नेमकं काय करायचं आहे , जोपर्यंत हे कळत नाही , तोपर्यंत आपण काहीही करत राहू..
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
“नेमकं काय करायचं आहे , जोपर्यंत हे कळत नाही , तोपर्यंत आपण काहीही करत राहू.” आता याच अर्थ नक्की कसा घ्यायचा…? प्रश्नार्थक की उद्गारवाचक.. ? खरंतर या दोन्हीमध्येही माझा वेड्यासारखा गोंधळ उडाला होता.माझी अवस्था अगदी तंतोतंत या वाक्याला साजेशी अशी झाली होती.नेमका अर्थ काय घ्यायचा हेच कळेनासं झालं होतं मला.पण काही पर्याय उत्तर नव्हता म्हणून मी त्या वाक्याला माझ्या पद्धतीने उलगडायचा प्रयत्न सुरु केला.बघूयात म्हंटल , काय मिळतय उलगडून…? प्रश्नचिन्ह की उद्गारवाचक चिन्ह…?
नंतर मी अनेक पद्धतीने वापरून बघितल्या , वेगवेगळी उदाहरण अनुभवून पाहिली तेव्हा लक्षात आलं की , हे प्रश्नचिन्ह , उद्गारवाचक चिन्ह मुळीच वाटत नाही. हे काहीतरी नक्कीच वेगळं वाटतय.कारण या वाक्याला उलगडताना दोन गोष्टी मात्र अगदी व्यवस्थित समजल्या.त्या अशा की , जेव्हा नेमकं समजत नाही काय करावं तेव्हा आपण काहीतरी करायच म्हणून एखादी गोष्ट करतो तेव्हा ती करताना पुढे जाऊन काय होणार असतं हे माहीत नसतं , पण तरीसुद्धा आपण ती गोष्ट करतो आणि त्यातून एक अनुभव मात्र निश्चितच मिळतो.आणि आपण जे काहीही करत असतो ते करण्याआधी विचार करणंसुद्धा किती महत्वाचं असतं हे लक्षात आलं.
अगदी असच काहीसं सगळ्यांच्या बाबतीत झालं असेल किंवा होत असणार यात काही शंका नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असतं. आयुष्य म्हंटल्यावर असे अनुभव येणारच..! प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच की जेव्हा त्याला काय करायच आहे हे कळत नाही… आणि तोपर्यंत आपण काय करायच हेही कळत नाही किंवा मग तोपर्यंत काहीतरी करायच म्हणून पुढच्या दिशेने पावलं ही उचलली जातात.
आता अनेकदा कित्येकांच दिवसाच वेळापत्रक हे ठरलेल नसतं.आपल्याला आज काय करायचय किंवा उद्या आपण काय करणार आहोत हे माहीत नसतं.मुळात त्यांच तसं वेळापत्रक हे ठरलेल नसतं.गोष्टींच नियोजन हे झालेल नसतं. आणि मग दिवस उजाडतो , आठ वाजून जातात , नऊ वाजून जातात तरी आपल्याला नेमकं काय करायच हेच कळत नाही.”आता मी काय करू…” याच विचारात पुढचा काही वेळ तसाच जातो.
मग काय…जोपर्यंत काय करायच ते कळत नाही तोपर्यंत आपण काहीही किंवा काहीतरी करतो…किंवा काहीतरी करूया असा विचार करतो. आणि मग कळत नसतं , म्हणून मग जे दिसेल ते करत राहतो.आणि मग नंतर लक्षात येतं दिवस असाच गेला..हे करण्यात , ते करण्यात… उद्या असा दिवस जायला नको असही आपल्या लक्षात येतं.”ठिक आहे काही नाही म्हणता म्हणता आज तसं काहीतरी केलं…काहीच नाही असं नाही…” असं स्वतःच स्वतःशी पुटपुटत राहतो. इतकच नाही तर असही वाटतं की नेमकं काय करायचय ते कळालं असतं तर…काहीतरी चांगल नक्कीच झालं असतं.असा इकडे तिकडे वेळ गेला नसता.आणि हे वाटणं म्हणजे फार भयंकर असतं.कधी काय वाटेन काही सांगताच येत नाही.
अशी रोजच्या जगण्यातील कित्येक उदाहरणं डोळ्यासमोर आहेत… करिअर , पैसा , नोकरी , नाती वगैरे वगैरे. यांसारख्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये नेमकं काय करावं हेच कळत नाही. आणि अनेकदा हे कळत नसल्याने आपण काहीही करत राहतो.पैसा हातात असल्यावर आणि नसल्यावरही गोची होते.तो नेमका कुठे वापरायचा जोपर्यंत हे कळत नाही खरतरं तोपर्यंत तो असाच निघून जातो , खर्च होतो.त्याची योग्य गुंतवणूक करायची राहून जाते.आणि मग नंतर लक्षात येतं ते गुंतवणूक केली असती तर…………..?
आणि पैसा नसल्यावरही नेमकं काय करायच ते कळत नसतं…एखादी नोकरी करून पैसे कमवावे , की थोडं भांडवलाची सोय करून एखादा व्यवसाय सुरु करावा हेच कळत नाही… ईतकच नाही तर पैशाअभावी आणि पैसा असतानाही वाममार्गाला लागणारेही काही कमी नाहीत.म्हणजेच नेमकं काय करायच हेच कळत नसल्याने काहीजणं काहीही करत राहतात.
करिअर…करिअरच्या बाबतीत म्हणाल तर अनेकांना खरच नेमकं कळत नसतं काय करावं.आणि अनेकदा निर्णय हे चुकल्यासारखे वाटतात.नात्यांच्या बाबतीतही आपलं असच काहीसं होतं.नात्यांना नेमकं कसं हाताळावं हे कधी कळतच नाही , आणि म्हणून जसं चाललय तसच हाताळत राहतो.आणि एवढच नाही तर आयुष्यात , जगतानाही कितीतरी गोष्टी अशा आहेत की तिथे नेमकं काय करायच आहे हे जोपर्यंत कळत नसतं तिथे आपण असच बरच काही करत राहतो.पण सांगायच इतकच की , आधी नेमकं काय करायच आहे ते शक्य तितक्या लवकर जाणून घ्यायला शिका.
कारण नेहमीच त्या काहीही मधून काही सकारात्मक घडेल असं नाही. त्यापेक्षा व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर गोष्टी अधिक सोप्या होतील .आणि आपण असं “काहीही” करणार नाही.आणि प्रत्येक वेळी हे “काहीही” म्हणजे खरच काहीही नसतं , कधी कधी त्यातून चांगलही घडत असतं आणि एक नवा अनुभव ,धडा शिकायला मिळत असतो…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


