचार हे देणं प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे.

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला सक्षम नागरिक बनवताल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची काळजी दूर झालेली असेल, कारण तुमची मुलगी तुम्ही आहेत तोपर्यंत तर तुमची मान अभिमानाने वर करेलच पण नसताल तेव्हा देखील ती धैर्याने उभी असेल, स्वावलंबी असेल, ती सक्षम असल्याने तिच्यातल्या आत्मविश्वासानेच ती जगात वेळ पडली तर एकटी सुद्धा हिंमतीने उभी राहील. स्वतःच पोट तर ती नक्कीच भरेल,पण त्यापेक्षा पुढे जाऊन तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास ही ती सक्षम असेल.

पालक म्हणून तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या मुलीच्या हातात नसून ती पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि या गोष्टीवर चर्चा करत असताना प्रतिष्ठा म्हणजे नेमके काय याबाबत आपल्याला स्पष्टता असायला हवी. करीयर म्हणजेच सर्वस्व नाही, असं जेव्हा तुम्ही मुलींना सांगता तेव्हा हे लक्षात घ्या की, ते सर्वस्व जरी नसलं तरी आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे जो त्यांना चांगली लाईफ जगण्यासाठी उपयोगी पडतो.

आपल्या मुलीला सक्षम बनवणं म्हणजे फक्त तिला चांगलं शिक्षण देणं असं नाही, तिच्या शिक्षणाला प्राधान्य देणं तर गरजेचं आहेच. पण त्याचबरोबर आपल्या घरात मुलाला आणि मुलीला सामान वागणूक देणं, ही त्यातच आलं. घर सांभाळणं ही जेवढी मुलीची जबाबदारी आहे तेवढीच ती मुलाची ही आहे. ‘तू मुलगी आहेस त्यामुळे तुला जेवण बनवणं हे आलंच पाहिजे’ , हे विसरून मुलगा असो व मुलगी दोघांना ही स्वयंपाक येणं गरजेचं आहे.

कारण भूक दोघांना ही लागते त्यामुळे बेसिक स्वयंपाक तरी दोघांना आलाच पाहिजे. शिवाय, स्वयंपाक असो किंवा कोणतीही कामे त्याने प्रत्येक जण स्वावलंबी होत असतो. त्यामुळे मुलींना जस सक्षम बनवताय तसेच मुलांना बेसिक काम शिकवून स्वावलंबी बनवा. कोणतीच कामे मुलाची वा मुलीची नसतात. प्रत्येक काम स्वावलंबनासाठी प्रत्येकाने करायला हवीत.

आता हे वाचून काहींना असंही वाटेल, की ही आपली संस्कृती नाही, परंपरा नाही. तर त्यांना मी एवढंच म्हणेन की, वाढदिवसाला मेणबत्ती विझवून केक कापणे, ३१ डिसेम्बर, १ जानेवारीला येणारा नवीन वर्षाचा पहिला दिवस हे आणि असे बरेच दिवस जे आपल्या संस्कृतीत येत नाही असं सगळं आपण पाश्चिमात्य लोकांचं आनंदाने अवलंबलं आहे.

त्यामुळे आपली संस्कृती काय आणि बाहेरची काय हे बोलत बसण्यापेक्षा चांगलं जे असेल ते कुठून ही माणसाने शिकावं. कारण काम हे काम असत, छोटं-मोठं किंवा बाईचं आणि पुरुषाचं असं काही नसत. इतकी वर्ष बायका जी-जी कामं करत आल्या , ती कामं आता पुरुषांनी केली तर ते काही बायका होणार नाहीत, कारण खूप पुरुष असेदेखील असतात की त्यांना कळत की ही जबाबदारी आपली सुद्धा आहे, पण बाहेरचे लोक बायल्या म्हणतील किंवा अजून काही म्हणतील म्हणून ही मंडळी घरात बायकोला, आईला किंवा बहिणीला मदत करायला कचरतात.

आणि खरंच अशी कामं करून कोणी पुरुष बायका झाले असते तर पाश्चिमात्य संस्कृतीत आज सगळ्याच बायका पाहावयास मिळाल्या असत्या. समाज बदलतोय, पण अजून ही कित्तेक माणसे बुरसटलेले विचार घेऊन जगताना आढळतात. तेव्हा तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटेल ती करताना लोकांचा विचार न करता, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात, असं मनात ठाम केलं तर नक्कीच समाज बदलायला वेळ लागणार नाही. आणि ह्या गोष्टी जेव्हा प्रत्येक घराघरातून मुलांना शिकवल्या जातील तेव्हा मुलींना सक्षम करणं हे मुलांना पायावर उभं करण्याइतकंच महत्वाचं बनून जाईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!