Skip to content

” न दिसणाऱ्या जखमाच नेहमी जास्त वेदना देतात.”

” न दिसणाऱ्या जखमाच नेहमी जास्त वेदना देतात.”


मधुश्री देशपांडे गानू


“हमने तो सिर्फ मोहब्बत मांगी थी, तुमने तो बेइंतहा गम दे दिये…

हमारी मासूमियत तो देखो,

हमने वो भी दिलो-जान से..

संभाल कर रख लिये……”

मी लिहिलेली शायरी आहे ही. प्रेमभंगाने, अपेक्षाभंगाने अतीव दुःख झालेल्या मानसिकतेची ही कहाणी. कोणावर तरी आपण मनापासून प्रेम करतो. त्याच्यावर जीव ओवाळून टाकतो. त्याने ही आपल्यावर तेवढेच मनापासून प्रेम करावे एवढीच आपली भावना, अपेक्षा असते. त्या व्यक्तीच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी आपण अनेकदा अशक्य गोष्टीही करतो.

एक प्रकारची असुरक्षितताही असते अशा नात्यात. पण जेंव्हा प्रेम दोन्हींकडून समान पातळीवर दिले घेतले जात नाही, तेंव्हा मात्र अतोनात दुःख पदरी येतं. ज्या व्यक्तीचा आपण 24 तास विचार करतो. ज्याचं नेहमी भलं व्हावं अशी आशा करतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपल्याला काहीच स्थान नाहीये, हे विदारक सत्य पचवणं खूप कठीण असतं. ही अशी भळभळती जखम असते जी आपण ना कोणाला दाखवू शकत, ना कोणी त्याच्यावर उपचार करू शकत.. ही मनाला, आपल्या भावविश्वाला झालेली, कोणालाही न दिसणारी जखम फार वेदनादायक असते. हे एक उदाहरण झालं.

आयुष्य सरधोपट मार्गाने जगताना अशा अनेक घटना प्रसंग घडतात, त्यामुळे आपले मन विदीर्ण होते. काही जखमा या कधीच भरून न येणार्या असतात. त्या बरोबर घेऊनच आपल्याला जगायचं असतं. रोजच्या जगण्यात आपण त्या बरोबर वागवतो आणि कोणाला कळतही नाही. पण एकटं असताना मात्र या जखमा पुन्हा चिघळतात. आठवणींचे मोहोळ उठवतात. आणि नकळत अश्रूं द्वारे वाहू लागतात.

शरीराला झालेला आजार, जखम दिसून येते. आपण लगेच डॉक्टरकडे जातो. त्याचा इलाज करतो आणि बरे होतो. पण मनाला झालेली जखम मात्र दाखवता येत नाही. ती किती तीव्रतेची आहे हेही कळत नाही.

मेंदू एक वेळ परिस्थिती, प्रसंग जाणून घेतो. पण मन?? मन मात्र ही खोलवर झालेली जखम हळुवार जपत राहतं. आजच्या सोशल मीडिया आणि धावपळीच्या जगात कोणालाही काहीही फरक पडत नाही की तुम्ही मनाने किती दुखावले आहात.” इथे फक्त तुमचा पैसा, तुमची मालमत्ता, तुमचा स्टेटस यावरूनच तुमची किंमत समाजात केली जाते.” तुम्हांला काय होतंय? किंवा तुम्हीं बरे आहात का? किंवा तुम्हांला काय वाटतंय? असं कोणीही विचारत नाही.

उलट तुमच्यावर एखादा कठीण प्रसंग आला, तर समाज मुद्दाम तुम्हाला टोमणे मारण्याचं, तुमची निंदा नालस्ती करण्याचं, तुमची चेष्टा करण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्या जखमा कितीही वेदना देत असल्या तरीही त्या कोणाही ऐर्या-गैर्या समोर कधीच उघड्या करू नका. तुमच्या आयुष्यात जी तुमची विश्वासाची, प्रेमाची मोजकी माणसं, मित्र मैत्रिणी असतील फक्त त्यांनाच मनातलं, खोल मनातलं सांगायचं. कारण ते हळुवार फुंकर घालून आपल्या वेदना कमी करतात. आपल्याला समजून घेतात. अशी प्रेमाची माणसं तुम्ही जोडायलाच हवीत.

कितीतरी अपेक्षाभंगाचे दुःख माणूस मनात जपून असतो. आपली प्रेमाची माणसं अत्यंत कोरडेपणाने वागतात, नातेवाईक अपमानास्पद वागणूक देतात, नोकरी-व्यवसायातील स्पर्धा, सामाजिक-आर्थिक स्तर सांभाळण्याची कसरत, विश्वासाच्या व्यक्तीकडून भावनिक-आर्थिक फसवणूक, प्रिय व्यक्तीचे अकाली निधन आणि कधीही भरुन न येणारी पोकळी अशा कितीतरी न दिसणाऱ्या जखमा, त्याचे व्रण घेऊन माणूस आयुष्यभर वावरत असतो. पण जर या जखमा योग्य व्यक्तीकडे व्यक्त केल्या नाहीत तर मात्र त्या चिघळतात. अनेक मानसिक आजारांचे निमित्त ठरू शकतात. शारीरिक स्वास्थ्यावर याचा विपरीत परिणाम होतो.

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक “Belief System” असते. स्वतःबद्दल, इतरांबद्दल, जगाबद्दल ठाम समजूती, विचार असतात. त्याला धक्का लागेल अशी घटना घडली की तो मानसिक आघात त्याला जखम देऊन जातो. मग अनेक उलटसुलट विचारांची, समजांची मालिका सुरू होते. या मनाच्या खोल डोहात माणूस अडकून राहतो. योग्यवेळी या भावनांचा निचरा झाला नाही तर नैराश्य येऊ शकतं. स्वतः बद्दल प्रचंड नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. आत्महत्येचे विचार येऊ लागतात.

त्यामुळे या जखमांचा, वेदनांचा योग्य निचरा होणे खूप आवश्यक आहे. जसं मी नेहमी सांगते, “आयुष्यात एक अशी व्यक्ती कमवा जिच्याजवळ तुम्ही मनातलं अगदी सगळं बोलू शकता.” जी ” non-judgmental ” असेल. जी तुमचं ऐकून घेईल. तुम्हांला समजून घेईल. तुम्हांला आधार देईल. अशी एक व्यक्ती आयुष्यात असणं, आपलं आयुष्य सहज करायला खूप महत्त्वाची असते. तुमची वैयक्तिक समस्या, वेदना सहज उपलब्ध आहे म्हणून सोशल मीडिया वर मांडू नका. त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता जास्त आहे.

एखादी मनाला जखम देणारी घटना घडली तरीही त्याकडे आपण कसे बघतो?, आपला दृष्टिकोन काय आहे?, आपली प्रतिक्रिया काय? यावरच खूप काही अवलंबून असतं. सगळी ताकद आपल्या मनातच असते. आपण ती जखम तशीच भळभळती ठेवायची आणि त्रासात जगायचं? की ती लवकर भरून निघावी यासाठी प्रयत्न करायचे, हे ठरवणारे फक्त आपणच असतो. आपल्या भावना, अपेक्षा, वेदना ही आपली जबाबदारी असते.

प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे नेहमी “कबीराचा दोहा”  प्रमाण म्हणून सांगतात.

“होशियार रहना रे, जगत मे चोर आवेगा…

जागृत रहना रे, जगत मे चोर आवेगा…”

म्हणजेच आपल्या भावनांप्रति आपलं मन जागृत, सावध असायला हवं. जखमा आणि वेदना रुपी चोर येऊ नये म्हणून आपली वृत्ती, स्वभाव, कृती, विचारांचं सुनियोजन हे स्वतःसाठी सम्यक, पुरक हवं. म्हणजे आपण कोणत्याही आघातातून लवकर सावरतो. “आपण स्वतःच स्वतःसाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहोत आणि संपूर्ण आनंदाने जगण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.”

हे एकदा समजून घेतलं, म्हणजे मग या खूप वेदना देणाऱ्या आणि कोणालाही न दिसणाऱ्या जखमा आपणच उपचार करून लवकर बऱ्या करू शकतो. आणि आयुष्य आनंदाने, समाधानाने जगण्याचा प्रयत्न करू शकतो. हो ना!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!